Maharashtra

?महत्वाचे….पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण आवश्यक

?महत्वाचे…..पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण आवश्यक

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावरील राजद्रोहाची तक्रार सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली आहे. यू ट्यूब वरील एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केलेल्या प्रकरणात हिमाचल प्रदेशातील एका भाजप नेत्याने विनोद दुआ यांच्याविरोधात सिमल्यातील एका पोलिस ठाण्यात राजद्रोहाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विनोद दुआ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली व राजद्रोहाच्या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट करावी व योग्य निर्देश द्यावेत अशी मागणी केली. तसेच मी प्रधानमंत्री किंवा सरकारवर केलेल्या टिकेमुळे कोठेही हिंसाचार पसरला नाही असा युक्तीवाद करतांना देशातील प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा सुध्दा विनोद दुआ त्यांनी उपस्थित केला होता. तसेच एक नागरीक म्हणून सरकारच्या विरोधात लेखन करणे,बोलणे,मत व्यक्त करणे हा प्रत्येक नागरीकाचा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे असे त्यांच्या वकीलाने न्यायालयात सांगितले. त्यांचे हे मुद्ये विचारात घेवून दुआ यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करु नये असे आदेश हिमाचल पोलिसांना देत त्यांच्याविरूध्दची तक्रार सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

विनोद दुआ भारतातील नामांकीत पत्रकार असून जवळपास ४० वर्षापासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे.दूरदर्शन सहीत अनेक मोठमोठया न्यूज चॕनेलमधे त्यांनी काम केले आहे. तसेच एक अभ्यासू आणि संयमीत व संतुलित पध्दतीने आपली भूमिका मांडणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. याआधीच्या सरकारवरही त्यांनी अनेकदा टिका केलेली आहे. परंतु सध्या सरकारवर टिका म्हणजे देशावर टिका अशी एक मतप्रणाली आपल्या देशात विकसीत झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील मंत्री किंवा प्रधानमंत्री यांच्यावर पत्रकार, लेखक, विचारवंत, कलाकार यांनी जर टिका केली तर त्यांच्याविरोधात रान उठविले जाते व खोट्यानाट्या आरोपाखाली तुरुंगात डांबले जाते. सध्या अशाच खोट्या आरोपात अनेक लोक तुरुंगात बंदिस्त आहे. परंतु व्यक्तीला बंदिस्त केल्याने विचार बंदिस्त होत नसतात याचा काही लोकांना विसर पडला असल्यामुळे अशा प्रकारची द्वेषात्मक कारवाई वेळोवेळी अनेकांवर केली जात आहे.

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टीचे प्रतिबिंब पत्रकाराच्या लेखनीतून उमटत असते. पत्रकार हा समाजाला काळोखातून प्रकाशाकडे नेणारा दिवा आहे. त्यामुळे वास्तववादी विचार मांडणाऱ्या पत्रकारांचे समाजात अस्तित्व असणे व त्यांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु सध्या पत्रकारितेचे क्षेत्रही विभागले गेले आहे. त्यामुळे दोन प्रकारचे पत्रकार किंवा पत्रकारिता आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच पत्रकारांची इच्छा असूनही अनेक गोष्टी त्यांना बोलता,लिहिता येत नाही.वास्तव व सत्य परिस्थिती जगासमोर मांडण्याची तीव्र इच्छा असतांनाही त्यांचे हात व तोंड बांधलेले असल्यामुळे ते चूप असतात. शेवटी त्यांच्याही पोटापाण्याचा व कुटूंबाच्या सुरक्षेचा संबंध असतो. परिणामी अनेकदा पत्रकार दोषी नसतांनाही त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. कारण प्रत्यक्ष मीडिया चालविणारी मंडळी वेगळी आहे. ती जनतेच्या समोर कधीच येत नाही. तोफेच्या तोंडावर मात्र सदैव पत्रकार असतात. त्यामुळे सध्या या क्षेत्रात प्रचंड जीवघेणा संघर्ष सुरू आहे व अनेक चांगले समाजसेवी पत्रकार त्यामधे बळी जात आहे. तेव्हा सत्य परिस्थिती कथन करणाऱ्या पत्रकारांना जनतेने सहकार्य केले पाहिजे व त्यांना साथ दिली पाहिजे.

सध्या इलेक्ट्रानिक्स मीडियाचा बोलबाला असून त्यांचा अतिरेक प्रचंड वाढला आहे. सत्य-असत्याची ओळख करणे कठीण झाले आहे. अँकरलाच पत्रकाराची उपाधी लावली जात आहे. त्यामुळे सच्च्या पत्रकारांचे मरण होत आहे. अँकरच्या विकृत वर्तनामुळे व असभ्य भाषेमुळे लोक पत्रकारांकडे वेगळ्या भावनेतून पाहत आहे. त्यामुळे इतक्या पवित्र व प्रमुख पेशाला गालबोट लागत आहे. अशावेळी प्रिंट व इलेक्ट्रानिक्स मीडियातील बरेच पत्रकार अजूनही आपली नितीमूल्ये व नैतिकता सांभाळून आहे. जिवाची पर्वा न करता विरोध पत्करुन सत्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे अनेकदा सत्तेला हादरे बसतात व सत्ताधारी नाराज होतात. मग आपल्या कार्यकर्त्यांंचा वापर करुन विनोद दुआ सारख्या अनेक पत्रकार व लेखकांवर राजद्रोहासारखे गुन्हे दाखल होवून त्यांना तुरुंगात जावे लागते.

त्यामुळे समाजानेच आता आपल्याला कोणत्या प्रकारच्या पत्रकारांची गरज आहे हे ठरविणे आवश्यक झाले आहे. कारण पत्रकारांची खरी गरज लोकांनाच असते. पत्रकारांमुळेच लोकांच्या समस्या,अडचणी,प्रश्न सरकारसमोर मांडले जातात व सरकारला जनतेसाठी निर्णय घेणे भाग पडते. परंतु पत्रकाराला मात्र कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते याची लोकांना माहिती नसते. कोरोनाच्या काळात जनतेपर्यंत सत्य परिस्थिती पोहचविण्याच्या प्रयत्नात अनेक पत्रकारांना आपले जीव गमवावे लागले व त्यांच्या कुटूंबावर फार मोठे संकट कोसळले. सरकारने अनेकदा घोषणा करुनही पत्रकारांच्या कुटुंबियांना मात्र काहीच मदत मिळाली नाही. तरीसुध्दा पत्रकार जीव धोक्यात घालून आपले कार्य करीतच आहे. त्यामुळे प्रामाणिक पत्रकारांचा व त्यांच्या पत्रकारितेचा सन्मान राखणे, त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे व सुखदुःखात त्यांच्या पाठीशी असणे देशाचे जागृत नागरीक म्हणून आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button