Chandwad

छत्रपती संभाजीराजेंच्या..तेजस्वी बलिदानाची कुचेष्टा ठाकरे यांनी हिंदु समाजाची माफी मागावी- आ.डॉ.राहुल आहेर

छत्रपती संभाजीराजेंच्या..तेजस्वी बलिदानाची कुचेष्टा ठाकरे यांनी हिंदु समाजाची माफी मागावी- आ.डॉ.राहुल आहेर

उदय वायकोळे चांदवड

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत स्वाभिमानाने संघर्ष करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला असे अवमानास्पद उदगार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या असून संभाजीराजेंच्या तेजस्वी बलिदानाची वध अशा शब्दात उपेक्षा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी हिंदु समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी जोरदार मागणी भाजपचे आ.डॉ.राहुल आहेर यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूरच्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट जनतेसमोर न येता केलेल्या आभासी भाषणात छत्रपती संभाजीराजेंचा वध झाला असे जाणीवपूर्वक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. दुष्ट प्रवृत्तींना ठार मारणे या अर्थाने वध या शब्दाचा वापर होतो. मराठी भाषेचा बेगडी अभिमान बाळगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अर्थ माहीत असतानाही, संभाजीराजांची हत्या केली या वाक्यात दुरुस्ती केल्याचे भासवत वध केला असे शब्द वापरले. हिंदुत्वाचे वावडे असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत आपण बोलत आहोत व हिंदु धर्माच्या तेजस्वी इतिहासाची नेहमीच उपेक्षा करणाऱ्या काँग्रेसच्या सभेत संभाजीराजांच्या धर्माभिमानाचे उदाहरण रुचणार नाही हे लक्षात आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हत्या हा शब्द वगळून वध असा शब्द वापरला. संभाजीराजेंनी धर्मासाठी बलिदान दिले. धर्मरक्षणाचे तेजस्वी उदाहरण म्हणून त्यांच्या जीवनाकडे आणि अखेरच्या श्वासापर्यंतच्या इतिहासाकडे पाहिले जाते. असे असतानाही, संभाजीराजेंचा वध केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या बलिदानाची उपेक्षा केली असा आरोप आ.डॉ.राहुल आहेर यांनी केला.
हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्ता सांभाळण्याची कसरत करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदुत्वाची कुचेष्टा सुरु आहे. दाऊदच्या देशद्रोही कारवायांना मदत करणाऱ्यांची पाठ थोपटून आगे बढो अशा शब्दांत प्रोत्साहन देणारे, सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुह्रदयसम्राट हा बहुमान बदलून त्यांनाही जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणारे, आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याकांच्या अनुनयास हातभार लावत अजान स्पर्धांचे आयोजन करून हिंदु समाजाच्या भावनांवर मीठ चोळणारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून सत्तेच्या राजकारणासाठी केविलवाणी कसरत सुरू आहे. काँग्रेसचे तळवे चाटणाऱ्यांनी सत्तेसाठी अंतर्गत तडजोडी कितीही कराव्यात, मात्र हिंदु धर्मीयांच्या श्रद्धास्थानांची कुचेष्टा करू नये असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसला खुश करण्याकरिता जनतेच्या भावनांशी खेळण्याचे राजकारण छत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button