Nandurbar

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा-डॉ.राजेंद्र भारुड

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा-डॉ.राजेंद्र भारुड

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : जिल्ह्यातील तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर, चेतन गिरासे, शाहूराज मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रत्येकी 5 पथके स्थापन करावे. प्रत्येक पथकामार्फत किमान 100 स्वॅब नमुने संकलीत करण्यात यावे. संकलीत केलेले सर्व स्वॅब त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयात पाठवावे. धडगाव तालुक्यात अलगीकरण कक्षासाठी आदिवासी वसतीगृहात व्यवस्था वाढवावी. येथील ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवावी. तालुक्यात एकही बाधित व्यक्ती घरी रहाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी असल्यास जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित करावे.

जिल्ह्यात कोरोना परिस्थिती आणि सार्वजनिक वितरण प्रणाली या दोन कामांवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. सुरू असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करावी. कोरोना संकटाची तीव्रता कमी होईपर्यंत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित रहावे. नवापूर आणि धडगाव तालुक्यात लसीकरणाला गती देण्यात यावी. लसीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींची नोंदणी येत्या 15 दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

श्री.गावडे म्हणाले, लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची नोंदणी करण्यात यावी आणि मोहिम स्तरावर लसीकरण करण्यात यावे. शिक्षण विभागाच्या सहाय्याने नोंदणीचे कामाला गती देण्यात येईल. नोंदणीच्या कामांचा दैनंदिन स्तरावर आढावा घेण्यात येईल.

कोरोना चाचणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत सर्व स्वॅब प्रयोगशाळेत पोहोचतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, शहादा येथील समर्पित कोविड उपचार केंद्र, नगरपालिकेकडील शववाहिका, नवापूर ट्रामा केअर सेंटर इमारतीतील ऑक्सिजन खाटांची व्यवस्था, तळोदा आणि अक्कलकुवा येथील ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button