Pandharpur

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून बंद केलेली प्रसुती योजना पुन्हा सुरू करा- श्रीकांत शिंदे

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून बंद केलेली प्रसुती योजना पुन्हा सुरू करा- श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी युवकची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर-महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून प्रसूती, शस्त्रक्रिया, सिजरचे ऑपरेशन आणि जागेचा समावेश ही योजना मुळात ग्रामीण भागातील जनतेला शासकीय संस्थेमध्ये दूर जायला लागू नये आणि खाजगी दवाखान्यामध्ये पैसे खर्च होऊ नयेत म्हणून निर्माण केली. त्यामुळे कोवीड-19 च्या काळात जनतेची खूप मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे व अनेकांना याचा लाभ मिळालेला आहे. अशा शासनमान्य दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोकांना चांगल्या दर्जाची सेवा विनामूल्य मिळाली. याबाबत गोरगरीब जनता शासनाची खूप आभारी असल्याची भावना सर्वत्र आहे परंतु आता कोवीड -19 संपूर्णपणे संपलेला आहे असे समजून सदरची योजना बंद केली आहे यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आर्थिक अडचण जाणवत आहे. याचा विचार सदरची प्रसुती योजना पुन्हा एकदा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.सदरचे निवेदन देताना पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष दादा थिटे, मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष संतोष बंडगर, युवक तालुका कार्याध्यक्ष बालाजी कवडे आदि उपस्थित होते.
वास्तविक पाहता कोरोनाही अजून संपलेला नाही. ओमायक्रोनचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. शाळा-कॉलेज पुन्हा बंद होत आहे. अशा परिस्थितीत पूर्वीप्रमाणे गोरगरीब लोकांना जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जावे लागणार आहे कारण प्राथमिक आरोग्य केंद्रे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय या ठिकाणचा सर्व कर्मचारी वृंद व डॉक्टर्स अजूनही कोवीड-19 नियंत्रणाचे काम म्हणून 15 ते 18 वयोगटातील तरुण नागरिकांचे लसीकरण, 60 वर्षे वयोगट असलेल्या लोकांचे, इतर आजार असलेले लोकांचे लसीकरण करण्यात व शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.
त्यामुळे प्रसुतीच्या सेवा देण्यामध्ये कोणत्याही नर्स, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर ना वेळेवर उपलब्ध नाहीत तेव्हा अशा परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालये या ठिकाणी दूर दूर जाण्यापेक्षा खाजगी हॉस्पिटलला जाऊन भरमसाठ पैसा देऊन, प्रसूती करून घ्यावी लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अजून काही महिने तरी ही सेवा बंद न करता पुर्वीप्रमाणे चालू ठेवायला हवी.
विशेष म्हणजे अनेक खाजगी रुग्णालये ही प्रसुतीची सेवा इतक्या कमी पैशात द्यायला तयार नाहीत. परंतु अत्यंत कमी फायदा होत असला तरी गोरगरिबांना सेवा मिळाव्यात या उद्देशाने काही खाजगी हॉस्पिटलने तयारी दर्शवली आहे त्यामुळे त्यांचे मनोबल खचू नये व ही सेवा अजून व्यापक व्हावी म्हणून कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे.ज्या खाजगी शासनमान्य हॉस्पिटल मार्फत सेवा दिल्या त्यांच्यामुळेच शासकीय संस्थेत मोफत सेवा जशी दिली जाते जाते त्यापेक्षा अधिक चांगल्या व गुणवत्तापूर्ण पद्धतीने सेवा दिल्या म्हणून तर मोठ्या प्रमाणावर प्रसूती झाल्या. शासकीय संस्थेमध्ये पूर्वी या सेवा होत्या च पण काही खासगी हॉस्पिटलला परवानगी देतात या प्रसूतीचे प्रमाण कितीतरी पटीने का वाढले ? याचा विचार शासनाने करायला हवा. कारण तेवढ्याच पटीने आता गोरगरीब जनतेला खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन आर्थिक भुर्दंड सोसून प्रसूती करून घ्यावी लागणार आहे याची विचार करून योजना पुर्वीप्रमाणे सुरू करावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button