Maharashtra

बोटं मोडताना आवाज का येतो ?

बोटं मोडताना आवाज का येतो ?

प्रविण पाटील

महाराष्ट्र : एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा.
वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.
या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.
बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं.
कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button