Pune

तुम्ही सुरुवात केली; शेवट आम्ही करू-आशिष शेलार – आमच्याकडे महाविकास आघाडी नेत्याच्या सीडी

तुम्ही सुरुवात केली; शेवट आम्ही करू-आशिष शेलार
– आमच्याकडे महाविकास आघाडी नेत्याच्या सीडी

दत्ता पारेकर पुणे

पुणे : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते व विधिमंडळाचे सभागृह नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला व महाविकास आघाडी सरकारच्या मंगळवारी (दि.24) शहाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिला. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
नारायण राणे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे यांना जाणून बुजून मुद्दाम केलेल्या अटकेचा आ.आशिष शेलार यांनी निषेध केला. भाजप कार्यालयावरील हल्ल्याचा शिवसेनेने तमाशा केला तर आम्ही तांडव करू, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री व शिवसेना वर राहील, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांना बोलतानाच्या सीडी आम्ही उघडल्या तर हे एकमेकांवरच गुन्हे दाखल करतील अशी यांची परिस्थिती आहे. यापूर्वीही खा.राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकमेकांना काय बोलत होते हे सर्वांना माहीत आहे. स्वातंत्र्य दिनाचा हीरक महोत्सव व अमृत महोत्सव याचा फरक मुख्यमंत्र्याला समजत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, या चुकीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
विकास आघाडी सरकारचे दबावतंत्र व झुंडशाही खपून घेणार नाही, असा इशारा देत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, वीज कनेक्शन तोडले जात आहे, या सरकारला शेतकऱ्याचे काहीही घेणे देणे नाही, हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी या पत्रकार परिषदेत केली. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, उदयसिंह पाटील, कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, मारुती वणवे आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांचेवर मोठ्या जबाबदारीचे संकेत

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपचे आज मोठे नेते आहेत, उद्याही मोठेच नेते राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील ते अतिशय अभ्यासू नेते असून केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी त्यांची चर्चा असते, असे नमूद करून भविष्यात हर्षवर्धन पाटील यांचेवर निश्चितच मोठी जबाबदारी सोपविली जाईल, असे स्पष्ट संकेत आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना दिले.

संबंधित लेख

Back to top button