Amalner

ऐतिहासिक दगडी दरवाजा मोजतोय शेवटच्या घटका

ऐतिहासिक दगडी दरवाजा मोजतोय शेवटच्या घटका

अमळनेर-चोपडा रस्त्यालगत असलेला ऐतिहासिक दगडी दरवाजाची पुन्हा पडझड सुरू झाली आहे. हा दगडी दरवाजा स्वातंत्र्यपूर्वकालीन आहे. संपूर्ण दगडांनी बांधलेला हा दरवाजा अमळनेर शहराची सांकेतिक आणि ऐतिहासिक खुण आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दरवाजाची निगा न ठेवल्यामुळे नासधूस होत आहे. त्यामुळे पूर्ण दरवाजा पडल्यावरच पुरातत्व विभागाला व नगरपरिषदेला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

या दरवाजाची देखभाल सध्या नगरपरिषदेकडे आहे. या ऐतिहासिक दगडी दरवाजाची नासधूस होत असूनही नगरपरिषद याकडे लक्ष देत नाही. दरवाजाच्या मध्यभागी तडे पडले असून तो भाग केव्हाही ढासळू शकतो यामुळे दरवाज्याचे काम सुरु करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. शहराचा विस्तारहोण्या अगोदर या दरवाजाच्या आतच जुने अमळनेर हे गाव होते. मात्र शहराचा विस्तार झाल्यामुळे हा दरवाजा आज शहराच्या मध्यभागी आला आहे. असे म्हटले जाते की जुने अमळनेर गावाच्या सभोवताली तटबंदी होती. याच दरवाज्यातून गावात जाता येत असे. दरवाज्याला दोन्ही बाजूनी मोठे दरवाजे बसवले होते. शिवाय वर टेहळनीसाठी बुरुज ही बांधण्यात आले होते. आज या ठिकाणी कोणताही दरवाजा नाही, शिवाय जे बुरुज बांधण्यात आले होते. ते बुरुजांचीही पडले आहे.दरवाजाचा काही भाग केंव्हाही खाली कोसळू शकतो. यामुळे ऐतिहासिक वास्तूचे नुकसान तर होईलच परंतु जिवित हानिही होऊ शकते. याच दरवाजातून यात्रेच्या वेळी सखाराम महाराजांचा रथ नेला जातो. त्यावेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी जमलेली असते. दरवाजातून रथ नेण्याची जुनी परंपरा आहे. दरवाजाच्या पूर्वेकडील बाजूस मांगीर बाबांची शीर नसलेले शरिराची आकृती कोरलेली होते. याठिकाणी अनेक भाविक श्रद्धेने श्रीफळ अर्पण करायचे. अमळनेर, चोपडा आणि पारोळा या रस्त्यावर हा दरवाजा असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा वाहातुकीचा खोळंबा होता. या ठिकाणी रस्ता हा अरुंद आहे. वाहतूक पोलिसाशिवाय येथील वाहतूक सुरळीत होऊच शकत नाही. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असुन तरी येथे वाहतूक विस्कळीत होणारच आहे. यामुळे बालेमिया पासून ते बोरी नदीपूलापर्यंत उड्डाणपूल उभारल्यास वाहतुकीची कोंडी फुटू शकते.

७० वर्षांपासून दगडी दरवाजाशेजारी आमचे घर आहे. हा दरवाजा शहराची शान आहे. त्यांची पुर्णपणे पडझड सुरू आहे ती थांबवली पाहिजे. यासाठी शहरातील नागरिकांनी जनआंदोलन उभे करावे पण हा दरवाजा वाचवला पाहिजे.

नविद शेख
सामाजिक कार्यकर्ते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button