Belgaon

? धक्कादायक..ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने विजय पॅनलप्रमुखचा खून

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने विजय पॅनलप्रमुखचा खून

हुक्केरी (जि. बेळगाव) : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता. 30 डिसेंबर) जाहीर झाला. त्यात सुलतानपूर (ता. हुक्केरी) येथे एका पॅनेलचे 10 पैकी 10 उमेदवार विजयी झाले. हे सहन न झाल्याने विरोधी गटाने विजयी पॅनेलप्रमुखाचा खून केला.
शानूरसाब दस्तगीरसाब मुल्ला असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन माहिती घेतली. हुक्केरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
या प्रकरणी मोहसीन बादशाह काझी (वय 21, रा. सुलतानपूर), तौसिफ जावलसाब सनदी (वय 21, रा. मसरगुप्पी), सुलतानसाब मोहद्दीनसाब मुल्ला (वय 45, रा.
सुलतानपूर), जहांगीरसाब गजबरसाब मुल्ला (वय 51, रा. सुलतानपूर), दस्तगीर गजबरसाब मुल्ला (वय 40, रा. सुलतानपूर), हसनसाब गजबरसाब मुल्ला (वय 30, रा. सुलतानपूर) या संशयित आरोपींना अटक केली. हुक्केरी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यावर गोकाक उपकारागृहात रवानगी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, सुलतानपूर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांत चुरस होती. बुधवारी (ता. 30) निकाल लागला. तेव्हा शानूरसाब मुल्ला पॅनेलमधील 10 पैकी 10 उमेदवार जिंकले. या पराभवामुळे मानहानी झालेल्या विरोधकांनी बुधवारी रात्री शानूरसाब मुल्ला यांच्या घरावर हल्ला केला. प्राणघातक हल्ला झाल्याने गंभीर जखमी झालेल्या शानूरसाब यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा मृत्यू झाला.
याबाबत मृत शानूरसाब मुल्ला यांचा मुलगा मलिकजान मुल्ला यांनी सांगितले, की आमच्या पॅनेलचा विजय झालेला सहन न झाल्याने विरोधी गटातील लोकांनी रात्री अकराच्या सुमारास आपल्या वडिलांना मारहाण करून त्यांचा खून केला.
बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, मंडल पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व उपनिरीक्षक सिद्राम उन्नद यांनी सुलतानपूरला भेट देऊन माहिती घेतली. तसेच, पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी तत्काळ पावले उचलून संशयितांना अटक केली.

Leave a Reply

Back to top button