Faijpur

दिव्य पवित्र कुरआन म्हणजे शांती, सुरक्षा व समर्पितता या त्रीसुत्रीचे एकत्रीकरण – प्रोफेसर वाजिद अली खान

दिव्य पवित्र कुरआन म्हणजे शांती, सुरक्षा व समर्पितता या त्रीसुत्रीचे एकत्रीकरण -प्रोफेसर वाजिद अली खान

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

सर्व शक्तिमान अल्लाह कृपाळू आणि दयावंत असून अवघ्या विश्वात शांतता, प्रेम, साहचर्य नांदावे यासाठी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या मार्फत संपूर्ण जगाला दिलेला पवित्र दिव्य कुरआन ग्रंथ म्हणजे वारंवार वाचला जाणारा ग्रंथ असून अवघ्या विश्वाला खऱ्या मानवतेचा संदेश दिव्य कुरआन च्या मार्फत दिला गेला आहे.
आदर्श जीवन कसे जगावे याची जणू घटनाच दिव्य कुरआन च्या माध्यमातून जगासमोर येते. दिव्य पवित्र कुराणात शैक्षणिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, न्यायव्यवस्था व प्रशासनिक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक मानवजातीचे जीवन आनंदी, शांतीमय करून विश्वाला प्रेममय करण्यात मोलाचे ठरणारे आहे. शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाने शिकले पाहिजे इकरा या शब्दाचा अर्थ च मुळी वाचणे असा होतो.
*विदाऊट रीड यू कॅनॉट लीड* अशा अर्थी नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. यासोबत कौटुंबिक व्यवस्थेत घरात प्रेम, शांतता व सहकार्य नांदले पाहिजे. समाज व्यवस्थेच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापासून चाळीस घरापर्यंत आपला शेजार धर्म असून प्रत्येकाने शेजाऱ्यांशी प्रेमाने वागले पाहिजे व त्यांच्या अडीअडचणीत मदतीला धावले पाहिजे. आर्थिक व्यवस्थेत कोणतेही काम हरामखोरीने न करता हलालखोरीने करावे यासोबत जकात च्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना मदत करावी. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून गुन्हेगाराला कडक शिक्षा देऊन समाजासमोर दंडक निर्माण करावा. प्रशासनिक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला माहितीचा अधिकार असून तो वरिष्ठांना केव्हाही जाब विचारू शकतो. अशा अर्थाने एखाद्या व्यक्तीपासून समाज, देश आणि विश्व सुसूत्रबद्ध संघटित राहण्यासाठी पवित्र दिव्य कुराण मानवतेचा संदेश देतो. त्यामुळे मुस्लिम व गैर मुस्लिम प्रत्येक बांधवाने दिव्य पवित्र कुरआन चे पठण करावे व मानवतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवावा असे आवाहन प्रोफेसर वाजिद अली खान यांनी केले.
ते जमाते इस्लामी हिंद, फैजपूर व तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजा इफ्तार पार्टीच्या औचित्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिरिषदादा मधुकरराव चौधरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधीक्षक, श्री सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस निरीक्षक फैजपूर, मा प्राचार्य डॉ आर वाय चौधरी, मा प्राचार्य डॉ आर एल चौधरी, आ धनंजय चौधरी, श्री प्रभाकरआप्पा सोनवणे, प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे सहसचिव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुफ्ती शोएब यांनी कुरआनची तिलावत अरबी भाषेत उपस्थितानसमोर सादर केली व याचे मराठी भाषांतर कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी उपस्थितांसमोर सादर केले.
याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात आमदार श्री शिरिषदादा मधुकरराव चौधरी यांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याकडून दिव्य पवित्र कुराणाच्या माध्यमातून सर्वोत्तम मानवी जीवनाची संहिता लिहिली गेली असून प्रत्येकाने कूराणाचे वाचन करावे व मानवतेचा हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवावा. यासोबत समाजात शांतता व बंधुता नांदण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन जागोजागी झाले पाहिजे. जमाती इस्लामी हिंद, फैजपूर शाखेमार्फत आयोजित रोजा इफ्तार पार्टी चे अप्रतिम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन व कौतुक केले.
याप्रसंगी नाशिक येथून कुराणसहित बायबल या पवित्र ग्रंथावर संशोधन करून देश विदेशात धर्मग्रंथांचा खरा अर्थ साध्या, सोप्या शब्दात मांडणाऱ्या प्रोफेसर वाजिद अली खान यांनी कुरआन ची निर्मिती, रचना आणि संदेश यावर सविस्तर विवेचन केले. जगातील 223 देशात 800 कोटी लोकसंख्येपैकी 185 कोटी मुस्लिम बांधव राहत असून जगाच्या लोकसंख्येपैकी ही संख्या 22 टक्के आहे. यापैकी 70 टक्के मुस्लिम बांधव वय वर्ष 6 ते 70 पर्यंत 14 तासांचा अन्न व पाण्याचा त्याग करून रोजा करतात. त्याचे कारण समाजात राहणाऱ्या इतर लोकांच्या भूक व तहान याची जाणीव व्हावी व लोकांच्या कल्याणासाठी आपल्याकडून काहीतरी कर्तव्य व्हावे या उदात्त हेतूने रोजा ठेवला जात असतो. रमजान च्या पवित्र महिन्यात रोजा ठेवून अल्लाह ची कृपा प्राप्त करून घ्यावी असे आवाहन केले.
याप्रसंगी जमाती इस्लामी हिंद, फैजपूर शाखेचे माजी युथ विंग अध्यक्ष इरफान शेख, शहर अध्यक्ष अबू बकर जनाब, संदेश विभाग सचिव अब्दुल कादिर जनाब, कार्यक्रमाचे संयोजक शेख अहमद साहब, युथ विंग जमाते इस्लामी हिंद अध्यक्ष शेख आमीन, अन्सार अहमद, मुज्जमील अली, शेख नईम, शेख जाविद, शेख कौसर, श्रीराम सैंदाणे, शेखर महाजन, नितीन सपकाळे, कन्हैया आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार शेख अहमद यांनी मानले.
यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी सोबत रोजा सोडला व प्रेम आणि बंधुतेचा आदर्श संदेश समाजासमोर मांडला.
अशा प्रकारचे कार्यक्रम जागोजागी झाले पाहिजेत अशा प्रकारचा सूर उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button