Aurangabad

पाचशे रुपयांसाठी तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीचे केले होते लैंगिक शोषण

पाचशे रुपयांसाठी तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीचे केले होते लैंगिक शोषण

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील तरुणाचा पाचशे रुपयांसाठी कब्रस्तानात नेऊन निर्घृण खून केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पीडितेला गर्भधारणा झाल्याने त्याचे पाप समोर आले आणि मंगळवारी सिटीचौक पोलीस ठाण्यात पीडितेने आरोपीविरोधात तक्रार नोंदविली.

शहारुख खान फिरोज खान (२८, रा. जुनाबाजार), असे आरोपीचे नाव आहे. सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार १६ वर्षीय पीडितेने शाळा सोडलेली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी तिची आरोपीसोबत ओळख झाली होती.

या ओळखीतून त्याने तिच्यासोबत मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. यातून तिला गर्भधारणा राहिली. दरम्यान, ९ एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेल्या अपंग तरुणाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपीने मनपा कार्यालयाजवळील कब्रस्तानात नेऊन पाचशे रुपये लुटण्यासाठी त्याची हत्या केली होती.

या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केली होती. तेव्हापासून आरोपी जेलमध्ये आहे. दरम्यान, पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला दवाखान्यात नेल्यावर तिला गर्भधारणा झाल्याचे समोर आले.

मंगळवारी तिने सिटीचौक पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक सय्यद हे तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button