Bodwad

बोदवड बाजार समितीमध्ये बैलगाडीतुन कापसाची चोरी

बोदवड बाजार समितीमध्ये बैलगाडीतुन कापसाची चोरी

रजनीकांत पाटील

बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणलेल्या ७५ कि.ग्रॅ. कापसाची चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामुळे कापूस घेऊन आलेल्या वाहनांच्या पहाऱ्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

गुरुवारी येथील शेतकरी महिला रत्‍नाबाई दिलीप माळी यांनी येथील सीसीआय खरेदी केंद्रावर कापसाच्या दोन बैलगाड्या भरून आणल्या होत्या. त्या दोन्ही गाड्या बाजार समितीच्या आवारात लावलेल्या होत्या.

सीसीआय खरेदी केंद्र शनिवारी व रविवारी बंद असल्याने त्यांचा कापूस विक्री झाला नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा विशाल माळी हा बैलगाड्यांची रखवाली करत होता. शनिवारी रात्री अकरा वाजता तो जेवण करण्यासाठी घरी गेला आणि पुन्हा बैलगाडीजवळ आला.

तेव्हा कुणीतरी बैलगाडीतून अंदाजे ७५ किलो कापूस चोरून नेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्याला कैफियत सांगितली. त्यांनी कापूस सांभाळणे ही तुमची जबाबदारी आहे. आमच्याकडे पहारेकरी कमी आहेत, असे उत्तर दिले.

आज एका शेतकऱ्यांचा कापूस चोरीला गेला, उद्या दुसऱ्या शेतकऱ्याचा कापूसही चोरीला जाऊ शकतो, त्यामुळे बाजार समितीने रात्रीचे पहारेकरी वाढवून कापूस चोरीला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्या बाजार समितीत कपाशी आणलेली सुमारे ७०० वाहने उभी आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन पहारेकरी आहेत. खरेदी होईपर्यंत कापसाची सुरक्षा होण्याची गरज आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button