Bollywood

जय भीम च्या निमित्तान.. हे आहेत जातिव्यवस्थेवर भाष्य करणारे पहा 12 चित्रपट…

जय भीम च्या निमित्तान.. हे आहेत जातिवादावर भाष्य करणारे पहा 12 चित्रपट…

एकंदरच जातीवादावर भाष्य करणारा आणि बहुजन लोकांच्या समस्यांना वाचा फोडणारा आणि जस्टीस के.चंद्रू यांच्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे.
मेनस्ट्रीम सिनेमातून असं परखड भाष्य फार कमी केलं जातं, बॉलीवूडमध्ये तर ते फार क्वचित बघायला मिळतं आणि जरी केलं गेलं तरी ते पॉलिटिकली करेक्ट करण्याच्या प्रयत्नात असतात, पण गेल्या काही महिन्यांपासून साऊथच्या सिनेमातून असं परखड भाष्य बऱ्याच सिनेमातून होताना आपण बघत आहोत.
आज या लेखातून आपण अशाच काही सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यातून जातीवादावर भाष्य करण्याचं धाडस दिग्दर्शकाने केलं आणि प्रेक्षकांनीसुद्धा अशा प्रयत्नांना मनापासून दाद दिली.

1 असुरन

वेत्रीमारन आणि सुपरस्टार धनुषचा असुरन कुणीच विसरू शकणार नाही. तामिळनाडूमधलं एक दलित कुटुंबच स्वतःच्या अस्तित्वासाठी कसं सवर्ण समाजाशी दोन हात करतं, हे दाखवताना दिग्दर्शकाने कुठेही हात आखडता घेतला नसून, खूप परखड भाष्य या कथेतून केलं गेलं आहे.
या सिनेमात दाखवलेलं वास्तव बघताना खरंच काही ठिकाणी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. धनुषसारखा मोठा स्टार या सिनेमात असूनसुद्धा सिनेमा कुठेही भरकटत नाही.

2 अंकुर

श्याम बेनेगल यांची पहिली फिचर फिल्म आणि शबाना आजमीचा पहिला सिनेमा ‘अंकुर’ हा सुद्धा त्याकाळचा बोल्ड सिनेमाच होता. एक विवाहित पुरुष एका खालच्या जातीच्या महिलेच्या प्रेमात पडतो आणि नंतर त्यामुळे गावात सगळीकडेच चर्चा होते.
त्यानंतर २ महिलांमध्ये निर्माण होणारा तणाव, सामाजिक विषमता आणि लोकांची मानसिकता दाखवण्यात बेनेगल यांना यश मिळालं, आजच्या काळाशीही सुसंगत असा सिनेमा देणाऱ्या शाम बेनेगल यांचे यासाठी आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

3 सैराट

मराठी चित्रपटसृष्टीत क्रांति घडवणारा चित्रपट कोणता तर पहिले नाव येतं ते सैराटचं. सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केलीच पण बॉलीवूडलासुद्धा या सिनेमाचा रिमेक करायचा मोह आवरला नाही.
सामाजिक विषमता आणि त्यामुळे निर्माण होणारी ऑनर किलिंगची समस्या ही नागराज मंजुळेने ज्या पद्धतीने दाखवली आहे तसं आजवर कोणत्याच सिनेमातून समोर आलेलं नाही.
लव्हस्टोरीमध्ये छान झुरवत हा सिनेमा तुम्हाला धाडकन जमिनीवर आदळतो आणि समाजातलं भीषण वास्तव दाखवतो तेव्हा आपण सगळेच सुन्न होतो!

4 आर्टिकल 15

उत्तर प्रदेशच्या बदाऊन गॅंगरेप प्रकरणावर बेतलेला अनुभव सिन्हाच्या या सिनेमाचीसुद्धा चांगलीच चर्चा झाली होती. सिनेमा खूप डार्क होता आणि आयुष्मानसारख्या अभिनेत्याचा अप्रतिम अभिनय आणि इतर कलाकारांची साथ यामुळेच हा सिनेमा लोकांच्या लक्षात राहिला.
जातीमुळे एका मुलीवर अनन्वित अत्याचार होतात आणि त्यानंतर त्यांच्या समाजाचा लढा देतो आणि पोलिस यंत्रणेतल्या त्रुटी अशा बऱ्याच गोष्टी या सिनेमात अधोरेखित केल्या गेल्या!

