Aurangabad

टोमॅटोला रुपया प्रती किलो भाव; या नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

टोमॅटोला रुपया प्रती किलो भाव; या नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात, परसोडा येथे आत्महत्या केल्याची घटना घडली. टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले मात्र एक रुपये प्रती किलो भाव मिळत असल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे घडली. राजू बंकट सिंग महेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. परसोडा धोंदलगाव शिवारात गट नंबर ५४८ मध्ये राजू महेर यांची शेती आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे.

या वर्षी उत्पादन चांगले झाल्याने महेर कुटुंब आनंदात होते. उत्पन्न चांगले मिळून डोक्यावरचा कर्जाचा भार हलका होईल, या उद्देशाने त्यांनी रविवारी टोमॅटो लासूर येथील बाजारपेठेत विक्रीस नेले. परंतू बाजारपेठेत या टोमॅटोला केवळ एक रुपये प्रती भाव मिळाला. यामुळे निराश होऊन महेर यांनी घर गाठले. आज सकाळी त्यांनी शेतात फवारणीतून उरलेले कीटकनाशक औषध प्राशन केले. शेतकऱ्यास ताबडतोब उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात येत होते. परंतू रस्त्यातच त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परसोडा गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button