Amalner

सामूहिक प्रार्थनेने “श्यामची आई” अभिवाचन

अमळनेर : सामूहिक प्रार्थनेने “श्यामची आई” अभिवाचन उपक्रमाची वरुण राजाच्या साक्षीने भावविभोर वातावरणात सांगता… साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच अमळनेर व शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने दि.11जून 2021 पूज्य सानेगुरुजी स्मृतीदिनापासून तालुक्यातील इ.1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या "श्यामची आई" पुस्तकांतील संस्कार कथांच्या अभिवाचन (ऑडीबल) उपक्रमाची सांगता दि.25 जुलै रोजी अमळनेरची पुरातन काळापासून ओळख असलेल्या अंबर्षी टेकडीवरील अंबऋषी मंदीरात वरुण राजाच्या साक्षीने निसर्गरम्य व प्रसन्न वातावरणात झाली. कार्यक्रमाची सुरुवात "खरा तो एकचि धर्म..." या सानेगुरुजींनी लिहिलेल्या प्रार्थनेने होऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.पी.डी.धनगर साहेब, प्रमुख अतिथी टेकडी गृपचे श्री.तुळशीराम भदाणे व सामाजिक कार्यकर्त्या श्रीम.यमुना अवकाळे यांच्या शुभहस्ते..."श्यामची आई" पुस्तकाचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागत-सत्कारानंतर नाविन्यपूर्ण अभिवाचन उपक्रमात अभिवाचनकर्ते शिक्षकांना आलेल्या अनुभव कथनाचा कार्यक्रम घेण्यात येऊन प्रत्येकास 1 मिनिटाची वेळ देण्यात आली होती. यात सर्वांनी आपणास आलेला अनुभव व्यक्त करतांना कथेतील संस्कार व गुरुजींच्या संवेदनशील मनाची प्रत्यक्ष अनुभूती आल्याची व स्वत: समरस होऊन घराघरात व सर्वांच्या हृदयात "श्यामची आई" पोहोचवण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त करत यापुढेही असेच वेगवेगळ्या पुस्तकांचे अभिवाचन उपक्रम सुरु ठेवण्याबाबत इच्छा व्यक्त केली. यानंतर उपक्रम संयोजक व सानेगुरुजी शै.विचारमंचचे समन्वयक श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी सलग 44 दिवस सहभागी शिक्षकांकडून आलेल्या रेकॉर्डींग चे इडीटींग, बॅनर मेकींग व व्हॉटसअप द्वारे नियमित पोस्ट शेअर करतांना आलेल्या तंत्रज्ञानविषयक अनुभवाचा लेखाजोखा मांडतांना उपक्रमाच्या यशाचे गमक हे सानेगुरुजी विचारमंच परिवाराच्या टिमवर्कचा परिपाक असल्याचे मत व्यक्त केले. टेकडीगृपचे श्री.तुळशिराम भदाणे यांनी सानेगुरुजींसारखे संवेदनशील शिक्षक होऊन विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासोबत विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्याची भावनिक साद घातली. अध्यक्षीय भाषणात मा.श्री.पी.डी.धनगर साहेब यांनी उपक्रमात सहभागी सर्व शिक्षकांचे कौतुक करुन पूज्य सानेगुरुजींच्या अमळनेर येथील प्रताप हायस्कूलच्या शाळा व वसतिगृहातील हृदयस्पर्शी प्रसंग विदीत करतांना सानेगुरुजी शै.विचारमंच दरवर्षी राबवत असलेल्या उपक्रमांमुळे तालुक्यात प्रेरणादायी वातावरण निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले. सदर ऑनलाईन उपक्रमाची सांगता ऑफलाईन एकत्रिकरण असलेल्या (गेट टुगेदर) कार्यक्रमास अभिवाचन उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी झालेले अभिवाचनकर्ते शिक्षक बंधू-भगिनी दमदार पावसातही बहूसंख्येने उपस्थित होते. अशा या उत्साहवर्धक कार्यक्रमासाठी अल्पोपहाराचे प्रायोजकत्व मंच सदस्य श्री.