India

आरोग्याचा मुलमंत्र…गर्भावस्था व केसर

आरोग्याचा मुलमंत्र…गर्भावस्था व केसर

गर्भावस्थेत केसरचे सेवन करणे खूपच लाभकारक ठरते. गोल्डन स्पाईस नावाच्या केसरमध्ये संपूर्ण औषधीय गुणधर्म असतात. केसर गर्भावस्थेत येणारा ताणतनाव दूर करण्यासोबत आणि मुड स्विंग्सचा त्रासही संपवते. तसेच कोणत्याही दुखण्यावर केसर हे एक रामबाण उपाय म्हणून मानले जाते.

केशर म्हणजे क्रोकस सॅटिव्हस ह्या फुलाचे वाळलेले पराग असतात. केशराची रचना एखाद्या धाग्यासारखी असते आणि त्यामध्ये परागकण असतात आणि ते फुलांच्या मध्यभागी आढळतात. केशर वनस्पतीमध्ये चार फुले असतात, ज्यामधून कुक्षी आणि किरमिजी रंगाचे कुक्षीवंत गोळा केले जातात आणि वाळवले जातात. एका फुलामधून फक्त ३ केशराच्या काड्या मिळतात आणि एक पौंड केशर तयार करण्यासाठी सुमारे १४,००० केशराच्या काड्या लागतात. केशर काढण्यासाठी खूप प्रयत्न आणि श्रम केले जातात, त्यामुळे हा जगातील सर्वात महागडा मसाल्याचा पदार्थ आहे.

गर्भधारणेच्या पाचव्या महिन्याच्या सुरूवातीसच केशरचे सेवन करा, कारण या वेळी गर्भधारणा स्थिर झालेली असते आणि अकाली आकुंचन होऊन बाळाला धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

जास्त प्रमाणात केशराचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात म्हणून कोणत्याही परिस्थितीत केशराच्या फक्त २-३ काड्यांचा समावेश तुमच्या आहारात करा.

कृत्रिम रंग किंवा अशुद्ध केशर टाळण्यासाठी आणि विशेषकरून गर्भवती महिलांसाठी, केशर चांगल्या विक्रेत्यांकडून खरेदी करावे.

प्रेग्नन्सी मध्ये केसर सेवनाचे फायदे :

१) गरोदरपणामुळे तुमच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतात आणि त्याचा तुमच्या भावनांवर खोल परिणाम होतो. आपण एका क्षणी आनंदी तर दुसर्‍या क्षणी भावनात्मक होऊ शकता. अशा वेळी केशर तुमच्या मदतीला येऊ शकते. ते एक औदासिन्यविरोधी म्हणून कार्य करते आणि आपल्या मेंदूत रक्त प्रवाह वाढवते. केशरचे सेवन केल्याने आपला मूड चांगला करणारे सेरोटोनिन संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक, कोर्टिसोल देखील कमी करते.

२) गरोदरपणात एखाद्या स्त्रीच्या हृदयाचा वेग २५% नि जास्त वाढू शकतो, त्यामुळे रक्तदाब कमी जास्त होतो. केशरामध्ये पोटॅशियम आणि क्रोसेटिन असते त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. आणि ते गरोदरपणात फायदेशीर ठरू शकते.

३) बहुतेक महिलांना गरोदरपणात पोटदुखीचा त्रास होतो. गरोदरपणात पचन कमी होते आणि गर्भवती आईला पचन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही उत्तेजक घटकांची आवश्यकता असू शकते. केशरामुळे पाचन प्रणालीला चालना मिळते हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळे चयापचय क्रियेत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे पचन चांगले होते. केशरामुळे पचन संस्थेत संरक्षणात्मक थर तयार होतो. हा अतिरिक्त थर ऍसिडिटी आणि सूज कमी करण्यास देखील मदत करतो.

४) केशरामध्ये हृदयरोगांपासून संरक्षण करण्याचा जादुई गुण आहे. गरोदरपणात, स्त्रिया त्यांची वाढलेली भूक भागवण्यासाठी आवश्यक प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या हृदय व रक्तवाहिन्यांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. केशरामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स, क्रोसेटिन आणि पोटॅशियम आपल्या शरीरातील ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

५) आयुर्वेदिक शास्त्रानुसार, केशरामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे, गर्भाशयात बाळाची हालचाल सुरु होऊ शकते. आपल्या गर्भाशयात आपल्या बाळाच्या हालचालीचा अनुभव घेतल्याने तुम्हाला आनंद वाटतो.

६) केशरामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत त्यामुळे अनुनासिक वायुमार्ग विस्तारित होण्यास मदत होते. तसेच फुफ्फुसातील सूज आणि दाह कमी करते. परिणामी, तुम्ही सुरळीतपणे श्वास घेऊ शकता. दम्याने ग्रस्त गर्भवती महिलांना त्यांच्या फुफ्फुसात आणि श्वासनलिकेत येणारी कोणतीही अडचण दूर करण्यास केशरामुळे मदत होते.

वापरावे कसे :
– आपल्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कॅल्शियम हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज आहे. गरोदरपणाचा पाचवा महिना सुरु झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दुधात केशर घालू शकता किंवा तुम्ही बदाम, पिस्ता आणि केशर इत्यादींची पेस्ट करून दुधातून घेऊ शकता. तुम्ही सकाळी केशर दूध घेऊ शकता.

– घरी किंवा व्यावसायिक स्वयंपाकी अशा पद्धतीने केशर भिजवून वापरतात. केशराचे धागे हळूवारपणे कुस्करून पाणी, दूध किंवा सूप मध्ये घातले जातात आणि विरघळण्यासाठी १० ते १५ मिनिटे तसेच ठेवले जातात.

टिप :
केशरामुळे शरीराची उष्णता आणि तापमान वाढते. गर्भाशय आकुंचन पावण्यास सुरुवात होते. यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात गर्भपात होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत केशराचे सेवन सुरू करावे.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button