Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र चक्कर येणे व त्या वरील घरगुती उपचार

आरोग्याचा मुलमंत्र

चक्कर येणे व त्या वरील घरगुती उपचार

महाराष्ट्र : चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. कधी कधीच चक्कर येणं एखाद्या आजाराचा संकेत देखील असू शकतं. जसं की एनीमिया, बीपी कमी होणं, हृदय कमजोर होणे, ब्रेन ट्यूमर किंवा अतिप्रमाणात ताण तणाव असणं. खरं तर आपण उन्हातून घरी आलो की आपलं डोकं जड होतं आणि आपल्याला चक्कर येऊ लागते. चक्कर आल्याने उत्साह राहत नाही, विचित्र आणि असहाय्य वाटू लागतं, काम करण्याची इच्छा होत नाही, धड झोपही लागत नाही आणि एनर्जी अचानक कमी झाल्यासारखी वाटू लागते.

खरं तर चक्कर येणं हा गंभीर आजार जरी नसला तरी त्रासदायक समस्या आहे हे मात्र नक्की! अशा वेळी आपल्याला समजत नाही की नक्की कशामुळे आपल्याला असं होतंय? आणि या समस्येवर आराम मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? कारण आराम हा जरी यावर पर्याय असला तरी हे औषध नक्कीच नाही. म्हणूनच मंडळी, तुम्हालाही कधी अचानक अशी चक्कर आली किंवा घराबाहेरुन आल्यावर असं होत असेल तर ताबडतोब घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून तुम्ही हा त्रास छू मंतर करु शकता. जाणून घ्या कसा?

– साधारणत: चक्कर येण्याची समस्या भेडसावताना व्यक्तीला जीव घाबरा घुबरा होणं, मळमळ होणं, शिट्टी वाजत असल्यासारखा आवाज कानात सतत घुमत राहणं अशा काही समस्या जाणवू लागतात. या दरम्यान काही लोकांना ऐकू येण्याचं बंद होतं किंवा कान जड झाल्यासारखे वाटू लागतात.

– बहुतांश वेळा कमजोरी कमी होताच चक्कर येण्याची समस्या देखील दूर होते. पण जर तुम्हाला चक्कर कोणत्या औषधांचा साईड इफेक्ट, मेंदूशी निगडीत काही समस्या किंवा अन्य कोणत्या रोगामुळे येत असेल तर याचे निदान हे केवळ वैद्यकिय उपचारांनीच होऊ शकते.

⚫ उपाय ⚫

१) धने आणी आवळा

आपल्या मसाल्यांतील एक उपयुक्त पदार्थ धणे (Coriander Seeds) जीव घाबरा घुबरा होण्याची समस्या दूर करण्यास, चक्कर कमी करण्यास आणि मळमळ दूर करण्यासाठी फार जुना उपाय आहे. हा शारीरिक कमजोरी दूर करण्यासोबतच चक्कर येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे.

यासाठी रात्री झोपताना एक चमचा धणे आणि सुका आवळा पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून त्याचं सेवन करा. शक्य असल्यास धणे आणि आवळा गुळासोबत चावून खा. यामुळे तुमचं पोट साफ राहिल आणि शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहिल. आवळा आणि धणे ब-याच आजारांना शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करतात.

२) अद्रक (आले)
चक्कर आल्यास किंवा डोकं गरगरु लागल्यास आल्याचा छोटासा तुकडा तोंडात ठेऊन चॉकलेटसारखा हळू हळू चघळू शकता. जर तुम्हाला कच्चं आलं खाण्यास काही त्रास होत असेल तर तुम्ही नियमित आल्याचा चहा पिऊ शकता.

आलं आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. सोबतच आलं तुमचा मेंदू शांत ठेऊन त्यास संतुलित ठेवण्यास लाभदायक ठरतं. तसंच जीव घाबरा-घुबरा होणं व मळमळ किंवा उलटी होण्याच्या समस्येपासून सुटका देतं.

३) पुदिना
डोकं गरगरणं आणि चक्कर येणं या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पुदीन्याचा चहा उत्तम पर्याय आहे. डोकं गरगरण्यासोबतच शांत होण्यास, मळमळ रोखण्यासही मदत मिळेल.

पुदीन्याचा चहा बनवण्यासाठी पुदीन्याची सुकलेली किंवा ताजी हिरवी पाने पाण्यात घालून मंद आचेवर पाणी उकळून घ्या. १० ते १५ मिनिटांनी हे पाणी गाळून चहासारखं प्या. यामुळे तुमच्या आरोग्यास अनेक लाभ होतील.

४) काढा
१ हिरवी वेलची, १ लवंग, १ काळी मिरी, ४ तुळशीची पाने, दोन चिमटी चहापावडर घेऊन त्यात १ कप पाणी मिक्स करा व हे मिश्रण मंद आचेवर उकळवा. सामग्री उकळत असताना भांड्यावर झाकण ठेवा. जवळ जवळ १० मिनिटे सामग्री शिजवून घेतल्यानंतर स्वादानुसार त्यामध्ये साखर व २ ते ३ थेंब लिंबाचा रस पिळून घ्या. अशाप्रकारे आपली हर्बल टी तयार आहे. दिवसातून २ वेळा या चहाचे सेवन करा तुम्हाला लाभच लाभ मिळतील.

वरील उपयांनी लाभ मिळत नसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथी तज्ञ)

संबंधित लेख

Back to top button