Amalner

Amalner: खान्देशची दामिनी सौ.कपिला मुठे यांची भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

खान्देशची दामिनी सौ.कपिला मुठे यांची भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

अमळनेर – जळगांव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असलेल्या सौ.कपिला मुठे व श्री अरविंद मुठे हे एक प्रगतशील असे शेतकरी आहेत. सौ.कपिला मुठे यांनी भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षापर्यंत मजल मारलेली असून, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रांत म्हणून भोपाळ येथे संपन्न झालेल्या भारतीय किसान संघाच्या 13 व्या अखिल भारतीय अधिवेशनात (2022) राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. मध्यप्रदेशातील इंदोर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या कपिला मुठे भारतीय किसान संघात 2004 पासून कार्यरत आहेत. किसान संघात अगदी प्राथमिक सदस्य, तालुका कार्यकारिणी सदस्य, जिल्हा महिला प्रमुख, प्रांत महिला प्रमुख, प्रांत उपाध्यक्ष ते आता राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर पोहोचल्या आहेत. स्वतः शेतकरी असल्याने अगदी पेरणीपासून ते थेट मालविक्रीपर्यंत स्वतः काम केल्याने या प्रक्रियेत शेतकऱ्यांना किती अडचणी येत असतात याची जाणीव त्यांना असल्याने किसान संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून त्याचे प्रश्‍न सोडवण्याचे कार्य त्यांनी केले.
‘कृषी मित कृषस्व’ शेतीच करा, शेतकरी हा खरा अन्नदाता आहे. शेतीशिवाय जगाला पर्याय नाही. कोरोना काळात फक्त एकमेव कृषी क्षेत्राने देशाला तारले हे आता स्पष्ट झाले आहे. याचबरोबर सौ.कपिला मुठे यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तालुका सचिव व जिल्हा कोषाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांच्या हक्कासाठी विविध पातळीवर काम केले आहे. “ग्राहक: एव राजा” अर्थात ग्राहक राजा असतो. ग्राहकांच्या समस्या जाणून घेत, ग्राहकांनी जागरूक रहावे यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. बँकींग या अर्थकारणाच्या क्षेत्रात देखील सौ. कपिला मुठे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जळगाव जनता सहकारी बँक, अमळनेर येथे सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. बँकेच्या माध्यमातून गरजू, हातावर पोट असणारे लहान व्यवसायिकांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले. “सब समाज को लिये साथ में आज हे बढते जाना” या वाक्याला त्यांनी प्रत्यक्षात आणले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील शेतकरी, व्यावसायिक आणि महिला वर्गासाठी कार्य केले आहे. स्वतः बचत गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचेही कार्य त्यांनी केले आहे. यासाठी शेतातून पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ तयार करणे, आरोग्यदायी इन्स्टंट फूड तयार करण्याचा उपक्रम देखील सुरू केला आहे. या माध्यमातून बचत गटातील महिलांना काम उपलब्ध करून दिले आहे. महिला बचतगटातील महिलांकडून शिवणकाम, त्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करून घेणे इत्यादी कामे करून घेण्यात येतात, जेणेकरून महिलांना घरी राहून रोजगार उपलब्ध होईल.
अशा या कर्तृत्ववान स्त्रीला भरभरून साथ देणारे श्री अरविंद मुठे यांचेही अनमोल असे सहकार्य व पदोपदी असलेला विश्‍वास तेवढाच उल्लेखनिय आहे. आजच्या स्त्रीला फक्त तिच्या सामर्थ्यांची जाणिव घरातून, आपल्या कुंटुबियांकडून झाल्यास ती आकाशाला गवसणी घालण्यासही कमी करीत नाही यांचेच हे प्रत्यक्ष उदाहरण समाजासाठी आहे. सर्व समाज बांधव, मित्र परिवारांकडून तसेच कुंटुबियांकडून त्यांच्या या यशाबद्दल श्री व सौ. मुठे कुंटुबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button