Manchar

आदिवासी कोंढरे गाव टँकर मुक्त – बुधाजी डामसे यांची माहिती

आदिवासी कोंढरे गाव टँकर मुक्त – बुधाजी डामसे यांची माहिती

मंचर / प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

कोंढरे (ता. आंबेगाव) या गावाला दरवर्षी एप्रिल ते जुन या काळात पाण्याची टंचाई भासत होती. परंतु यावर्षी सुधींद्रनाथ चटर्जी यांच्या आर्थिक मदतीने व ग्रामऊर्जा कंपनी यांच्या सहकार्याने कोंढरे गाव टंँकरमुक्त झाले असल्याचे, शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढरे या गावामध्ये ४५ ते ५० कुटुंब राहात आहे. दरवर्षी या गावास एप्रिल ते जुन या काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊन शासनाच्या वतीने गावाला टंँकरने पाणीपुरवठा केला जातो. गावाच्या परिसरात मध्ये दोन किलोमीटर अंतरावर पंचायत समिती मार्फत शिवकालीन खडकातील टाकीचे काम करण्यात आले होते. परंतु इतक्या दुरवरून डोक्यावर पाणी आणणे महिलांना शक्य होत नव्हते. याबाबत ग्रामस्थांनी शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार त्यांनी ग्रामऊर्जा कंपनीतील प्रसाद कुलकर्णी, किरण औटी व स्वप्नील जाधव यांच्याशी संपर्क साधून सौरऊर्जेतून कोंढरे गावासाठी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सहकार्य करावे. त्याप्रमाणे ग्रामऊर्जा कंपनी सहकार्य करण्यास तयार झाली.

सुधींद्रनाथ चटर्जी यांनी या प्रकल्पाकरिता आर्थिक मदत केली. ग्रामऊर्जा कंपनीनेे सौरपॅनल सह सर्व कामे पूर्ण केली. गावकऱ्यांंनी श्रमदानातून पाईप लाईन खोदण्याचे तसेच इतर कामात देखील मोलाचे सहकार्य करून शिवकालीन टाकी ते गावापर्यंत सुमारे दोन किलोमीटर पाईपलाइन पूर्ण करून गावात पाच ठिकाणी नळ योजना सुरू केली. बुधाजी असवले, रवी असवले, मधुकर शेळके, विकास असवले, सिताराम लांडे, बेबीताई असवले यांच्यासह ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करून गावचा पाणी प्रश्न सोडविला. कोंढरेगाव टॅकरमुक्त झाल्याने समाधान झाल्याचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Back to top button