Nashik

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान तर्फे सत्कार

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान तर्फे सत्कार

नाशिक वार्ताहर (सुशिल कुवर) दि.०१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आफ्रिका व युरोप खंडातील सर्वोच्च शिखर यशस्वीपणे सर केलेले अनिल वसावे आज नाशिकमध्ये आले असता आदिवासी बचाव अभियान कार्यालयात त्यांचा छोट्याखानी सत्कार करण्यात आला. यावेळी जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा, पुष्पगुच्छ व रोख ५००० हजार रुपये देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी ३६० बुक ऑफ वर्ड रेकॉर्डचे सीईओ राहुल बनसोडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनुभव कथन करतांना अनिल वसावे म्हणाले की, २६ जानेवारी २०२१ मध्ये आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केलेले होते आता नुकतेच ८ जुलै,२०२१ मध्ये युरोप खंडातील माऊंट एलब्रुस सर करून भारताचे नाव रोशन केलेले आहे. ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे अत्यन्त मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. येणाऱ्या काळात ७ ही खंडातील ७ सर्वोच्च शिखर सर करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. हा प्रवास व आर्थिक तारांबळ सांगताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कोणतीही शासकीय मदत वा प्रशिक्षण नसतांना अनिलने ही कामगिरी फत्ते करून दाखवली याचे सर्वत्र आदिवासी समाजात कौतुक होत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील ‘बालाघाट’ या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर ही मोहीम यशस्वी करून विश्व विक्रम केलेला आहे. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला आहे. यावेळी प्रा. अशोक बागुल, अँड. दत्तू पाडवी, किसन ठाकरे, नामदेव बागुल, जयवंत गारे, दत्तू साबळे, जयराम गावीत, काशिनाथ बागुल, विजय घुटे, विजय पवार, नामदेव ठाकरे, राहुल गावीत,गुलाब आहेर, नितीन गावीत, श्रेयस वळवी आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अनिल वसावे ला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button