India

Important: प्रेमाच्या लाल बदामात बाण का..? जाणून घ्या

Important:प्रेमाच्या लाल बदामात बाण का..? जाणून घ्या

कालच व्हॅलेन्टाईन डे साजरा झाला. तरुण तरुणी आणि आता तर मध्यम वयीन देखील हा दिवस उत्साहाने साजरा करतात. व्हॅलेन्टाईनशी डे प्रेम,प्यार ह्या शब्दांशी शी संबंधीत एक गोष्ट म्हणजे लाल दिल किंवा लाल बदाम ..आणि त्यात घुसलेला बाण. लाल बदाम हे मानवी हृदयाचं प्रतिक आणि त्याला लागलेला बाण म्हणजे त्याला झालेल्या प्रेमाची निशाणी मानली जाते. कोण मारतं हा बाण? काय आहे यामागील कहाणी किंवा इतिहास…? विशेष म्हणजे ह्या प्रेमाच्या चित्रांत एक गोंडस बाळ दिसतं. या बाळाला पंख असतात. ते हवेत तरंगत असतं आणि त्याच्या हातात असतो धनुष्य-बाण. या बाळानं बहुतांशी प्रेमात घायाळ झालेल्या जोडप्यांच्या दिशेनं धनुष्य ताणलेलं दिसतं. हा लाल बदामाच्या हृदयात घुसलेला प्रेमाचा बाण या बाळानंच मारलेला असतो. या बाळाला थोडाथोडका नाही, तर सुमारे ३००० वर्षांचा इतिहास आहे. याचं नाव आहे ’क्युपिड’.चला तर मग व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने जाणून घेऊया, क्युपिडबद्दल…लाल बदाम आणि त्यात घुसलेल्या बाणा बद्दल…

क्युपिड हे खरंतर आत्ताआत्ताचं नाव. ग्रीकमध्ये देव इरॉस हा त्यांचा प्रेमाचा देव. इंग्लिशमधला प्रणय या अर्थाचा असलेला इरॉटीक हा शब्द या इरॉसवरूनच आला. याचं मूळ ग्रीक रूप आहे अगदी हा इरॉस आणि भारतीय पुराणातल्या कामदेव सारखेच…तरूण, देखणा आणि प्रणयी. दोघांच्याही हातात धनुष्य बाण…कधी सरळ मार्गाने, तर कधी आडून. कधी सहज तर कधी मुद्दाम. त्यासाठी आपल्या हातातील धनुष्य-बाणाचा वापर करणारा. असं म्हणतात की त्याच्याकडे दोन प्रकारचे बाण आहेत. एक सोन्याचा, ज्याच्यावर वापरला जातो तो प्रेमात पडतो आणि दुसरा शिशाचा, ज्याच्यावर वापरला जातो तो प्रेमापासून दूर पळतो.

अशा या इरॉसच्या अनेक ग्रीक पुराण दंतकथा आहेत. इरॉस प्रेमाचा देव असला तरी तो खट्याळ होता. आपल्या सामर्थ्याची जाणीव असल्याने त्याच्या वापराने देव, लोकं कुणालाही प्रसंगी अडचणीत टाकून त्यांची गंमत बघणं हा त्याचा आवडता उद्योग होता. एकदा त्यानं अपोलो या सूर्यदेवतेवर सोन्याचा बाण सोडला. त्यामुळे अपोलो डॅफनी नावाच्या एका परीच्या प्रेमात पडला. त्याने तिला पटवायला सुरूवात केली. त्याच वेळेला या शहाण्या इरॉसनं डॅफनीवर शिशाचा बाण सोडला. यामुळं डॅफनीला अपोलोबद्दल जराही प्रेम वाटेना!. उलट तिला त्याचा तिरस्कारच वाटू लागला. परिणामी अपोलोसारखा देव डॅफनीच्या मागे धावतोय आणि डॅफनी त्याच्यापासून दूर पळतेय, असा प्रसंग घडला. इरॉस मात्र त्यांची मजा बघत राहिला.

रोमन कामदेव डायनाला घायाळ करत असताना..

असा हा इरॉस पुढे रोमनांकडून ‘पुट्टी’ या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याचं तरूण, देखणं रूप जाऊन त्याला गोंडस बाळाच्या रूपात दाखवण्यात येऊ लागलं. त्याच्या हातातलं धनुष्य मात्र तसंच राहिलं. पुढं रेनिसान्सच्या काळात त्याला ‘क्युपिड’ असं म्हणू लागले. त्याचं गोंडस बालकाचं रूप तसंच राहिलं पण आता त्याच्या या रूपाला कलेच्या माध्यमातून नवे आयाम जोडले गेले. या काळापासून त्याला कधी डोळ्यांवर पट्टी लावलेल्या अवस्थेत दाखवण्यात येऊ लागलं (कारण प्रेम आंधळं असतं), त्याला वेगवेगळ्या बाळरूपामध्ये दाखवण्यात येऊ लागलं (प्रेम कुणावरही होऊ शकतं) आणि त्याचं अस्तित्व सतत कुठं ना कुठं दिसतच राहिलं अशी खबरदारी घेण्यात येऊ लागली (कारण, प्रेम कधीही आणि कुठेही होऊ शकतं).
’व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी प्रेमवीरांवर आणि त्यांच्या नियोजित प्रेमिकांवर प्रेमबाधेचा बाण चालवणा-या या रोमन कामदेवाची ओळख करून घेऊन आजच्या या प्रेमदिनाचं औचित्यच साधलं गेलं आहे, असं आपण नक्की म्हणू शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button