Aurangabad

18 जून हल्दीघाटी विजयदिवस

18 जून हल्दीघाटी विजयदिवस

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : भारतातील डावे इतिहासकार आणि कांग्रेस सरकारांनी हल्दीघाटी युध्दात महाराणा प्रतापांचा पराभव झाल्याचा खोटा इतिहास लिहीला. पण राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या काळात सबळ पुरावे आणि तथ्यांच्या आधारे हल्दीघाटी युध्दाचा सत्य इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आणि महाराणा प्रताप हेच हल्दीघाटी युध्दाचे विजेते असल्याचे सिध्द झाले.

त्यावेळी भारतावर मुघल बादशाह अकबराचे राज्य होते. डाव्या इतिहासकारांनी अकबराची प्रतिमा “द ग्रेट अकबर” अशी करुन ठेवली आहे, पण त्यालाही नखे होतीच. चित्तोड किल्ला जिंकल्यानंतर अकबराने सुमारे 30,000 निरपराध हिंदुची सामूहीक कत्तल केली. अकबराच्या सैन्यापासून अब्रु वाचावी यासाठी सुमारे 7000 राजपुत स्त्रीयांनी धगधगत्या अग्निकुंडात उड्या घेऊन “जौहार” केला. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

*हल्दीघाटी महासंग्राम*

मेवाडचे स्वतंत्र हिंदुराज्य अकबराच्या डोळ्यात सलत होते. महाराणा प्रतापांचा पराभव करुन मेवाडवर हिरवे निशाण फडकवण्यासाठी अकबराने मानसिंह आणि असफखान यांना पाठवले. मानसिंह हा राजपुतच पण मुघलांची चाकरी करत होता. आपले कोण? परके कोण? हेच त्याला कळत नव्हते. हिंदुच्या अस्तित्वाला संपवू पाहणाऱ्या मुघल तख्तासमोर गुडघे टेकणाऱ्या या स्वकीयांबद्दल काय बोलावे? शब्दच कमी पडतात. बाबासाहेब पुरंदरेच्या शब्दात सांगायचे तर “मने मेली की उरतात फक्त जीवंत प्रेतं.”

युध्दभूमीवर जाण्यापूर्वी महाराणी अजबांदे यांनी महाराणा प्रतापांचे औक्षण केले, ते चेतक घोड्यावर स्वार झाले. महाराणी जणू चेतकला सांगत होत्या…

“ओ पवन वेगसे
उडनेवाले घोडे,
तुझपे सवार है जो,
मेरा सुहाग है वो,
राखियो रे आज उनकी लाज”

18 जून 1576 रोजी सकाळी दहा वाजता हल्दीघाटीच्या युध्दाला प्रारंभ झाला. महाराणा प्रतापांचे सैन्य मुघलांवर तुटून पडले. घनघोर संग्राम झाला. हे युध्द म्हणजे इस्लामीक जिहादविरुध्द मानवतेचे युध्द होते. लेकीसूना आणि माताभगिनींच्या अब्रुरक्षणासाठी केलेले महाभारत होते. आपल्या भूमीवर परकीयांना राज्य करण्याचा कोणताही नैतिक आधिकार नाही, या भूमिकेतुन केलेला हा संघर्ष होता.

या युध्दात झालेली एक घटना अब्दुल कादर बदायुनी याने लिहून ठेवली आहे. तो अकबराच्या बाजूने युध्दात उतरला होता, त्याने असफखानाला विचारले “आपल्या आणि महाराणा प्रतापांच्या, दोन्ही बाजूने असंख्य राजपुत लढत आहेत, मग “आपल्या बाजुचा आणि विरुध्द बाजूचा राजपुत” कसा कळणार? तेव्हा असफखानाने त्याला उत्तर दिले “तू काळजी करु नकोस , फक्त तलवार चालव, दोन्ही बाजूचे मेले तरी हिंदुच मरणार ना? फायदा तर इस्लामचाच होईल.” यावरुन मुघलांचा दृष्टीकोन किती धर्मांध होता हे लक्षात येते.

या युध्दात महाराणांच्या बाजूने हकीमखाम सूरी, भिलू राणा पुंजा भिल, किशनदास, भीमसिंह, रावत सांगा, कोशीथलची महाराणी यांनी पराक्रमाची शर्थ केली. रामसिंह तंवर आणि त्यांच्या तीन पुत्रांनी मोठा पराक्रम करत वीरमरण पत्करले. महाराणा प्रताप चेतक घोड्यावर स्वार होऊन मानसिंहाच्या हत्तीकडे गेले, चेतकने आपले दोन्ही पाय हत्तीच्या मस्तकावर रोवले. प्रतापांनी मानसिंहाला भाला फेकून मारला, पण मानसिंह हौद्यात लपल्यामुळे वाचला. हत्तीच्या सोंडेतील तलवारीमुळे चेतकच्या मागच्या पायाला जखम झाली, तो अशा जखमी अवस्थेतही महाराणांना घेऊन युध्दभूमीवर फिरत होता. शेवटी मानसिंहाचा हत्ती अनियंत्रित होऊन रणांगणातून पळून गेला.

या युध्दात महाराणा प्रतापांनी बहलोलखान या बलाढ्य सरदाराचा वध केला. तलवारीच्या एकाच घावात त्यांनी बहलोलखानाचे शिरस्त्राण, चिलखत आणि घोड्यासकट दोन तुकडे केले. झाला मानसिंह या महाराणा प्रतापांच्या सैनिकाने त्यांचा वेश धारण करुन युध्दाचे नेतृत्व केले.

अखेर दुपारी तीन वाजता मुघल सेना युध्दभूमी सोडून पळून गेली. या युध्दात बलिदान झालेल्या दोन्ही सैन्याच्या रक्ताचा जणू तलाव बनला होता, या स्थानाला “रक्ततलाई” म्हणतात. खमनौर गावाजवळ हे स्थान आहे.

