Maharashtra

कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार

कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी पी व्ही आनंद

कल्याण – मुंबईसह संपूर्ण एमएमआर प्रदेशात करोना साथीचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०० आयसीयू बेड्स आणि २०० ऑक्सिजन बेड्स वाढवण्याचा निर्णय शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी तातडीने जागेची निश्चिती करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन एक टीम म्हणून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मुंबईसह एमएमआर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अस्थायी रुग्णालयांची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात ठाण्यातील बाळकुम येथे एक हजार २४ खाटांचे अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेले रुग्णालय आणि नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटर येथे १२०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी आयसीयू, डायलिसिस सुविधा, एक्स रे, पॅथॉलॉजी आदी सर्व सुविधा असल्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यापाठोपाठ अंबरनाथ येथे ७०० बेड्सचे रुग्णालय आणि उल्हासनगर येथे ३०० बेड्सच्या रुग्णालयाचे लोकार्पणही श्री. शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले. डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुलातही २०० बेड्सच्या अस्थायी रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला. आचार्य अत्रे नाट्यगृह येथील सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड१९ रुग्णांकरिता बेड्सची संख्या वाढवण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हयगय न करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. तसेच, घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंगवर भर देण्यासही त्यांनी सांगितले. डोंबिवलीत पाटीदार सेंटर येथे क्वारंटाईन सेंटर, सावळाराम क्रीडा संकुलात कोविड रुग्णालय, कल्याण पश्चिम लाल चौकी येथे महापालिका इमारतीत क्वारंटाईन सेंटर, तसेच कल्याण पूर्व येथे सांस्कृतिक कला केंद्रात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे नियोजन असून त्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. डॉक्टर, परिचारिका, सपोर्टिंग स्टाफ यांचे मनुष्यबळ वाढवण्यात यावे, रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून १७ कोटी रुपयांचा निधी करोनाच्या मुकाबल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून गरज भासल्यास आणखीन मदत उपलब्ध करून देण्यात येईल, परंतु कोरोनाबाधित रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळण्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला.
सदर बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, राजू पाटील, महापौर विनिता राणे, विरोधी पक्षनेते राहुल दामले, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button