Chandrapur

? Breaking News..आनंदवनातील वाद :आमटे कुटुंबावर आरोप.. डॉ शीतल यांचे आरोप तथ्यहीन,आमटे कुटूंबियांनी जारी केले निवेदन..

? Breaking News..आनंदवनातील वाद : शीतल यांचे आरोप तथ्यहीन,आमटे कुटूंबियांनी जारी केले निवेदन..

चंद्रपूर : महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास व सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी समाजमाध्यमांवर केलेले आरोप फेटाळले आहेत. डॉ. आमटे-करजगी यांनी आनंदवनातील कार्यकर्ते व आमटे कुटुंबातील व्यक्तींवर केलेल्या आरोपाशी अजिबात सहमत नसल्याचे स्पष्टीकरण आमटे कुटुंबीयांनी दिले. याबाबत त्यांनी समाजमाध्यमावर निवेदन जारी करण्यात आले आहे.

डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ जारी केला होता.

त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. दोन तासांतच हा व्हिडिओ माध्यमातून हटविण्यात आला होता. त्या व्हिडिओमधील आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याने निवेदन आमटे कुटुंबीयांनी जारी केले. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली आहे.

शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये देखील तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले आहे. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला आहे. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली आहे. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले असून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने केलेले आरोप फेटाळण्याची वेळ आमटे कुटुंबावर आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button