Maharashtra

साप चावला..!घाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..!

साप चावला..!घाबरू नका हे आहेत उपाय आणि उपचार..!

साप चावला की सामान्य लोक आधीच खूप घाबरतात. त्यामुळेच साप चावल्यानंतर बरेच वेळा मृत्यू होतो. भारतात सापा कडे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने देखील पाहिलं जातं तसेच सापांविषयी अनेक दंतकथा देखील अस्तित्वात आहेत. सिनेमाद्वारे ह्या दंतकथा ना खतपाणी घातले जाते. उदा नाग नागीण बदला घेतात इ. पण साप हा निव्वळ नैसर्गिक प्राणी असून त्याच्या पासुन मानवाला धोका नाही तर सापांना मानवापासून धोका निर्माण झाला आहे.पण जर न घाबरता व्यवस्थित उपाय आणि उपचार केले तर साप चावल्यानंतर जीव वाचू शकतो. चला तर मग पाहू या काय आहेत वस्तुस्थिती आणि उपाय…

1) जगात फक्त २०% साप विषारी असतात. चावलेला साप विषारी जरी निघाला तरी त्याचा दंश विषारी असेल याची शक्यता फक्त ५०% असते. बऱ्याच वेळा साप ‘कोरडा दंश’ (म्हणजे विनाविषाचा दंश) देतो. पण जर तुम्हाला दुर्दैवाने ‘ओला दंश’ (म्हणजे विषारी दंश) झाला असेल तरी सुद्धा घाबरून जायचे कारण नाही. योग्य आणि वेळेत मिळालेल्या वैद्यकीय सेवेने तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही.

2) साप चावल्यानंतर माणूस फार घाबरून जातो. त्यामुळे त्याचा हृदयाचा वेग वाढून शरीरात विष अधिक गतीने पसरु लागते. म्हणून धैर्य आणि विश्वास बाळगा. प्रथम एका सुरक्षित/मोकळ्या जागेवर जा व खाली बसून घ्या. एकटे असाल तर त्वरित १०८ किंवा ११२ नंबरवर फोन करून अम्ब्युलन्सला थोडक्यात आपली माहिती सांगा (नाव, पत्ता आणि प्रॉब्लेम). जवळच्या लोकांना बोलावून घ्या. एकटे नसाल तर आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन लवकरात लवकर जवळचे इस्पितळ गाठा. तिथे डॉक्टर तुम्हाला अँटी-वेनम देतील. दंश केलेल्या सापाचे थोडेफार जरी वर्णन करता आले तरी डॉक्टरांना मदतच होईल. सापाचा रंग, लांबी, पट्टे, मानेवरील रेषा, वगैरे अशी महिती तुम्ही देऊ शकलात तर उत्तम. तुम्हाला जर साप नीट दिसला नसेल तरीही अडचण नाही. पण सापाला पकडायला अथवा मारायला जाऊ नका. तसे केल्यास तो पुन्हा चावण्याची शक्यता तर असतेच, शिवाय तुम्ही तुमचा अनमोल वेळसुद्धा वाया घालवता.

3) घट्ट कपडे (उदा. जीन्स, लेनिन्स किंवा तंग शर्ट) घातले असतील तर ते काढा अथवा तो भाग कापून/फाडून टाका. इतर गोष्टी (उदा. अंगठी, घड्याळ, इत्यादी) घातले असतील तर ते सुद्धा काढून ठेवा. असे का? कारण चावलेल्या जागी सूज निर्माण होऊ शकते. साप त्याचे विष रक्तप्रवाहात सोडतो त्यामुळे ‘जखम कापून विषारी रक्त वाहून जाईल’ हा समज चुकीचा आहे. उलट त्याने जखमेत इन्फेक्शन होऊ शकते. जखमेवर बर्फ लावू नका कारण त्याने जखम चिघळू शकते. बरं, मग काय करावे? आपल्याकडे तेव्हा तीन पर्याय असतात:

A) जवळपास जाड काठी/लाकडी फळी असेल तर त्याने संबंधित भाग चिंध्यांनी किंवा दोरीने बांधणे म्हणजे त्याची हालचाल होणार नाही. ह्याला ‘स्प्लिन्ट’ लावणे असं म्हणतात.

B) विष शरीरात पसरू नये म्हणून लोक संबंधित भागाच्या वर करकचून दोरी किंवा कापड बांधतात. पण असे करणे अतिशय धोकादायक आहे कारण संबंधित भागाला पुरेसा रक्तपुरवठा पोहोचत नाही. त्यामुळे कायमची हानी किंवा गँगरिन सुद्धा होऊ शकते. रक्तपुरवठा बंद करण्याच्या साधनाला ‘टोरणीक्वेट’ असं म्हणतात, जे तुम्हाला लावायचे नाहीये. त्यापेक्षा तुमच्याजवळ रुमाल असेल तर तो जखमेवर दाबून ठेवा व तो भाग ओढणीने किंवा कापडाने (१ बोटाचे अंतर ठेऊन) लपेटून घ्या. याला ‘कॉम्प्रेस बँडेज’ लावणे असं म्हणतात.

C) जर तुमच्यापाशी रुमाल किंवा काठी नसेल तरी चिंतेची बाब नाही. लक्षात असू द्या की तुम्हाला संबंधित भागाची कमीत कमी हालचाल करायची आहे. जर हाताला दंश झाला असेल तर तो हात आपल्या हृदयाच्या लेवलला आणावा ज्यामुळे विष संक्रमणाचा वेग कमी होऊन जातो.

4) साप चावल्यानंतर काहीही खाऊ/पिऊ नका. उदा. अल्कोहोल, कॅफिन अशी पेये तर नक्कीच घेऊ नका. असे केल्यास हृदयाचा वेग वाढून शरीरात विष लवकर पसरू लागते आणि तेच आपल्याला टाळायचे आहे.

5) एक महत्वाची सूचना. तोंडाने विष शोषून थुंकून देणे ही सिनेसृष्टीने तयार केलेली एक चुकीची व धोकादायक संकल्पना आहे. याने चोखणाऱ्याच्या तोंडात विष तर पसरेलच, शिवाय जखमेत इन्फेक्शनसुद्धा पसरू शकते.

त्यामुळे वरील काही गोष्टींची काळजी घेतल्यास साप चावला तरी जीव जाणार नाही. योग्य ती काळजी,न घाबरणे आणि योग्य उपाय योजना केल्यास जीव वाचू शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button