India

ट्राफिक लाईट लाल, हिरवे, पिवळे का असतात ?

ट्राफिकलाईट लाल, हिरवे, पिवळे का असतात ?

प्रतिनिधि- प्रविण पाटील
जगाच्या पाठीवर कुठेही जा, वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांचे रंग बदलत नाहीत. त्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा कितीही वेगळी असो, त्यातलं ओ की ठो आपल्याला कळत नाही अशी परिस्थिती उद्भवो, वाहतूक दिव्यांची भाषा काही बदलत नाही. चालतं वाहन थांबवण्यासाठीचा सिग्नल लाल रंगाचा, तर थांबलेल्या वाहनाला वाट मोकळी करून देणारा दिवा हिरव्या रंगाचा हे समीकरण सगळीकडे सारखंच असतं.

आपण दुसऱ्याशी संवाद साधतो तो नेहमीच शब्दांद्वारे किंवा भाषेच्या माध्यमातून साधतो असं नाही. हातवारेही बरंच काही सांगून जातात. डोळ्यांच्या भाषेबद्दल तर काय बोलावं ! ती भाषा नसती तर असंख्य लैला- मजनूंची शिरी-फरहादची पंचायतच झाली असती. रंग हेही संवादाचं असंच एक माध्यम आहे. या रंगकरवी आपल्याला नेहमीच काही संदेश मिळत असतात. कोणता रंग कोणता संदेश देतो हे थोडंफार आपापल्या सांस्कृतिक शिकवणीवर अवलंबून आहे हे खरं असलं तरी विशिष्ट रंग विशिष्ट भावना मनात उत्पन्न करतात हेही मानसशास्त्रज्ञ आणि मज्जाशास्त्रज्ञांनी पडताळून पाहिलं आहे.

वाहतुकीच्या दिव्यांच्या रंगांची निवड आपल्या नजरेला कोणते रंग अधिक स्पष्ट दिसतात यावरून ठरवले गेले असावेत, असा सर्वसाधारण समज आहे. तो अगदीच चुकीचा नाही हे खरं असलं तरी ते या रंगांच्या निवडीपाठचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नाही. रंगांमुळे उत्पन्न होणाऱ्या मानसिक ऊर्मीचं महत्त्व त्यापेक्षा जास्त आहे.

आज जरी रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांसाठी हे रंग वापरले जात असले तरी त्यांची पहिली निवड लोहमार्गावरील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी झाली होती. एकाच रुळावरून असंख्य गाड्या एकाच वेळी जात असतात. त्यामुळे पुढचा मार्ग मोकळा आहे हा संदेश इंजिनचालकाला देण्यासाठी जेव्हा सिग्नल वापरायला सुरुवात झाली तेव्हा या रंगांची निवड करण्यात आली. तीच पुढं रस्त्यावरच्या वाहतुकीसाठीही वापरण्यात येऊ लागली.

पुढं जाणं धोक्याचं आहे, गाडी थांबवा, असा संदेश देण्यासाठी लाल रंगांची निवड करण्यात आली ती तो रंग रक्ताचा असल्यामुळं. अनादिकाळापासून या रंगाची आणि धोक्याची सांगड घालण्यात आली आहे. हा रंग पाहिला की रक्ताची आणि त्यामुळं रक्तपाताची, धोक्याची भावना मनात जागृत होते. माणूस उत्तेजित होतो. त्याची नाडी वेगात धावू लागते. रक्तदाब वाढतो. भयापोटी वाहू लागणाऱ्या संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. हे अजमावलं गेलं आहे. त्यामुळे ‘थांबा’ या संदेशासाठी या रंगाची निवड आपोआप झाली. ‘धोका टळला आहे’, ‘आता जायला हरकत नाही’ या आदेशांसाठी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची निवड केली गेली होती; पण तो रंग आणि सूर्याप्रकाशाचा किंवा रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशाचा रंग यांच्यात गोंधळ उडू लागल्यामुळे मग त्यापेक्षा वेगळा तसंच, लाल रंगांपेक्षाही वेगळा असलेल्या हिरव्या रंगाची निवड केली गेली. या रंगाचा संबंध शांततेशी असल्यामुळे, तो रंग बघितला की मनातही शांत भाव निर्माण होतात. या दोन्ही रंगांपेक्षा वेगळा आणि त्यांच्यामध्ये असणारा रंग पिवळा म्हणून मग त्याची निवड दक्षतेसाठी करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button