Pandharpur

एस. एम. अवताडे कन्स्ट्रक्शनला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारांचे निलंबन करा : स्वप्निल वाघमारे

एस. एम. अवताडे कन्स्ट्रक्शनला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारांचे निलंबन करा : स्वप्निल वाघमारे


रफिक आतार पंढरपूर

अकलूज : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१९-२० अंतर्गत पंढरपूर-शेळवे-खळवे-माळखांबी या २८.८०० किलोमीटर रस्त्यासाठी श्री.एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीने प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता व महसूल न भरता सुमारे ४४६३० ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन करून शासनाचा ४६,४१,५५,३०० रूपयये महसूल बुडविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलने करून, धरणे धरून स्थानिक महसूल प्रशासनाला पुरावे देऊन स्वप्नील वाघमारे यांनी एस. एम. आवताडे कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र हा दंड वसूल करण्यासाठी युवासेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही तहसीलदार जगदीश निंबाळकर या कंपनीला पाठीशी घालत असल्याने त्यांना निलंबित करावे अशी मागणी स्वप्नील वाघमारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, युवासेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दोन टप्प्यात ४४,६३० ब्रास मुरूम उत्खनन प्रकरणी ४६,४१,५५,६३० रूपये दंडाचे आदेश पारित करून सदर दंडाची रक्कम ७ दिवसाच्या आत न भरल्यास ती जमीन महसूलाची थकबाकी म्हणून त्यांनी धारण केलेल्या मिळकतीवर बोजा ठेवून वसूलीची कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे आदेश करण्यात आले होते. तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी काढलेल्या पहिल्या आदेशाला पाच महिने व दुसऱ्या आदेशाला तीन महिने झाले तरीही अद्यापपर्यंत आवताडे कंपनीच्या मिळकतीवर दंडात्मक रकमेचा बोजा चढवून कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार जाणीवपूर्वक शासनाचा महसूल बुडवित असल्याचे निदर्शनास येत आहे. अवैध गौन खनिज उत्खननाशी निगडीत प्रचलित अधिनियम (भारत सरकार व महाराष्ट्र शासन खाण व खनिज (विकास व विनमय) अधिनियम) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ तसेच पर्यावरण (संरक्षण अधिनियम) व शासन निर्णय/परिपत्रकाचे काटेकोर अवलोकन करून कारवाई होणे गरजेचे असताना महाराष्ट्र शासनाला मिळणारा सुमारे ४६.५० कोटी महसूल बुडण्याच्या मार्गावर आहे. सध्या याप्रकरणी एस. एम. आवताडे कंपनीने उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस येथे आर. टी. एस./अपिल क्र. १४०२/२०२०, १४०३/२०२०, १४०४/२०२० व १४०५/२०२० चा निकाल दिनांक २८/१/२०२१ तसेच आर. टी. एस. २८८/२०२१, आर. टी. एस. २८९/२०२१ चा निकाल दिनांक १७/३/२०२१ रोजी अपील केले आहे. सदर प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार माळशिरस यांचेकडे फेरचौकशीसाठी आलेले आहे. त्याची चौकशीही सुरू आहे. परंतु आतापर्यंतचा आलेला अनुभव पाहता ही चौकशी चुकीच्या पध्दतीने व एस. एम. आवताडे कंपनीला वाचविण्याच्या दृष्टीने होत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्यासह त्यांना सहकार्य करणारे महसूल अधिकारी यांचे तात्काळ निलंबन होऊन सुरू असलेल्या फेरचौकशीमध्ये आम्हाला त्रयस्थ इसम म्हणून समाविष्ट करून घ्यावे. त्याचबरोबर महसूल विभागाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून दंडाची रक्कम त्वरीत वसूल करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री, पर्यावरणमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा खनिकर्म अधिकारी सोलापूर, उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग यांनाही दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button