मुंबई
सध्या कौन बनेगा करोडपती ही मालिका सोनी वर सुरू आहे. सर्वात जास्त लोकप्रिय असलेला हा रिऍलिटी शो असून या कार्यक्रमामुळे अनेक सामान्य माणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले.
१९ वर्षापूर्वी भारतीय टेलिव्हिजन वर एका कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाचे होस्ट होते, त्या शतकातील महानायक अमिताभ बच्चन आणि त्या कार्यक्रमाचे नाव होते, ‘कौन बनेगा करोडपती’.
या कार्यक्रमाने खूप लोकांच्या जीवनातील आर्थिक परिस्थिती बदलवून टाकण्यास हातभार लावला.
१७ वर्षात या कार्यक्रमाने ७ सामान्य लोकांना कोट्यधीश बनवले. कधी प्रश्न पडलाय का, हे लोक सध्या काय करत असतील?त्यांनी मिळालेल्या पैश्याचं काय केलं असेल?
चला तर जाणून घेऊया ‘त्या’ कोट्याधीशांबद्दल!
१. हर्षवर्धन नवाथे
UPSC ची तयारी करणाऱ्या हर्षवर्धन यांचे जीवन या कार्यक्रमाने बदलले.
२००० साली पहिल्याच सत्रात १ कोटी जिंकणारे हर्षवर्धन रातोरात स्टार बनले होते आणि या प्रसिद्धीच्या नादात त्यांचे शिक्षण सुटले. त्यांनी UPSC करण्याचा ध्यास सोडून देऊन MBA केले.आज ते दोन मुलांचे वडील आहेत आणि महिंद्रा कंपनी मध्ये काम करत आहेत.
२. रवी मोहन सैनी
‘कौन बनेगा करोडपती ज्युनिअर’ जिंकणाऱ्या रवीचे वय त्यावेळी फक्त १४ वर्ष होते आणि तो इयत्ता १० वी मध्ये शिकत होता.पण या कार्यक्रमामधून कोट्याधीश झाल्यावरही तो थांबला नाहीआज एक IPS ऑफीसर म्हणून तो समाजाची सेवा करतो आहे.
३. राहत तस्लिम
राहत एका अश्या घरामधून आली होती, जिथे मुलींना शिकण्याचे स्वातंत्र्य नव्हते. जेव्हा त्या मेडिकलची तयारी करत होत्या, त्यांचे लग्न सुद्धा झाले होते.
त्यांच्या या धैर्याला ‘कौन बनेगा करोडपती’च्या ४ थ्या सत्राने नवीन बळ दिले.जगाच्या नजरेतून त्यांनी एक कोटी रुपये जिंकले होते. परंतु त्यांच्या नजरेतून त्यांनी स्वतःसाठी स्वातंत्र्य जिंकले होते.या मिळालेल्या पैशांतून राहतने एक शोरूम सुरू केले आणि त्या आज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत.
४. सुशील कुमार
बिहारच्या एका गरीब कुटुंबातून आलेल्या सुशील कुमारने जेव्हा पाचव्या सत्रामध्ये पाच कोटींची मोठी रक्कम जिंकली, तेव्हा त्यांना वाटले की, आता त्यांची हलाखीची परिस्थिती ठीक होईल.ही रक्कम जिंकल्यानंतर ते खूप प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे त्यांना एक रियॅलिटी शो देखील ऑफर करण्यात आला होता. पण त्यानंतर मात्र त्यांची काहीच बातमी नव्हती.मध्यंतरी त्यांची सद्यस्थिती उघड झाली. ज्यानुसार, त्यांच्याकडील सर्व पैसे संपले आहेत आणि सध्या महिना ६००० रुपयांमध्ये कॉम्प्यूटर ऑपरेटरची ते नोकरी करत आहे.
५. सनमीत कौर
सनमीतची गोष्ट थोडी फिल्मी आहे.फॅशन डिझायनींगचा कोर्स केल्यानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना काम करू दिले नाही. पण त्यांनी हार मानली नाही आणि डब्यांचा व्यवसाय सुरु केला.काही कारणामुळे त्यांचा हा व्यवसायसुद्धा बंद पडला…!त्यानंतर त्यांनी मुलांना शिकवणे सुरु केले आणि त्यातून त्यांचेही ज्ञान वाढत गेले आणि त्याच क्षमतेवर त्यांनी केबीसीच्या सहाव्या सत्रामध्ये पाच कोटींची रक्कम जिंकली.या पैशांनी त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत मिळून फॅशन डिझायनींग हाऊस सुरू केले.
६. ताज मोहम्मद रंगरेज
ताज मोहम्मद सातव्या सत्रामध्ये एक कोटींची रक्कम जिंकणारे पहिले स्पर्धक होते.शिक्षक असणाऱ्या ताजने ही रक्कम जिंकल्यानंतर सांगितले होते की, ते आता स्वतःसाठी घर खरेदी करू शकतात आणि आपल्या मुलीच्या डोळ्यांवर उपचार देखील करू शकतात.ही रक्कम जिकल्यानंतरही हुरळून न जाता त्यांनी आपला शिक्षकी पेशा सुरू ठेवला आणि त्या पैश्यातून आपली सर्व स्वप्ने पूर्ण केली.आज ते एक यशस्वी मनुष्य म्हणून ओळखले जातात.
७. अचीन निरुला आणि सार्थक निरुला
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये ही आतापर्यंत जिंकलेली सर्वात जास्त रक्कम होती. दिल्लीच्या या दोन भावांनी सात कोटी एवढी मोठी रक्कम जिंकली होती.सात कोटी जिंकल्यानंतर लगेचच त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले.पण दोन्ही भावांनी या पैशांचा खूप काळजीपूर्वक वापर केला. त्यांनी आपल्या आईला झालेल्या कर्करोगावर उपचार केले आणि स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरु केला.
ह्या सर्वांकडून मिळणार धडा फार साधा आहे.
आपल्याला नेहेमी वाटतं की भरपूर पैसे मिळाले – विशेषतः एकरकमी – तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील.परंतू ध्येय साध्य करण्यासाठी फक्त पैसा आवश्यक नसतो तर योग्य नियोजन आणि पैश्यांचा योग्य विनियोग आवश्यक असते.














