Pune

क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत- हर्षवर्धन पाटील

क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत- हर्षवर्धन पाटील

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतवर्षा निमित्त आणि फिट इंडिया उपक्रमांतर्गत मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापुरमध्ये दिनांक 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर रोजी चार दिवसीय मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बलशाही युवक निर्माण व्हावेत हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून त्यासाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.
ही स्पर्धा वय वर्ष 30 च्या पुढील वयोगटासाठी असून यामध्ये ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन सायकलिंग, फुटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल यासारख्या क्रीडा प्रकाराचे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी संस्था असून ग्रामीण भागातील मुले मुलींना खेळाडू म्हणून तयार करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेत त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे. बलशाही युवक निर्माण करणे हे ब्रीद वाक्य या संस्थेचे असून इंदापूर येथील या स्पर्धेत खेळणारे खेळाडूंची निवड तेलंगणा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार असून इंदापूरमध्ये ही स्पर्धा होणार असल्याने त्याचा आम्हाला आनंद आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणे हा पहिला गुण आहे तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये जनशक्ती आहे त्या जनशक्तीच्या माध्यमातून आपण वाटचाल केली पाहिजे.’
राज्यस्तरीय मास्टर गेम्सचे सचिव बाळा चव्हाण तसेच राष्ट्रीय खेळाडू आणि आयकर अधिकारी सुजित बडदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्यस्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेचे अध्यक्ष दिपू के, उपाध्यक्ष सुनील जाधव, पुणे जिल्हा मास्टर गेम्सचे सचिव महेंद्र बाजारे, कोषाध्यक्ष केतान डिसल्वा, वरिष्ठ सचिव प्रभाकर दुबे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, संस्थेचे खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, सहसचिव प्रा.बाळासाहेब खटके, संचालक विलासबापू वाघमोडे, तुकाराम जाधव, गणपत भोंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक बापू घोगरे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button