India

उस्ताद लहुजी साळवे….क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना घडविणारा वस्ताद..

उस्ताद लहुजी साळवे….क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना घडविणारा वस्ताद..

महात्मा जोतीबा फुले यांना संपूर्ण देश क्रांतिसूर्य म्हणून ओळखतो. समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरांचे साखळदंड जोतीबांनी स्वतः घाव घालून तोडले; पण यासाठी त्यांचे दंड मजबूत करणारे त्यांचे वस्ताद आपल्यातल्या किती जणांना माहिती आहेत ते इथं सांगणार आहोत, क्रांतिसूर्य ज्यांच्या तालमीत घडला ते वस्ताद म्हणजे लहूजी साळवे
लहूजी वस्तादांनी शारीरिक आणि मानसिक ताकद महात्मा फुलेंना दिली. पुण्यातल्या सनातन्यांना अंगावर घेण्याची शक्ती दिली. ज्या तालमीत जोतीबांनी अंग मेहनत करून शरीर कमावलं, पुढं तीच तालीम महार, मांग, चांभार, रामोशांच्या पोरांना ज्ञान कमावण्याच्या कामाला आली. जोतीबांनी लहूजी वस्तादांच्या तालमीतूनच ज्ञानदानाला आणि पर्यायानं समाज परिवर्तनाला सुरुवात केली होती.
इंग्रजांविरुद्ध आघाडी उघडणारे लहूजी वस्ताद
पुण्यासह महराष्ट्रातल्या शेकडो तरुणांना इंग्रजांशी झुंजायचं होतं. पारतंत्र्यातून मुक्त व्हायचं होतं. या युवकांना प्रोत्साहित केलं. अनेक शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं. इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईकांच्या प्रतिसरकार स्थापनेत मोलाची मदत केली. वेळोवेळी शस्त्र प्रशिक्षित युवकांची कुमक पुरवली.
“लहूजी वस्तात खंडोबावर कमालीची श्रद्धा ठेवून होते. त्यांच्या भाळी नेहमी भंडाऱ्याचं तेज असायचं. महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचे श्रद्धास्थान म्हणजे लहूजी वस्ताद साळवे. जेजुरीचा खंडोबा साळवे घराण्याचं कुलदैवत.” लहूजी वस्तादांचे आजोबा थोरले लहूजी साळवे हे शिवस्वराज्यात पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. थोरल्या लहूजींचा अफाट पराक्रम आणि स्वराज्यासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी पाहून त्यांना ‘राऊत’ हा खिताब दिला होता. काळसरला शिवशाही जाऊन पेशवाई आली.
पण साळवे घराण्याचा वट काही कमी झाला नाही. थोरल्या बाजीरावानं लहूजींचा मुलगा राघोजीला ‘शिकारखान्याचं’ प्रमुख केलं होतं. पुरंदरच्या ‘पेठ’ या गावी राहण्यासाठी जागा दिली. या गावी ‘जनाईचा मळा’ या ठिकाणी १४ नोव्हेंबर १७९४ला राघोजी आणि पत्नी विठाबाईंच्या पोटी लहूजी वस्तादांचा जन्म झाला.लहूजी आठ वर्षाचे असल्यापासून पिता राघोजींनी शस्त्रास्त्रांचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. लहूजी भरपूर अंग मेहनत करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं शरीर लाल मातीत तावून सुलाखून पहाडी पहिलवानासारखे दिसू लागले.
पितापुत्राचा पराक्रम
साळवे घराण्याचा शिवकाळापासून स्वराज्याशी संबंध होता. त्यांचे आजोबा पुरंदरचे किल्लेदार होते. त्यामुळं साहजिकचं त्यांना इंग्रजांचा तिटकारा होता. मराठी राज्याबद्दल प्रेम होतं. म्हणून ५ नोव्हेंबर १८१७च्या खडकीच्या युद्धात त्यांनी पेशवाईकडून सहभाग घेतला. रणतांडवाला सुरुवात झाली. राघोजी आणि लहूजी तयारीनिशी मैदानात उतरले. पेशवाईचे मोठे सरदार बापू गोखले पेशव्यांच्या सैन्याचे नेतृत्व करत होते. पण त्यांच्या घोड्याला गोळी लागल्याचं निमित्त झालं. ते मैदान सोडून पळाले. पण मांग, रामोशी, व्हलार जातींच्या लोकांना घेऊन निकराचा संघर्ष केला. १२ दिवस सलग दोघे लढले; पण डोक्याला गोळी लागल्यामुळं लहूजी साळवेंचे वडील राघोजी साळवे यांचा मृत्यू झाला. राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहूजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८ मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
या पराभवाने लहूजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहूजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. वडिलांना आपल्या डोळ्यासमोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहूजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
पुण्याच्या गंज पेठेत उभारला तालीमखाना
दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहूजी निपुण होते. लहूजींचे पीळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूलासुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रांबरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहूजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहूजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्धकलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले.
या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतीबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहूजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले. लहूजींच्या शिष्यांची एक बलाढ्य तुकडी तात्या टोपेंच्या नेतृत्वाखाली लढली. वस्तादांच्या तालमीतल्या शेकडो क्रांतिकाऱ्यांनी इंग्रजांशी झुंज देत प्राणाची आहुती दिली. त्यांचा न कुणी इतिहास लिहिला ना कुणी मोजदात ठेवली. आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या आणि सदैव खंडोबाच्या नामस्मरणात दंग राहणाऱ्या तेज:पुंजाने वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button