Mumbai

साकीनाका रेप प्रकरण..परप्रांतातून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवा..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश…शक्ती विधेयक मांडणार..

साकीनाका रेप प्रकरण..परप्रांतातून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवा..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश…

ठळक मुद्दे

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर आज आढावा बैठक संपन्न..

बैठकीत गृहमंत्री सह पोलीस महासंचालक उपस्थित

पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी मुख्यमंत्र्यांचे आदेश

येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयाची नोंद ठेवा

शक्ती कायद्याचे विधेयक विधानसभेत सादर करणार

महिलांची माता भगिनींच्या सुरक्षितते संदर्भात कोणतीही तडजोड नाही

मुंबई साकीनाका प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत परप्रांतीयांची नोंद ठेवा, असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो? कुठे जातो? याची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. या बैठकीत राज्यातील महिला अत्याचारांवर चर्चा झाली.

राज्याला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतील साकिनाका येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींने गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी महिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या आरोपीवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षेशी संबंधित अनेक महत्वाच्या सूचना पोलिसांना केल्या. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ऑटो रिक्षांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंद करण्यात यावी. तसेच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करण्यात यावे, अशी महत्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवणे आवश्यक असून ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटनांचा जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो, पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. निती आयोगाची आज मंगळवारी बैठक होणार असून जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर द्यावा, तसेच महिला पोलीसांनी पीडित महिलांशी संवाद साधत त्यांच्याशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. शिवाय त्यांच्या छोट्या तक्रारींकडेदेखील दुर्लक्ष होता कामा नये,असे मुख्यमंत्री म्हणाले.

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत, असे सांगत या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही तसेच आरोपींची गय केली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

महिलांच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृहविभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणार्‍या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button