?️ मोठी बातमी : ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा राडा; विद्या चव्हाण पोलिसांच्या ताब्यात…
मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे अपेक्षेप्रमाणे राजकारण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांचा मुक्काम असलेल्या ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीवेळापूर्वीच निदर्शन करण्यात आले. हाथरस बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्याप्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
त्यांनी हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रायडंट हॉटेलच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन गाडीत बसवल्यानंतर एकच गोंधळ पाहायला मिळाला.
मुंबईतील बॉलिवूड इंडस्ट्रीला उत्तर प्रदेशात पर्याय निर्माण करण्याच्यादृष्टीने योगी आदित्यनाथ यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय, ते काही उद्योजकांचीही भेट घेणार आहेत. आपल्या राज्यात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, अशी भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवातीपासूनच योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला विरोध केला जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी मंगळवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी मुंबईत दाखल होताच त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती. आज (2 डिसेंबर) योगी बॉलिवूडच्या अनेक अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत.
*अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’*
योगी आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर मनसेकडून खरपूस शब्दांत टीका करण्यात आली. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, असा मजकूर असलेली बॅनर्स मनसेकडून मुंबईत झळकावण्यात आली आहेत. ट्रायडेंट हॉटेलबाहेर मनसेकडून ही बॅनर्स लावण्यात आली होती.
योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?’
देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय?,असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.