वाल्मिक मराठे पाटील यांनी स्विकारले होते तसेच आशु नॉव्हेल्टीचे श्री.विशाल शर्मा यांनीही वेळेवर अल्पोपहार व मिठाईचे वाटप करुन सर्वांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंच सदस्यांसोबत टेकडीगृपचे आशिष चौधरी, भदाणे आबा, विशाल शर्मा यांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी केले व आभार श्री.अशोक पाटील यांनी मानले. *सदर उपक्रमात सहभागी शिक्षक व कंसात त्यांनी सादर केलेल्या ऑडीबल कथेचे नाव पुढीलप्रमाणे....* मा.श्री.आर.डी.महाजन साहेब (शुभेच्छा संदेश), श्री.दत्तात्रय सोनवणे (प्रस्तावना), श्रीम.जयश्री पवार (प्रारंभ), श्री.रामेश्वर भदाणे (सावित्री व्रत), श्रीम.कविता पाटील (अक्काचे लग्न), श्री.शरद पाटील (मुकी फुले), श्रीम.प्रमिला मोरे (पुण्यात्मा यशवंत), श्री.अशोक पाटील (मथुरी), श्रीम.सुषमा तायडे (थोर अश्रू), श्री.चंद्रकांत देसले (पत्रावळ), श्रीम.सिमा पाटील (क्षमेविषयी प्रार्थना), श्री.रविंद्र पाटील (मोरी गाय), श्रीम.सुनिता पाटील (पर्णकुटी), श्री.चंद्रकांत पाटील (भूतदया), श्रीम.सारिका पाटील (श्यामचे पोहणे), श्री.विजय पाटील (स्वाभिमान रक्षण), श्रीम.रेखा पाटील (श्रीखंडाच्या वड्या), श्री.विलास पाटील (रघुपती राघव राजाराम), श्रीम.मनिषा पाटील (तीर्थयात्रार्थ पलायन), श्री.कुणाल पवार (स्वावलंबनाची शिकवण), श्रीम.कल्पना साळुंखे (अळणी भाजी), श्री.प्रेमराज पवार (पुनर्जन्म), श्रीम.प्रतिभा पाटील (सात्त्विक प्रेमाची भूक), श्री.रत्नाकर पाटील (दूर्वांची आजी), श्रीम.सुनंदा पवार (आनंदाची दिवाळी), श्री.गोपाल हडपे (अर्धनारी नटेश्वर), श्रीम.गायत्री देसले (सोमवती अवस), श्री.सतिलाल बोरसे (देवाला सारी प्रिय), श्रीम.छाया इसे (बंधुप्रेमाची शिकवण), श्री.निरंजन पेंढारे (उदार पितृहृदय), श्रीम.पाकिजा पिंजारी (सांब सदाशिव पाऊस दे), श्री.जे.एस.पाटील (मोठा होण्यासाठी चोरी), श्रीम.अर्चना बागुल (तू वयाने मोठा नाहीस..मनाने), श्री.मनोहर नेरकर (लाडघरचे तामस्तीर्थ), श्रीम.मनिषा पाटील (कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक), श्री.सचिन पाटील (गरिबांचे मनोरथ), श्रीम.नुतन पाटील (वित्तहानीची हेटाळणी), श्री.रामकृष्ण बाविस्कर (आईचे चिंतामय जीवन), श्रीम.स्वाती कदम (तेल आहे तर मीठ नाही !), श्री.वाल्मिक पाटील (अब्रूचे धिंडवडे), श्रीम.निलम चौधरी (आईचा शेवटचा आजार), श्री.सुधिर चौधरी (सारी प्रेमाने नांदा), श्रीम.रत्ना भदाणे (शेवटची निरवानिरव), श्री.प्रविण पाटील (भस्ममय मूर्ती), श्रीम.सुनिता लोहारे (आईचे स्मृतिश्राध्द) अशाप्रकारे सलग 44 दिवस सुरु असलेल्या संस्कारक्षम उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमास पावसानेही दमदार हजेरी लावून मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र असलेल्या श्यामची आई कथा समाप्तीतून सर्वांना तृप्तीचा आनंद दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button