5 मसान

घाटावर अंतिम संस्कार पार पडणाऱ्या कुटुंबातला एक मुलगा आणि चांगल्या उच्चभ्रू घरातली मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्याच कहाणीला समांतर जाणारी एका तरुणीची कहाणी असलेला मसान या सिनेमाला लोकांनी पसंती दर्शवली.
स्त्रीकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन आणि जातिभेद या गोष्टी सिनेमातून खूप प्रभावीपणे दाखवल्या गेल्या. विकी कौशल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, रिचा, संजय मिश्रा यांच्या लाजवाब अभिनयाने नटलेला हा सिनेमासुद्धा आपल्याला बरंच काही शिकवून जातो.

6 मांझी द माऊंटन मॅन

दशरथ मांझी ज्यांनी एक भला मोठा पर्वत फोडून गावातल्या लोकांसाठी रस्ता तयार केला त्यांच्यावर आधारीत या सिनेमातसुद्धा जातीवादावर टीका केली गेली.
पत्नीच्या मृत्यूनंतर दशरथ यांच्या संघर्षाला या सिनेमात अधोरेखित केलं आहे. नवाजुद्दीन आणि राधिका आपटे यांनी या सिनेमात खूप अप्रतिम काम केलं आहे!

7 कर्णन

२०२१ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.क्षणी या सिनेमाचं दिग्दर्शन मारी सेल्वराज आणि निर्मिती कालैपुली यांनी केलं आहे. धनुष, राजीषा, लाल, नटराजन आणि इतर हि प्रमुख कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची सुरुवातच खूप संवेदनशील अशी सुरु होते. एक मुलगी रस्त्याच्यामध्येच फिटने तडफडून मरत आहे. आजूबाजूने अनेक बस – गाड्या जात आहेत पण कोणीही तिच्या मदतीला थांबत नाही. याच सुरुवातीच्या प्रसंगाला धरून संपूर्ण चित्रपटाची कथा आधारलेली आहे. या चित्रपटात एक असे गाव दाखविले आहे. जिथे बस थांबत नाही कारण त्या गावात दलित – वंचित समाज राहत असतात. जर या गावाला बस मिळाली तर या गावातील लोक बाहेर सहज शिक्षण घेऊ शकतील, नोकरी करू शकतील आणि गावाचा विकास होऊ शकतो. हाच गावातील विकास होऊ नये म्हणून आजूबाजूच्या गावातील राजकारणी येथे बस थांबू देत नाही. हे गाव कायम दलित – वंचित आणि अविकसित राहावे म्हणून गावातील विकासाचे मार्ग हे अनेकदा थांबविले गेले आहे. कर्णन म्हणजे एक असा तरुण आहे ज्याला हि विषमता नष्ट करण्यासाठी कशाचेही भय नाही. ज्याचा समता – शिक्षण आणि संघर्ष यावर विश्वास आहे. अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो असा विचार करणारा आहे.

एकाचवेळी भीती, प्रेम, आनंद, आणि अचानक काळजाचा ठोका चुकवणारे प्रसंग, प्रचंड करुणा आणि शेवट या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळेल. उत्तम कथेसोबतच धनुषची अप्रतिम भूमिका या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळेल. या दोन्ही चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “शिका – संघटीत व्हा आणि संघर्ष करा.” या ब्रीद वाक्याला धरून दोन्ही संघर्ष दाखविले आहेत. दोन्ही चित्रपटांच्या अखेरीस “शिक्षणाच्या प्रकाशाची” एक सकारात्मक बाजू या दोन्ही चित्रपटातून उत्तम पद्धतीने मांडली आहे.

8 सुजाता

नूतन यांच्या कारकीर्दीच्या वेगवान प्रवासात बिमल रॉय दिग्दर्शित सुजाता (१९५९) ह्या नववास्तववादी चित्रपटाच्या रूपाने एक नवे वळण आले. जातिधर्माच्या भिंती खड्या असलेल्या भारतीय समाजाच्या पार्श्वभूमीवर एक अस्पृश्य, अनाथ आणि अशिक्षित मुलगी आणि उच्चवर्गीय, सुशिक्षित तरुण यांच्यामध्ये उमलत गेलेल्या प्रेमाची कथा ही ह्या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना होती. अनेक चित्रपटांत आकर्षक, आधुनिक व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या नूतन यांनी या चित्रपटातून एका अस्पृश्य तरुणीची भूमिका ताकदीने साकारली. सुजाता या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात उमटलेल्या ‘मी कोण आहे?’ ह्या प्रश्नाने सनातनी भारतीय समाजव्यवस्थेसमोर एक प्रश्नचिन्ह उभे केले. ह्या व्यक्तिरेखेचे रसरशीत माणूसपण नूतन यांनी सहजसाध्या रूपातून आणि संयमित अभिनयातून जिवंत केले.

