Kolhapur

अनिकेत पाटील दिग्दर्शित कवडसा लघुपटाचा अनेक पुरस्कारांनी सन्मान

अनिकेत पाटील दिग्दर्शित कवडसा लघुपटाचा अनेक पुरस्कारांनी सन्मान

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडीसारख्या ग्रामीण भागातील अनिकेत विकास पाटील या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या तसेच विकास पाटील यांची निर्मिती असलेल्या “कवडसा” या लघुपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. पॅरिस फिल्म फेस्टिवल, अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुणे, कोची आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, उरुवत्ती आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव तामिळनाडू, रामेश्वरम आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव अशा महत्त्वाच्या जवळपास आकरा चित्रपट महोत्सवात बेस्ट शॉर्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट मेसेज शॉर्टफिल्म, बेस्ट चिल्ड्रन शॉर्टफिल्म ,बेस्ट स्क्रिनप्ले असे अनेक सन्मान मिळवले. तर व्हेनिस शॉर्टस कॅलिफोर्निया,शिकागो इंडी फिल्म अवॉर्डस, 8 वा नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नामांकनही मिळाले आहे.
माणसाच्या मनात असलेल्या पारंपरिक धारणा आणि वास्तवात असणाऱ्या मानसिक समस्या या परस्पर विरोधी गोष्टींची सशक्त मांडणी या लघुपटात केलेली आहे. तेजस नावाच्या मुलाच्या आयुष्यातील अंधारावर एक प्रकाशरूपी कवडसा का गरजेचा आहे याचे भान तो आणून देतो. विषयातल्या या नाविन्यामुळेच अनेक महोत्सवांमध्ये परीक्षकांच्या कौतुकास हा लघुपट पात्र ठरला आहे. याचे लेखन आणि संकलनसुद्धा दिग्दर्शक अनिकेत पाटील यांनीच केले आहे. करण शिंदे यांचे अभिनव दिग्दर्शन, जय्यद सय्यद यांचे सहाय्यक दिग्दर्शन, निलेश जाधव यांचे छायांकन आणि ऋषिकेश कुलकर्णी यांचे पार्श्वसंगीत समस्येची मांडणी करताना अधिक गहिरेपण आणते. संवादलेखनाचे काम दिग्दर्शक अनिकेत पाटील व रमेश होगे यांनी केले आहे. निरंजन शेंडे यांचे कला दिग्दर्शन आणि वेशभूषाकार विक्रम राऊत यांच्या कामाचीही दखल घ्यावी लागेल.सिद्धेश खुपेरकर या बालकलाकाराने आपल्या अप्रतिम अभिनयातून या लघुपटास योग्य न्याय दिला आहे. त्याचबरोबर एन. डी.चौगले, नयना वेर्णे, जयश्री पुरेकर, युवराज ओतरी, अवधूत कुलकर्णी, बाबुराव आयवाळे, आत्माराम पाटील, नागराज पाच्छे, मुकुंद खुपेरकर या प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेत जीव ओतला आहे. लघुपटासाठी केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अनिरुद्ध रेडेकर व प्रा.डॉ.निलेश शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नरेवाडीसारख्या ग्रामीण भागातील तरुण दिग्दर्शकाने केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कोल्हापूरच्या कलात्मक संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचे काम ही नवी पिढी करत आहे आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून आपली ओळख निर्माण करत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button