Pandharpur

विठ्ठल परिवाराच्या नेतृत्वासाठी आता नव्या पिढीत संघर्ष !

विठ्ठल परिवाराच्या नेतृत्वासाठी आता नव्या पिढीत संघर्ष !

रफिक आतार

पंढरपूर : पंढरपूर तालुका आणि आजुबाजूच्या तीन तालुक्यांवर प्रभाव असणाऱ्या विठ्ठल परिवारात आता नव्या पिढीत नेतृत्वावरून संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. आमदार कै. भारत भालके व कै. राजूबापू पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी या परिवारात निर्माण झाली आहे. येथील विधानसभा पोटनिवडणूक याचबरोबर होणारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी व याचबरोबर राष्ट्रवादी पक्षावर पकड मिळविण्यासाठी भगीरथ भालके यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे कै. औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनीही आता उघडपणे राजकीय संघर्षाची भूमिका घेतली आहे व यास राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा दिसत आहे.
कै. भारत भालके यांनी स्व.वसंतराव काळे यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 2002 पासून ते या परिवाराचे नेतृत्व करत राहिले. याच काळात त्यांनी कल्याणराव काळे, राजूबापू पाटील यांना बरोबर घेत विठ्ठल परिवारातील अंतर्गत धुसफूस कमी केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाने त्यांची गणित सोपी होत गेली होती. मात्र 2020 च्या नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी शांत व संयमी नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख होती त्या राजूबापू पाटील यांचेही निधन झाले. यामुळे विठ्ठल परिवारात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना केल्यानंतर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडीत संचालकांनी भालके यांना अध्यक्ष केले.मात्र तत्पूर्वीही युवराज पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला होता.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी पंढरपूर तालुक्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते माजी आमदार कै. औदुंबरआण्णा पाटील यांनी केली आहे. त्यांना साथ स्व.यशवंतभाऊ पाटील यांनी दिली होती. मात्र नंतरच्या काळात कै.आण्णांचे सुपूत्र कै.राजाभाऊ पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष असताना वसंतराव काळे व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणला व कारखाना ताब्यात घेतला. वसंतराव काळे यांच्या निधनानंतर भारत भालके अध्यक्ष झाले व जवळपास 19 वर्षे त्यांच्या हाती विठ्ठल परिवाराची सत्ता होती. तीन सलग विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्यांची परिवाराची पकड मजबूत झाली होती. त्यांच्या पश्‍चात त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना अध्यक्षपद देण्यात आले. आता पोटनिवडणुकीसाठी भालके यांचेच नाव आघाडीवर आहे.सध्या भगीरथ भालके व काही महिन्यांपूर्वी भाजपात गेलेले सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. काळे हे विठ्ठल परिवारातील नेते असले तरी त्यांनी त्यांची साखर कारखानदारी व संस्था उभ्या केल्या आहेत. काळे व भालके यांच्यात समन्वय राहावा अशी इच्छा कदाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीच असावी असे दिसते कारण भारत भालके यांच्या निधनानंतर शरद पवार व काळे यांच्यात संवाद वाढला आहे.दरम्यान भगीरथ भालके यांनी काढलेल्या जनसंवाद यात्रेवरून तत्कालीन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांनी आक्षेप घेतला होता.कारण त्या पत्रिकेत कल्याणराव काळे यांचे नाव होते. काळे यांनी अधिकृतपणे भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली नाही आणि राष्ट्रवादीचे घड्याळ ही हातावर बांधलेले नाही. काळे व ॲड. दीपक पवार यांच्यात साखर कारखानदारी व भाळवणी गटातील राजकारणामुळे संघर्ष आहे. दीपक पवार यांनी पडत्या काळात राष्ट्रवादीला तालुक्यात चांगली ताकद मिळवून दिली असताना अचानक त्यांना पदावरून रविवारी 28 फेब्रुवारी रोजी दूर करून भगीरथ भालके यांचे निकटवर्तीय व विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख यांना संधी देण्यात आली व यावरून पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला. ॲड. पवार यांना पुन्हा पदावर आणावे अशी मागणी युवराज पाटील तसेच कै. राजूबापू पाटील यांचे चिरंजीव तथा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी युवराज पाटील यांनी थेट विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत गणेश पाटील यांना बरोबर घेत पॅनल उभा करणार असल्याचे जाहीर करत भगीरथ भालके यांना आव्हानं दिले आहे.राष्ट्रवादी पक्षात पदाधिकारी निवडीवरून सुरू झालेला वाद आता विठ्ठल परिवारातच वाढत चालला आहे. या आडून विठ्ठल कारखान्याची निवडणूक व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button