9 पेरीयेरुम पेरुमल

मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शित केलेला ‘पेरीयेरुम पेरुमल’ या सिनेमाची रणजीत यांनी निर्मिती केली. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक पाटी दिसते – ‘जात आणि धर्म हे मानवतेच्या विरोधात आहेत’ या फिल्ममधल्या मुख्य पात्राला आंबेडकरांसारखं वकील व्हायचं असतं.

‘पेरीयेरुम पेरुमल’ सिनेमाच्या मध्याच्या सुमारास काही पुरुष 1983 मधल्या ‘पोरादादा’ या गाण्यावर नाचताना दिसतात. प्रसिद्ध संगीतकार आणि स्वतः दलित असणाऱ्या इलायाराजा यांनी या गीताला संगीत दिलं होतं. या गाण्याचे शब्द म्हणतात, “आम्ही तुमचं सिंहासन बळकावू…आमचा विजयोत्सव सगळ्यांना ऐकू जाईल आणि त्याचा उजेड जगभर पसरेल..उपेक्षित समाज लढा देईल.”सेल्वराज यांच्या कर्णन या 2021च्या सिनेमातही हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत होतं. या गाण्याला आता ‘दलित अँथम’ म्हटलं जातंय.

10 फँड्री

हिबगोष्ट आहे गावातली डुकरं पकडण्याचं काम करणाऱ्या एका कुटुंबातला तरूण मुलगा आणि त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीची.ह्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट कोवळ्या वयातील प्रेम आणि त्याला असलेली जातीव्यवस्थेतील दाहकतेची किनार पडद्यावर दाखवण्यात दोनशे टक्के यशस्वी ठरला आहे. एक चित्रपट म्हणून त्याच्यात जो काही मसाला आवश्यक आहे, तो असतानाच त्याच्या जोडीला तो माहितीपट न वाटता, सत्तर एमएम पडद्यावर सर्वांनी पहावा आणि पाहिल्यावर प्रत्येकाला अंतर्मुख करणारा हा चित्रपट आहे. काही चित्रपट हे फक्त संख्येत भर न घालता, चित्रपटाच्या परिभाषेला पुढे घेऊन जात असतात, ‘फॅंड्री’ हा त्यापैकीच एक.

11 सरपट्टा परमबराई

रणजीत यांचा ‘सरपट्टा परमबराई’ हा जवळपास तीन तासांचा आहे. चेन्नईतल्या दलितांमधल्या बॉक्सिंगच्या आवडीविषयी हा सिनेमा आहे. बॉक्सर महंमद अली आणि त्यांनी व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकेतल्या वंशभेदाविषयी घेतलेल्या भूमिकेवरून प्रेरणा घेत हा सिनेमा तयार करण्यात आला.

12 मादथी : अॅन अनफेअरी टेल

तामिळ सिनेमांतल्या दलित पात्रांचं वाजवीपेक्षा जास्त कौतुक होत असल्याचं काहींना वाटतंय. 2019मध्ये आलेल्या मादथी : अॅन अनफेअरी टेल या सिनेमाचं दिग्दर्शन लीना मणीमेकलाई यांनी केलं होतं. यामध्ये उपेक्षित दलित समाजातल्या तरुण महिलेची व्यथित करणारी कथा होती.

लीना मणीमेकलाई यांच्या मते अजूनही सिनेमांत तोच हिरो, पुरुषार्थ असतो. सगळं भव्यदिव्य असतं. महिलांची पात्रं ही फक्त तोंडी लावण्यापुरती किंवा त्यांचे नवरे किंवा प्रेमींच्या चीअरलीडर्ससारखी असतात आणि या सिनेमांतले उपेक्षित समाज कुऱ्हाड, बंदूक आणि कोयता घेऊन त्यांना पिढ्यानपिढ्याच्या अन्यायापासून वाचवायला येणाऱ्या हिरोच्या प्रतीक्षेत असतात.

पण प्रेक्षक नवीन धाटणीचा सिनेमा पाहतात हे आता स्पष्ट झालंय. जय भीम थिएटर्समध्ये प्रसिद्ध झालेला नसल्याने त्याची लोकप्रियता दर्शवणारी बॉक्स ऑफिस कामगिरीची आकडेवारी उपलब्ध नाही. पण प्रेक्षकांनी IMDb वर दिलेलं 9.6 रेटिंग या सिनेमाला पहिल्या क्रमांकाचं स्थान देऊन गेलंय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button