Jalgaon

?जळगांव Live…18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी कोविड ॲपवर नोंदणी करावी..जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आवाहन

?जळगांव Live…18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी
लसीकरणासाठी कोविड ॲपवर नोंदणी करावी..जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आवाहन
जळगाव राज्य शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरीकांना मोफत कोरोना लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 1 मे, 2021 पासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील 2 हजार 841 नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी या वयोगटातील नागरीकांनी कोविन ॲपवर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. तर 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयात नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लस घेण्यासाठी पुढे येत आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस महत्वपूर्ण असल्याने राज्य शासनाने 1 मे पासून राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरीकांसाठी जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, जळगाव शहर महानगरपालिकेचे शाहू महाराज रुग्णालय व नानीबाई आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद अशी एकूण पाच केंद्र सुरु केली आहेत. या पाच केंद्रावर दैनंदिन 100 पुरुष व 100 महिलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यात ही केंद्र वाढवण्याचे नियोजन राज्यस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यात या केंद्रावर पहिल्या दिवशी (1 मे) 411, दुसऱ्या दिवशी (2 मे) 695, तिसऱ्या दिवशी (3 मे) 769 तर चौथ्या दिवशी (4 मे) 966 व्यक्ती असे एकूण 2 हजार 841 व्यक्तींना लस देण्यात आली आहे.
18 ते 44 वयोगटात मर्यादित स्वरूपात व फक्त आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू आहे, यात लसीकरण केंद्रावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे नोंदणी व लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांनी संयम बाळगून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे. याशिवाय नियमित शासकीय केंद्रांवर 45 हुन अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. यात दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना वेगळा कोटा देण्यात येत आहे.
जिल्ह्यात तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 998 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 59 हजार 108 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सर्वसामान्य नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा साठा मिळावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
00000

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button