Maharashtra

गटविकास अधिकारी रेंगडे यांच्या समर्थनार्थ हे सरपंच एकवटले असून, संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळावा व ठेकेदारांवरच कारवाई व्हावी, अशी सरपंचांनी केली मागणी

गटविकास अधिकारी रेंगडे यांच्या समर्थनार्थ हे सरपंच एकवटले असून, संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळावा व ठेकेदारांवरच कारवाई व्हावी, अशी सरपंचांनी केली मागणी

प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

अकोले तालुक्याचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना मुद्दामहून लाचेच्या जाळ्यात अडकविले आहे. तो प्रामाणिक अधिकारी असून, केवळ जातीयवादातून तालुक्यातील काही ठेकेदारांकडून त्यांना त्रास देण्याचा प्रकार होत आहे. याबाबत न्याय मिळून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी,“ अशी मागणी करंदीचे सरपंच चंद्रकांत गोंदके, भंडारदराचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी केली आहे.
अकोले येथील शासकीय विश्रामगृहात आज सकाळीच तालुक्यातील अनेक सरपंच जमा झाले असून, आंदोलन करीत ते तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. या वेळी बोलताना या सरपंचांनी संबंधित ठेकेदाराच्या त्रासाबद्दल माहिती दिली. गटविकास अधिकारी रेंगडे यांच्या समर्थनार्थ हे सरपंच एकवटले असून, संबंधिताला न्याय मिळावा व ठेकेदारांवरच कारवाई व्हावी, अशी मागणी या सर्व सरपंचांनी केली आहे.
तहसीलदारांना देण्यात येणाऱ्या या निवेदनावर सरपंच चंद्रकांत गोंदके, पांडुरंग खाडे, तुकाराम खाडे, सुरेश भांगरे, भाऊराव भांगरे , संपत झडे , सयाजी अस्वले, मारुती बांडे, भगवान सोनवणे, सुनील सारुक्ते, विमल पद्मेरे, संदीप मेंगाळ, सोमनाथ उघडे, सौ पुष्प घाणे, बाबासाहेब उगले, भारत घाणे, विजय भांगरे आदी २५ सरपंच, आदिवासी संघटना, अखिल भारतीय आदिवासी संघटना कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.

सापळ्यात अडकले अधिकारी

अकोले येथील पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी भास्कर सावळेराम रेंगडे (वय 52, रा. धुमाळवाडी, ता. अकोले) यांनी ठेकेदाराकडून चार हजार रुपये लाच स्विकारल्यावरून त्यांना 16 जुलैला अटक करण्यात आली आहे. उमेश रमेश गायकवाड (रा. राजापूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पंचायत समितीत हा सापळा लावून त्यांना पैसे घेताना अटक करण्यात आली होती. याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील हे तपास करीत आहेत.

आदिवासी संघटना एकत्र

याबाबत तालुक्यात तीव्र पडसाद उमटत असून, आदिवासी भागातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी संघटना यांनी एकत्र येत गटविकास अधिकारी हे प्रामाणिक अधिकारी असून, घरकुल योजनेचा लाभ सर्व सामान्य गरीब माणसांना मिळवून दिला आहे. त्यांना अडकविण्याचा स्वतःला पुढारी समजणाऱ्या एका ठेकेदाराने पंचायत समितीत काही दुखावलेले कर्मचारी हाताशी धरून कट कारस्थान केले आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी कोयते हातात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दमबाजी केल्याने ते निलंबित झाल्याने असे काही लोक एकत्र येऊन गेली दोन वर्षांपासून हे षडयंत्र करीत आहेत. तालुक्याचा आमदार आदिवासी, सभापती आदिवासी, गटविकास अधिकारी आदिवासी आहेत, असे पत्र वरिष्ठाना पाठवून हे ठेकेदार जातीय राजकारण करीत आहेत. आजपर्यंत बहुजन समाज व आदिवासी सर्व समाज एकत्र येऊन काम करीत असताना हा छेद देण्याचा प्रयत्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांवर अन्याय

गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची योजना चांगल्या राबविल्या. आदिवासींना लाभाच्या योजना दिल्या. आदिवासी पट्ट्यात अत्यंत चांगले काम केले. त्यांना लाचेच्या जाळ्यात मुद्दामहून अडकविण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने त्यांच्या अंगावर पैसे फेकून त्यांनी पैसे घेतल्याचे दाखविले. आता आम्ही या अन्यायाविरोधात लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया वांजुळशेतचे सरपंच सोमनाथ वाळेकर, भंडारदराचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी बोलताना दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button