India

कार्बन म्हणजे नेमके काय ?

कार्बन म्हणजे नेमके काय ?

‘कोळसा कितीही उगाळला; तरी काळाच !’ अशी मराठीत एक म्हण आहे. अंतर्बाह्य काळा असलेला कोळसा दिसायला फक्त काळा दिसतो. पण स्वच्छ चकचकीत हिरा, हिरवेगार गवत, आसपास दिसणारे प्राणी काय, पण आपण स्वतःसुद्धा मुलत: कोळशासारख्याच पदार्थातून बनलो आहोत, यावर विश्वास बसणे प्रथमदर्शनी कठीणच !
फरक आहे तो फक्त टक्केवारीचाच. कोळसा बनतो शंभर टक्के कार्बनपासून. या कार्बनने सर्व चराचर सृष्टी व्यापलेली आहे. या कार्बनवरच अनेक पदार्थांचे अस्तित्व अवलंबून आहे. तसाच नाशही कार्बनमध्ये व कार्बन-डायऑक्साइडमध्येच होणार असतो. वनस्पती सूर्याचा प्रकाश व कार्बन डायऑक्साइड वापरून स्वतःचे पोषण करतात. यामध्ये त्या स्वतःच्या शरीरात कार्बनच साठवतात. याच वनस्पती प्राणी भक्षण करतात. त्यांच्याही शरीरात कार्बन साठत जातो.
वनस्पतीपासून जेव्हा कोळसा तयार होतो, तेव्हा त्याच्या ज्वलनातून पुन्हा कार्बन डायॉक्साइड बाहेर टाकला जातो. प्राणी जेव्हा श्वासोच्छ्वास करतात, तेव्हा त्यातूनही कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. याखेरीज प्राणी मेल्यानंतर त्याचे रूपांतर कार्बन डायऑक्साइडमध्ये सरतेशेवटी हळूहळू होत जातेच. ही क्रिया कुजणे वा ज्वलन या दोन्ही प्रकारातून होऊ शकते. थोडक्यात म्हणजे सौर ऊर्जेच्या मदतीने हे कार्बन डायऑक्साइडचे चक्र सतत फिरत राहते व हवेतील त्याचे प्रमाण कायम राखले जाते.
कार्बनची अगदी सोपी संयुगे असंख्य आहेत. जिकडे पाहावे तिकडे आपल्याला त्याचे अस्तित्वात जाणवू लागते. तेले, पेट्रोल, पॅराफीन, डिझेल, डांबर, क्रूड, स्वयंपाकाचा गॅस, गोबर गॅस या प्रत्येकात हायड्रोजनबरोबर कार्बन असतो. साखर, स्टार्च, दारू, व्हिनेगर यातील कार्बन कार्बोहायड्रेट या स्वरूपात हायड्रोजन व प्राणवायूबरोबर असतो. याखेरीज प्लॅस्टिकच्या पदार्थात, जंतूनाशकात, सर्व सुगंधी पदार्थातही कार्बन असतोच. या असंख्य पदार्थातला संयुक्त कार्बन त्यांच्या ज्वलनाने किंवा अन्य रासायनिक क्रियांतून पुन्हा कार्बन डाय ऑक्साइडमध्ये रुपांतर पावतो.
सजीव वस्तूंमधील कार्बनचे प्रमाण सतत बदलत असते. पण तीच वस्तू जेव्हा निर्जीव होते, तेव्हा मात्र निर्जीव होण्याच्या वेळचे कार्बनचे प्रमाण नंतर तसेच राहते. यातील काही अणू नेहमीच्या कार्बनचे वेगळे आयसोटोप्स असतात. त्यांतून उत्सर्जन होऊन त्यांचे कालांतराने इतर कार्बन अणूंमध्ये रूपांतर होणार असते. पण हा कालावधी फार लांबचा असतो. या अणूंची संख्या व त्यांचे रेडिओउत्सर्जन मोजून एखाद्या निर्जीव वस्तूचा कालावधी ठरण्यात बरेचसे यश मिळते. यालाच ‘रेडिओकार्बनडेटिंग’ म्हणतात. रेडिओकार्बनडेटिंग या विषयावर स्वतंत्र माहिती अन्यत्र विस्तृतपणे दिली आहे.
पुस्तकांची पांढरी पाने वा त्यांवरील शाई, मऊ ग्राफाइटचे पेन्सिलचे शिसे किंवा अत्यंत कठीण असा हिरा ही सगळी कार्बनची विविध रूपे मती खरोखरच गुंग करून सोडतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button