Imanwada

साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह संपन्न

साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह संपन्न

राहुल खरात

इमामवाडा, भेंडीबाजार येथील साने गुरुजी कथामाला ह्या संस्थेचा नुकताच ५१ वा मातृदिन सप्ताह पार पडला. थोर समाजसुधारक व शामची आई या लोकप्रिय मराठी पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांची २४ डिसेंबर, २०१९ रोजी १२० वी जयंती व ५१ वा मातृदिन सप्ताह साजरा झाला. दरवर्षी २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर हा सप्ताह साने गुरुजींच्या जयंतीचे औचित्य साधून मातृदिन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ह्या सप्ताहात दर दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व परिसरातील लहान थोरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक वर्षी ह्या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातील मान्यवर आपली उपस्थिती आनंदाने दाखवतात.

ह्या वर्षी सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध व्याख्याता प्रा. प्रज्ञा मराठे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी लहान मुलांसमोर साने गुरुजींचं आयुष्य व त्यांच्यातील सद्गुण गोष्टी रूपाने आणि विविध उदाहरणे सांगून उलगडून दाखवले. उद्याचा भारत घडविणाऱ्या आजच्या लहान मुलांवर व तरुणांवर योग्य संस्कार कसे व का करावेत याबाबतही त्यांनी उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत उपस्थित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री. अरविंद इनामदार साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छबिलदास हाय स्कूल, उरण तेथील श्री. श्रीधर मुळ्ये सर यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात जिद्दीने कसे पुढे जावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ श्री दिपक सोनवणे MBBS DCS, जगजीवन राम हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी मुलांनी आपल्या आरोग्याची काळजी पालकांच्या मदतीने कशी घ्यावी हे समजावले.

दिनांक २५ डिसेंबर, २०१९ रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धांच्या उदघाटनासाठी श्री चौधरी (पोलीस उपनिरीक्षक) सर ज. जी. मार्ग पोलीस स्टेशन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली व पूज्य साने गुरुजींचे चित्र रेखाटत मुलांसह दिलखुलास गप्पा मारल्या.

दिनांक २६ डिसेंबर, २०१९ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धांमध्ये लहान मुलांसाठी बडबडगीते व श्लोक असे विषय नेमून दिले होते तर शालेय मुलांना साने गुरुजींच्या आयुष्यातील कथांवर प्रकाशझोत टाकायचा होता. खुल्या गटासाठी मी निसर्ग बोलत आहे व माझ्या कल्पनेतील इमाम वाडा असे विषय देण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला श्री शेखर नार्वेकर , चिंचबंदर – डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा समिती प्रमुख आणि सहचिटणीस त्याचबरोबर श्रीमती पल्लवी घरटे सावळे ह्यांनी परिक्षणाची जबाबदारी सांभाळली.

दिनांक २७ डिसेंबर रोजी आनंद जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या जत्रेत परिसरातील रहिवाश्यांनी आपापले स्टॉल्स लावले होते. ज्यात त्यांनी विविध खाद्यपदार्थ, कपडे व दागिने ह्यांचे प्रदर्शन भरवले होते. याचबरोबर विविध खेळही आयोजित करण्यात आले होते. अबालवृध्दानी आनंदजत्रेचा मनमुराद आनंद लुटला.

दिनांक २८ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या दिवशी नृत्य, गायन व अभिनय कलांची बहारदार अभिव्यक्ती झाली. सदर नृत्यांच्या दिग्दर्शनासाठी कार्यकर्ते श्री दिनेश चोरगे यांचे सहकार्य लाभले. उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना मानवंदना देणारे व भारतील सैन्य दलाची गौरवगाथा गाणारे एक नृत्य सादरीकरण ह्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले.

दिनांक २९ डिसेंबर रोजी साभिनय वेशभूषा या नाविन्यपूर्ण संकल्पनेसह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत लहान व मोठा असे दोन गट होते. सर्वच स्पर्धकांनी विविध वस्तूंचा उपयोग करत विविध शैलीची वेशभूषा केली होती. हीही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. या स्पर्धेस पत्रकार व सिने-नाट्य दिग्दर्शक श्री महेश्वर तेटाबे, चित्रपट निर्माते श्री सुरेश डाळे-पाटील व सुर्वे मॅडम जे .जे. स्कूल ऑफ फाईन आर्टस् यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.

सप्ताहातील अखेरचा दिवस ,३० डिसेंबर रोजी संपूर्ण सप्ताहात ज्या स्पर्धा पार पडल्या त्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. ह्या समारंभास माननीय महापौर मुंबई सौं किशोरीताई पेडणेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखविली. त्यांच्यासोबत मराठी सिनेकलाकार श्री मिलिंद दस्ताने उर्फ आबा (तुझ्यात जीव रंगला झी मराठी), श्री यशवंत क्षीरसागर संस्थापक अध्यक्ष साने गुरुजी कथामाला, श्री केशव मुळे अध्यक्ष मनसे दक्षिण मुंबई मुंबादेवी विभाग, श्री पांडुरंग सकपाळ विभागप्रमुख दक्षिण मुंबई, श्री सत्यवान जावकर माजी नगरसेवक उमरखाडी विभाग तसेच कथामालेचे आजीवन सभासद यांच्या बरोबर कुमारी केतकी खानविलकर धनुर्विद्या सुवर्णपदक मानकरी , मुंबई जिल्हा २०१९-२० यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. इमारतीतील रहिवासी श्रीमती जयश्री महाजन यांनी मुलांसाठी स्वतः केक बनवून आणला.
याच दिवशी पाहुण्यांसोबत सर्व मुलांचा व थोरा – मोठ्यांचाही सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी मातृदिन सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सामुदायिक वाढदिवस व बक्षीस समारंभ पार पडतो. सामुदायिक वाढदिवस ही प्रथा सामाजिक भान व बांधिलकी जपणारी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. इमाम वाडा साने गुरुजी कथामाला जेव्हा १९६९ साली सुरू करण्यात आली तेव्हा येथील परिसर हा लहान मुलांच्या संस्कारक्षम जडणघडणी साठी तर पोषक नव्हताच पण आपल्या पाल्यांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याची बऱ्याच पालकांची आर्थिक क्षमताही नव्हती. त्यामुळे मुलांना स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागे. तेव्हा आपल्या परिसरातील मुलांचे एकाच दिवशी वाढदिवस एकत्रितपणे म्हणजे सामुदायिकरित्या साजरे करण्याची प्रथा सुरू झाली व जी आज ५१ वर्षे चालू आहे.

इमाम वाडा साने गुरुजी कथामाला ही अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संघटनेशी संलग्न असून ह्या कथामालेला सर्वोत्कृष्ट कथामाला म्हणून तत्कालीन लोकसभा अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. कोणत्याही बहिर्गत आर्थिक पाठबळा शिवाय गेली ५१ वर्षे लहान मुलांवर संस्कार घडविण्याचे अविरतपणे काम करणारी इमाम वाडा साने गुरुजी कथामाला ही मुंबई तील एकमेव कथामाला आहे. सदर सप्ताहाचे आयोजन व नियोजन कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री निवृत्ती तारी , श्री मंगेश डिचवलकर यांच्यासमवेत सर्व आजी माजी सभासद व श्री लक्ष्मी नारायण सोसायटी रहिवासी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

Leave a Reply

Back to top button