Pune

नीरा भीमा कारखान्याचे ट्रॅक्टर धावणार सीएनजी गॅसवर- हर्षवर्धन पाटील – कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती – चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार

नीरा भीमा कारखान्याचे ट्रॅक्टर धावणार सीएनजी गॅसवर- हर्षवर्धन पाटील
– कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती
– चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार

दत्ता पारेकर पुणे

पुणे : शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून सीएनजी गॅसवर धावणार आहेत. राज्यातील साखर उद्योगासाठी हे क्रांतीकारक पाऊल असून, निरा भीमा कारखान्यावरतीच सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार (दि.30) दिली.
मांजरी बु. पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी आज बैठक पार पडली. चालू वर्षीपासून नीरा भीमा कारखान्याचे ऊस वाहतूकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर प्रायोगिक चालणार चालविले जाणार आहेत. राज्यात नीरा भीमासह एकूण 5 साखर कारखान्यांमध्ये सीएनजी गॅसवर प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅक्‍टर चालविण्यात येणार आहेत. ट्रॅक्टरच्या इंधन खर्चात सीएनजी गॅस वापरामुळे सुमारे 50 टक्के बचत होणार आहे तसेच ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढून प्रदूषणातही घट होणार आहे. शिवाय कारखान्यांचा ऊस वाहतुकीचा खर्च कमी होऊन त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्य अधिकारी संभाजीराव कडू-पाटील, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, प्रा.एस.व्ही.पाटील, केंद्र सरकारच्या मध्यवर्ती रस्ते वाहतूकचे अधिकारी राजेंद्र सानेर-पाटील, विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, निरा भिमा कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, के.ए.गायकवाड आदी उपस्थित होते.
निरा भीमावरती चालू वर्षी देशातील पहिला बायो सीएनजी प्रकल्प

निरा भिमा सहकारी साखर कारखान्यामध्ये चालू वर्षी पासून बायोमासवर आधारित देशातील पहिला बायोसीएनजी गॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरसाठी लागणारा सीएनजी गॅस हा कारखान्यावरती उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात इंदापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्यासाठी सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे कारखान्याची धोरण आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांच्या इंधन खर्चात मोठी बचत होऊन मोठा आर्थिक फायदा होणार आहे. वाहनांच्या वाढत्या इंधन खर्चात बचत करणेसाठी सीएनजी गॅस वापरणे हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button