Haidrabad

पत्रकार संरक्षण कायदा सर्व राज्यांनी करावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पत्रकार संरक्षण कायदा सर्व राज्यांनी करावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

राजेश सोनुने

हैदराबाद, दि. 6 – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना विचार स्वातंत्र्य ; लेखन स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. समृद्ध लोकशाहीसाठी सरकारच्या कामाची, राजकीय सामाजिक नेत्यांच्या भूमिकांची समिक्षा करणार्‍या पत्रकारांची देशाला गरज आहे. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले हे लोकशाहीवरील हल्ले ठरतात. पत्रकारांवरील हल्ले रोखले पाहिजेत. त्यासाठी काही राज्यांनी पुढाकार घेवून पत्रकार संरक्षण कायदा केला आहे; त्याप्रमाणे देशभरातील सर्व राज्यांनी पत्रकारांवरील हल्ला रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा केला पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले.
ऑल इंडिया वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनच्यावतीने हैदराबाद येथील इंदिरा प्रियदर्शिनी ओडोटेरियम च्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ना. रामदास आठवले बोलत होते.
मराठी पत्रकार दिनानिमित्त ना. रामदास आठवले यांनी पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ म्हणून पत्रकारितेला महत्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी केलेल्या टीकेला; लिखाणाला हिंसक कारवाया करुन कोणी उत्तर देवू नये तर पत्रकारांनी केलेल्या लिखाणाला ते लिखाण न पटल्यास आपली बाजू लिखाणाद्वारेच मांडली पाहिजे. पत्रकारांच्या लिखाणामुळे दुखावणार्‍या व्यक्तीने कायदा हातात घेवून पत्रकारांवरील हल्ला करणे हे लोकशाहीवर हल्ला करण्यासारखे आहे. पत्रकारांवर हल्ला न करता लिखाणाद्वारेच पत्रकारांना उत्तर दिले पाहिजे. तसेच पत्रकारांनीही जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीची निंदा नालस्ती होईल असे लिखाण करु नये असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पत्रकारांनी माझ्या आंदोलनाला, कार्यक्रमांना प्रसिद्धी दिल्यामुळे महाराष्ट्रात मी कॅबिनेट मंत्री होऊ शकलो, तीन वेळा लोकसभा ; एकदा राज्यसभा सदस्य होऊ शकलो तसेच केंद्र सरकारमध्ये दोन वेळा राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. पत्रकारांनी माझ्याप्रति दाखविलेले प्रेम ;दिलेला पाठिंबा सहानुभूती, आपुलकी यामुळे माझ्या राजकीय यशात पत्रकारांचा मोठा वाटा राहिला आहे. असे कृतज्ञ उद्गार ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

पत्रकार संरक्षण कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवातीपासूनच पाठिंबा राहिला आहे असे ना रामदास आठवले यांनी यावेळी म्हणाले.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Back to top button