चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिले पाऊल ठेवण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले….
श्रीहरीकोटा :
‘चांद्रायन 2’मधील ‘विक्रम’ लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात ‘मॅंझिनस सी’ आणि ‘सिंपेलिअस एन’ या दोन विवरांच्यामध्ये उतरविण्यात येणार होते. चंद्राच्या 67 अक्षांशाच्या जवळ उतरविण्यासाठी विषुववृत्ताशी अचूक 90 अंशांचा कोन करणारी कक्षा मिळणे आवश्यक होते.चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चंद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘चांद्रयान 2’मधील विक्रम लँडरचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चंद्रमोहिमेला मोठा धक्का बसला.
30 किलोमीटर अंतरावर असताना पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रम लँडर उतरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठीच्या आज्ञा बंगळूरच्या इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून देण्यात आल्या. ‘विक्रम’चा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 1 वाजून 48 मिनिटांनी विक्रम चंद्रापासून केवळ 7.4 किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर त्याच्या दिशादर्शक यंत्रणांच्या साह्याने जागेची निश्चितीही करण्यात आली होती. मात्र चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. नियोजित वेळेनंतही तो प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे भारताचे चंद्रभूमीवर सुखरूप उतरण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. चंद्रावर यान उतरविण्याची किमया यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी केली आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यान उतरविणे एकाही देशाला शक्य झाले नव्हते.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ चं (Mission Chandrayaan-2) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालं होत. सोमवारी (22 जुलै) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण झालं. त्यानंतर 16 मिनिटांनी चंद्रयान-2 बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात झाली.
असा होता चंद्रयान-2 48 दिवसांचा प्रवास आणि वेगवेगळे टप्पे
22 जुलै ते 13 ऑगस्ट – चंद्रयान-2 अंतराळ यान या काळात पृथ्वीच्या कक्षेत चक्कर मारेल.
13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट – चंद्राच्या दिशेला जाणाऱ्या कक्षेत प्रवास करेल.
19 ऑगस्ट – यान चंद्राच्या कक्षेत पोहचेल. यानंतर 13 दिवसांनी पुढील टप्पा.
31 ऑगस्ट – यान चंद्राचे चक्कर मारण्यास सुरुवात करेल.
1 सप्टेंबर – विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळं होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे जाण्याचा प्रवास सुरु करेल. यानंतर 5 दिवस प्रवास.
6 सप्टेंबर – विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार होत. लँडिंगनंतर जवळपास 4 तासांनंतर रोवर प्रज्ञान लँडरमधून बाहेर पडून वेगवेगळे नमुने गोळा करण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर असणार होत. इस्त्रोने या प्रक्षेपणातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करत सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण केलं.
इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन (Dr K. Sivan) यांनी ‘चंद्रयान-2’ च्या प्रक्षेपणातील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्याचीही माहिती दिली होती. या मोहिमेकडे भारतासह परदेशी माध्यमांचंही लक्ष लागलं असून ही मोहीम आव्हानात्मक समजली जात आहे.
‘चंद्रयान-2’ चं प्रक्षेपण भारताच्या सर्वात शक्तिशाली जीएसएलवी मार्क-III (GSLV MK-III) रॉकेटने करण्यात आले. या रॉकेटला ‘बाहुबली’ नाव देण्यात आलं आहे. रॉकेट बाहुबलीचं वजन 640 टन आहे. हे रॉकेट भारतातील आतापर्यंतचे सर्वात उंच रॉकेट आहे. याची उंची 44 मीटर म्हणजेच 15 मजली इमारती इतकी आहे. हे रॉकेट 4 टन वजनाच्या सॅटेलाईटला अवकाशात घेऊन जाण्यास सक्षम आहे. यात 3 टप्प्याचे इंजिन आहे.
मोहिमेची वैशिष्ट्ये…..
??चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली अवकाश मोहीम
??स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पहिली भारतीय मोहीम
??चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचणारा भारत चौथा देश होणार
??चंद्राच्या कधीही न पाहिल्या गेलेल्या क्षेत्रावरही भारताचं पाऊल
बाहुबली रॉकेटच्या निर्मितीसाठी 375 कोटी रुपये खर्च आला आहे. या रॉकेटने प्रक्षेपणानंतर जवळपास 16 मिनिटांमध्ये ‘चंद्रयान-2’ ला पृथ्वीच्या 170×40400 मिलोमीटर कक्षेत पोहचवले. ही भारताची महत्त्वकांक्षी मोहीम होती. ‘चंद्रयान-2’ चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील क्षेत्रात पोहचणारे आणि माहिती गोळा करणारे पहिले स्पेसक्राफ्ट असणार होता याआधी या भागात कोणतेही स्पेसक्राफ्ट गेलेले नाही.
चंद्रयान-2 मोहिमेचे तीन टप्पे
चंद्रयान-2 मोहिमेमध्ये तीन टप्पे असणार आहे. या तिन्ही टप्प्यांचा या मोहिमेत महत्त्वाचा वाटा असेल. यातील पहिला भाग लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे. याचे वजन 1400 किलो आणि लांबी 3.5 मीटर आहे. यात 3 पेलोड (वजन) आहेत, ज्याचा उपयोग चंद्रावर उतरल्यानंतर रोवरला स्थिर करण्यासाठी होईल. मोहिमेचा दुसरा भाग ऑर्बिटर आहे. याचे वजन 3500 किलो आणि लांबी 2.5 मीटर आहे. याच्यासोबत 8 पेलोड आहेत. ऑर्बिटर या पेलोडसह चंद्राच्या परिक्रमा करेल. तिसरा भाग रोवर असून याचे वजन 27 किलो आहे. रोवर सोलर एनर्जीवर चालेल आणि आपल्या 6 पायांसह चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन येथील काही नमुणे गोळा करेल.
मोहिमेतील आव्हाने….
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जवळपास 3,844 लाख किमी आहे. त्यामुळे पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवल्यास तो चंद्रावर पोहचण्यास काही मिनिटं वेळ लागणार आहे. तसेच, सोलर रेडिएशनचाही ‘चंद्रयान-2’ वर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतं.
दरम्यान, 10 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2008 मध्ये ‘चंद्रयान-1’ ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यात एक ऑर्बिटर आणि इम्पॅक्टर होता, मात्र रोवर नव्हता. ‘चंद्रयान-1’ चंद्राच्या कक्षेत गेले, मात्र चंद्रावर उतरले नाही.
सध्या तरी हे स्वप्न पूर्ण झाले नसले तरी शास्त्रज्ञानी केलेले प्रयत्न आणि मेहनत महत्वपूर्ण आहे.








