Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र तोंड येणे (Mouth Ulcer) घरगुती उपचार

आरोग्याचा मुलमंत्र

तोंड येणे (Mouth Ulcer) घरगुती उपचार

माऊथ अल्सर अर्थात तोंडाच्या अल्सरमध्ये संपूर्ण जबड्यात पांढरे किंवा लाल ठिपके दिसू लागतात. तोंडाचा अल्सर बरा करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र, हा अल्सर बरा करण्यासाठी आपण घरगुती उपचार देखील वापरू शकता. चाला तर, तोंडाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी असलेल्या या सोप्या टिप्स विषयी जाणून घेऊया…

खोबरेल तेल

नारळाचे तेल अर्थात खोबरेल तेल देखील या समस्येवर खूप फायदेशीर आहे. परंतु, लोक याचा फार कमी वापर करतात. माऊथ अल्सरची समस्या उद्भवल्यास आपण दिवसातून बर्‍याच वेळा त्यावर नारळाचे तेल लावू शकता. अथवा रात्री झोपण्यापूर्वी तोंडाला खोबरेल तेल लावून झोपू शकता. नारळ तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे अल्सरच्या जंतूंचा नाश करण्याचे काम करतात.

मीठाचे पाणी

एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा आणि त्याने गुळण्या करा. हा उपाय आपण दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. या पाण्याने चूळ भरल्यानंतर, साधे पाणी पिऊन तोंडातून मीठाची चव घालवू शकता.

लवंग तेल

दातदुखी आणि तोंडातील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी लवंग तेल अतिशय उपयुक्त आहे. अशावेळी आपण कापसाच्या मदतीने तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी लवंग तेल लावू शकता.

टूथपेस्ट

आपल्या टूथपेस्टमध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. तोंडाच्या अल्सरवर टूथपेस्ट लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने व्यवस्थित चूळ भरा. याने तत्काळ आराम मिळेल.

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधातील औषधी गुणधर्मामुळे अल्सरमुळे होणारी दाहकता कमी होण्यास मदत होते. ज्येष्ठमधाच्या काड्या किंवा पावडरच्या स्वरुपात ज्येष्ठमध उपलब्ध असते. ज्येष्ठमधाची काडी असल्यास ती उगाळून त्याची पेस्ट अल्सरवर लावा. जर तुमच्याकडे ज्येष्ठमधाची पावडर असेल, तर ती मधात एकत्र करून लावा. तसेच ज्येष्ठमधाची पावडर आणि हळद गरम दुधात टाकून ते दिवसातून तीनदा घ्या.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button