Mumbai

मुहूर्त ठरला, सुपारी फुटली आणि नवरीही नटली, हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून!

मुहूर्त ठरला, सुपारी फुटली आणि नवरीही नटली, हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून!

मुंबई प्रतिनिधी । सुशिल कुवर

माजी मंत्री आणि भजाप नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार असून, हा सोहळा २८ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विवाहाची चर्चा सुरू होती. त्याची अधिकृत माहिती आज समोर आली असून, सध्या या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

हर्षवर्धन पाटील लेकीसह शिवतीर्थावर

दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे भेट दिली. त्यावेळी २८ तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. अंकिता पाटील यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे.

निहार ठाकरे करतात वकिली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं १९९६ मध्ये मुंबई – पुणे महामार्गावर अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे.

२८ डिसेंबरला मुंबईत होणार विवाह सोहळा

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह सोहळा २८ डिसेंबरला मुंबईत पार पडणार असल्याची माहिती मिळतेय. मोजक्या लोकांच्या उपस्थितात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बावडा वासियांसाठी पाटील यांनी १७ डिसेंबरला भोजन सोहळ्याचं आयोजन केलं आहे.

कोण आहेत अंकिता पाटील?

अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. २०१४ च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button