India

?महत्वाचे..कोरोना मुक्त झाला आहात..!आता पहा कशी घ्यायची काळजी..!कसा असावा आहार..!

?महत्वाचे..कोरोना मुक्त झाला आहात..!आता पहा कशी घ्यायची काळजी..!कसा असावा आहार..!
भारतात लाखो लोकांना कोरोना विषाणूने जखडलं यातून सावरत लाखो लोक कोव्हिड मुक्त झाले तर लाखो मरण पावले.
कोरोना होऊन गेल्यानंतर पूर्ववत आयुष्य जगण्याची धडपड सुरू होते.. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे.
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहिल्यामुळे न कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा यांसारखे त्रास सुरू झाले आहेत.
कोव्हिडमुक्त रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रुग्णालयात राहिल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं आणि आजारामुळे शरीरातील ताकद कमी होणं साहजिक आहे. त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होतो.
त्यामुळे खालील गोष्टी करणं आवश्यक आहे-
1) झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. डोकं आणि मानेला आधारासाठी डोक्याखाली उशी घ्यावी. पाय गुडघ्यातून थोडे दुमडून घ्यावेत.
2) टेबलवर बसून काम करत असताना श्वास घेण्यास त्रास झाला, तर कमरेतून पुढे वाकून डोकं आणि मान टेबलवर ठेवलेल्या उशीवर ठेवावेत. हात टेबलवर आरामात ठेवावेत. उशी घेतली नाही तरी चालेल.
3) खुर्चीवर बसल्यावर त्रास झाल्यास, थोडं पुढे वाकावं आणि हात मांड्यांवर ठेवावेत
कसा श्वास घ्यावा..?
एका ठिकाणी शांत बसावं. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. हळूवर नाकाने श्वास घ्यावा आणि तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर तोंडाने श्वास घ्यावा. शक्यतो श्वास हळूवार घेण्याचा प्रयत्न करावा.
दवाखान्यातुन घरी आल्यानंतर कोणते व्यायाम करावेत..?
व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं असेल, तर व्यायाम करताना कोणालातरी सोबत ठेवावं. व्यायाम करताना त्रास झाला तर तात्काळ डॉक्टरांना माहिती द्यावी.
सोपे व्यायाम – खांदे पुढे-मागे रोल करावेत. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडं वाकावं. पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा. याला ‘वॉर्मअप’ असं म्हणतात.
थोडे कठीण व्यायाम- जागच्या जागी चालण्याचा प्रयत्न करावा. बाहेर चालताना शक्यतो सपाट जमीन असेल त्याठिकाणी चालावं. हळूहळू चालण्याचा वेग आणि अंतर वाढवावं.
दीर्घकाळ ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरवर राहून कोव्हिड-19 मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा रुग्णांसाठी मुंबईतील केईएम, फोर्टिस, सेंट जॉर्ज आणि इतर रुग्णालयात पोस्ट-कोव्हिड ओपीडी सुरु करण्यात आलीये.
कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कोव्हिडमुक्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम, शॉर्ट ब्रिस्क वॉकिंग फार महत्त्वाचं आहे. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर सेल्फ मॉनिटरिंग वेळोवेळी करणं गरजेचं आहे. चालताना, काम करताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.
जेवताना गरम पाणी प्यावं. पौष्टिक आहार घ्यावा. शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी. कुठलाही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा असं डॉ.गोसावी यांनी म्हटलं आहे.
कोव्हिड-19 आणि परिणाम
कोविड-मुक्त रुग्णांमध्ये व्यायामाचा ताण सहन न होणे, झोपेचं वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे लक्षणीय बदल आढळून आले आहे. नैराश्य, निद्रानाश यासारखे न्यूरोसायकियॅट्रिक परिणाम गंभीर आहेत.असे तज्ज्ञांचे मत आहे.
स्ट्रेस, चिंता यापासून दूर कस राहावं..
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, रुग्ण कोव्हिडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत राहते. समाज काय म्हणेल, कशी वागणूक देईल याचा स्ट्रेस त्या व्यक्तीवर खूप जास्त असतो. त्यामुळे शारीरीक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याकडेही लोकांनी लक्ष द्यायला हवं.
“कोव्हिडनंतर बहुधा रुग्ण घरी एकटेच असतात. अशावेळी मनात उलटे-सुलटे विचार येतात. त्यामुळे लोकांनी 10 मिनिटं माइंडफुल मेडिटेशन करावं. यामुळे मानसिक खच्चीकरण होणार नाही. काही रुग्णांना झोप येत नाही, सतत बेचैनी असते, दिवसभर मनात विचार येत असतात. अशावेळी डॉक्टरांना जावून भेटावं. औषधांनी ही चिंता दूर होण्यास मदत होईल,” डॉ गोसावी यांनी सांगितले आहे.
कोव्हिडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टीक आहार घ्यावा. अॅक्टिव्ह राहावं ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावं, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावं.
कोव्हिडनंतर फिजिओथेरपीचं महत्त्वं
कोव्हिड-19 संसर्गामुळे काही व्यक्ती खासकरून वयोवृद्ध लोकांची हालचाल कमी होते. अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजीओथेरपी महत्वाची आहे.दीर्घकाळ व्हॅन्टिलेटर किंवा ऑक्सिजनवर राहून कोव्हिड-19 मुक्त झालेल्या रुग्णांसाठी चेस्ट फिजिओथेरपी ही फार महत्त्वाची ठरते. या रुग्णांची आजारात हालचाल फार कमी झाल्याने बरं झाल्यांनंतर लगेचच व्यायाम करता येत नाही. चेस्ट फिजीओथेरपीने फुफ्फुसं क्लिअर होण्यास मदत होते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. फिजिओथेरपीने स्नायू हळूहळू मजबूत होतात.
त्यामुळे कोव्हिड-19 मुक्त रुग्णांनी आधी श्वसनाचे व्यायाम करावेत. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्यानंतर हळूहळू व्यायाम सुरू करावा. पण, व्यायाम करताना कोणालातरी सोबत घ्यावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,” असं डॉ.गोसावी सांगतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button