Nandurbar

..तीने आई नसलेल्या मुलीला शिक्षणासाठी दिले प्रोत्साहन

...तीने आई नसलेल्या मुलीला शिक्षणासाठी दिले प्रोत्साहन

फहिम् शेख नंदुरबार

नंदुरबार : कर्तव्याला जाणिवेची जोड असली तर अनुकूल बदल घडवून आणता येतो हे आमली पुनर्वसन येथील अंगणवाडी सेविका गंगा पाडवी यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी आई नसलेल्या मुलीच्या वडिलांना ‘तुम्हीच तिची आई’ असे समजावताना त्यांच्याकडे मुलीच्या शिक्षणाचा आग्रह धरल्याने ती आता सहावीचे शिक्षण घेत आहे.

अक्कलकुवा तालुक्यात आमली पुनर्वसन येथील अंगणवाडीत गेल्यावर बाहेर काहीतरी हिरवळ दिसते. प्रथमादर्शनी परिसर स्वच्छ ठेवण्याऐवजी ‘हे काय’ गवत आणि रोपटे वाढवून ठेवले अशी प्रतिक्रीया येते. मात्र गंगाताई कौतुकाने त्याविषयी सांगू लागतात आणि आपली आधीची प्रतिक्रीया कौतुकात केव्हा बदलते ते कळत नाही.

अंगणवाडीचा परिसर तसा मोठा असण्याचे कारण नाही. या लहान परिसरातही भाज्यांचे 12 पेक्षा अधिक प्रकार त्यांनी लावले आहे. मुलांच्या आहारात ताजी भाजी असावी असा त्यांचा आग्रह असतो. सध्या अंगणवाडी बंद असली तरी त्यांनी आपली सवय कायम ठेवली आहे.

परिसरात कोथिंबीर, पोकळा, वांगी, टमाटे, पालक, गाजर, कोबी, कढीपत्ता, मुळा, मेथी अशा विविध प्रकारच्या भाज्या अगदी लहानलहान क्षेत्रात लावलेल्या पहायला मिळतात. रोपे वा|ढविण्यासाठी त्यांना पाणी दूरून आणावे लागते. प्रसंगी डोक्यावरून पाणी आणायलाही त्यांची तयारी असते. टंचाईच्या काळात मोठ्या कष्टाने त्यांनी रोपे जगविल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजीत मोलाणी यांनी सांगितले.

शिक्षणातून येणारा अनुभव इतरांसाठी उपयोगात आणता येतो अशी धारणा असणाऱ्या गंगाताईंनी पुस्तक आणि प्रशिक्षणातून मिळणारी माहिती घरोघरी पोहोचविली. आपल्या परिसरातील माता आणि बालके त्यांच्यासारखी कुटुंबासारखी आहेत. म्हणूनच जन्माला आल्यावर केवळ एक किलो वजन असलेले बालक आज त्यांच्या प्रयत्नामुळे गेली चार वर्षे सामान्य जीवन जगत असल्याचे समाधान त्यांना आहे. डिसेंबर महिन्यात असणारी मध्यम कुपोषित बालकांची संख्या त्यांनी 10 वर आणली आहे. ती शून्यावर आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

मातांना पोषण आहार नियमित देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी त्या मार्गदर्शन करतात. मुलींनी अधिक शिकावे यासाठी मुलींना प्रोत्साहन देतात. मुली भविष्यातील माता आहेत. त्यांनी शिक्षण घेतले आणि आरोग्याविषयी माहिती घेतली तर भविष्यात स्थलांतर थांबून बालकांचे आरोग्यही चांगले राहील असे त्यांना वाटते. त्यामुळे आपला अधिकाधिक वेळ गावातील महिलांशी संवादात त्या घालवतात. गावातील प्रतयेक मुल परसबागेतील टवटवीत आणि ताज्या भाज्याप्रमाणे सुपोषित असावे यादिशेने त्यांचे प्रयत्न आहेत.

गंगा पाडवी- महिलांना घरपोच आहार वेळेवर मिळाल्याने आधीपेक्षा स्थलांतर कमी प्रमाणात झाले आहे. पण एवढ्याने मी समाधानी नाही. मुलांच्या शिक्षणासाठी महिलांनी गावातच राहणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाधिक संवाद साधण्याचा प्रयत्न असतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button