महाराणा प्रतापांना घेऊन चेतक घोड्याने 20 फूट रुंद नाला उडी मारुन पार केला. त्यानंतर तो जमिनीवर पडला, तिथेच त्याने आपला प्राण सोडला. खेडी इमली येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात चेतकवर अंत्यसंस्कार करण्यात आले, इथेच त्याची समाधि प्रखर स्वामीनिष्ठेची साक्ष देत उभी आहे.

*रामप्रसाद हत्ती*

महाराणा प्रताप यांच्याकडे चार हत्ती होते- चक्रबाप, लूना, खांडेराव आणि रामप्रसाद! हल्दीघाटीच्या युध्दात रामप्रसाद हत्तीने मोठी कमाल केली. असंख्य मुघल सैनिकांना त्याने ठार मारले, अकबरालाही या हत्तीचा हेवा वाटत असे. त्याने फक्त दोघांनाच बंदी बनवण्याचे आदेश दिले होते एक स्व:त महाराणा प्रताप आणि दुसरा त्यांचा हत्ती रामप्रसाद! अखेर मुघलांनी सात हत्तीचे चक्रव्यूह रचत रामप्रसादला ताब्यात घेतले. त्याला अजमेरला अकबरापुढे पेश करण्यात आले. अकबराने त्याचे नाव “पीरप्रसाद” ठेवले पण रामप्रसाद हत्ती अकबरापुढे झुकला नाही, महाराणा प्रताप कधी मुघलांपुढे झुकले नाही, मग त्यांचा हत्ती कसा झुकणार? रामप्रसादने अन्नपाण्याचा त्याग केला आणि 18 दिवसांनी आपले प्राण सोडले.

*महाराणा प्रतापांच्या विजयाचे काही पुरावे आणि तथ्य*

हल्दीघाटी युध्दानंतर मानसिंह आणि असफखान यांना अकबराने दरबारात येण्याची (ड्योटी) बंदी केली, याचाच अर्थ ते पराजित झाले होते. जर ते जिंकून आले असते, तर त्यांचा सत्कार झाला असता!

हल्दीघाटी युध्दानंतर स्व:त अकबर चाल करुन आला होता, जर हल्दीघाटी युध्दात त्याचा विजय झाला असता, तर तो स्वत:च कशाला आला असता?

उदयपूर येथील जगदीशराय प्रशस्ती, सुरपणखेडा शिलालेख यात हल्दीघाटी युध्दात महाराणा प्रतापांचा विजय झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय राजरत्नाकरसह अनेक दस्ताऐवजात हल्दीघाटी युध्दात महाराणा प्रतापांचा विजय झाल्याचे म्हटले आहे.

*दानशूर भामाशाह*

महाराणा प्रतापांचे सहकारी भामाशाह यांनी 25 लक्ष रुपये आणि 20,000 अशर्फीया महाराणा प्रताप यांच्या चरणी समर्पित केल्या. एवढ्या रकमेत आपल्या सैन्याचा बारा वर्षापर्यंत निर्वाह होऊ शकत होता. आपल्या देशात खूप मोठ-मोठे सेठ-साहूकार होऊन गेले, ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीलासुध्दा कर्ज दिले, पण या देशाला त्यांचे नावही माहित नाही, परंतु हा देश त्या भामाशाहचे आजही स्मरण करतो, ज्यांनी राष्ट्रसंकटाच्या समयी आपली संपत्ती महाराणा प्रतापांच्या चरणी समर्पित केली.

*महान शासक*

महाराणा प्रताप थोर सेनानी तर होतेच, पण ते कुशल प्रशासकही होते. शांतीकाळात त्यांनी उत्तम राज्यकारभार केला. कला, साहित्य आणि संस्कृतीचा विकास त्यांच्या राज्यकाळात झाला. चावण्ड येथे त्यांनी आपली नवीन राजधानी स्थापित केली. शत्रुच्याही स्त्रीयांचा सन्मान करणारा हा महापुरुष होता.

युध्दातील विजयानंतर स्त्रीयांना जनानखान्यात घालणारा लंपट अकबर आज पाठ्यपुस्तकात पाने भरभरुन शिकवला जातोय, परंतू “परस्त्रीमातेसमान” मानणाऱ्या महाराणा प्रतापांचे उज्ज्वल चरित्र नव्या पिढीसमोर मांडले जात नाही, ही शोकांतिका आहे.

त्याकाळात राजस्थानमध्ये सतीप्रथा होती, परंतु महाराणा प्रतापांच्या काळात कोणत्याही राणीचे सती जाण्याचे उल्लेख सापडत नाहीत, तसेच बालविवाहाचेही उल्लेख सापडत नाही.

महाराणा प्रताप साधुसंत, संन्यासी लोकांचा आदर करत. एकदा जैन आचार्य पट्टधर उदयपूरला आले असता, महाराणा प्रताप दूरपर्यंत पायी चालत त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले होते.

*पूर्णाहूती*

महाराणा प्रताप यांना फक्त 57 वर्षाचे आयुष्य लाभले.
एकदा एका गाईला वाचविण्यासाठी त्यांनी वाघाशी संघर्ष केला, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. दि. 19 जानेवारी 1597 (माघ शुध्द एकादशी) रोजी त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. हिंदुचा पराक्रमी सूर्य अस्ताला गेला.

हल्दीघाटी युध्दात हौतात्म्य प्राप्त झालेल्या शूरवीरांना विनम्र अभिवादन. या गौरवगाथेतुन प्रेरणा घेत आपल्या मातृभूमीला परमवैभवाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प करुया.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button