India

१३ फेब्रुवारी…जागतिक रेडिओ दिवस

१३ फेब्रुवारी…जागतिक रेडिओ दिवस

लहानपणी विविध भारती, बिनाका गीतमाला व आज च्या पिढीला विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा.. एकमेव अद्वितीय – रेडिओ !
आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घड्याळासारखा जास्त व्हायचा. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला.. अजून भात व्हायचाय.. असे आवाज स्वैपाकघरातून यायचे.
वनिता मंडळ सुरू झालं की, पेपर किंवा एखादं मासिक घेऊन घरातली गृहिणी जराशी कलंडत असे. मग संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने ‘परवचा’; रात्रीच्या ‘आपली आवड’च्या संगतीने डोळे मिटायचे. जरा जास्त शौकीन असलेला माणूस रेडिओ सिलोन, बिनाका गीतमाला, विविध भारती वगैरे सापडतंय का हे खुंट्या पिळून पहात असत. तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच बनविले जात होते की काय कोण जाणे. पण तरीही तो ऐकायचा. कारण रेडिओ टाईम कळला पाहिजे.

मग नंतर दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्रं पहायला मिळत असताना आवाज नुसता कोण ऐकणार. पण आता एफएमच्या आगमना नंतर रेडिओला जरासा प्राणवायू मिळाला आहे.
रेडिओचा शोध १८८५ साली मार्कोनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ साली केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला.
भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली. १९३५ च्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या चळवळी मध्ये सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने, चोरून पत्रके छापणे आणि वाटणे याच्या सोबत चोरटे रेडिओ केंद्र चालविणे हाही एक महत्त्वाचा भाग होता.
१९४२ च्या चले जाव चळवळीच्या वेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीन महिने चोरटे रेडिओ केंद्र चालविले होते. इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले.

१९३६ साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम.व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली.
विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. हवामहल, सितारों की महफिल, एकाहून एक सरस गाणी, कार्यक्रम, शास्त्रीय संगीत यामुळे ‘आकाशवाणी’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. १९८२ साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला. रेडिओतल्या बदला बरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले. सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमांतून रेडिओ सेट तयार केले जात असत. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. बॅकेलाइट म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या प्लॅस्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्याचा वापर होऊ लागला. १९५० नंतर प्लॅस्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली. १९५४ साली लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. हे ट्रान्झिस्टर फारच महाग असत. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान मोठे रेडिओ तयार होत गेले.
लहान आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले. त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले. चीनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाइल मध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओ मुळे एक नवीनच क्रांती झाली आहे.

१९७७ साली भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्स बरोबरच खाजगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत. खाजगी एफएम वाहिन्यांची सुरुवात १९७७ साली मद्रास पासून झाली. त्यानंतर गोवा राज्यात काही खाजगी रेडिओ वाहिन्यांना परवाने मिळाले. सध्या भारतातल्या ७२ शहरा मध्ये खाजगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत.
भारतात रेडिओ स्टेशन्स दोन पातळीवर चालतात. आकाशवाणीकडे मनोरंजन कार्यक्रम व वृत्तविषयक कार्यक्रम असे दोन भाग आहेत. तर खाजगी वाहिन्या केवळ मनोरंजनाचेच कार्यक्रम प्रसारित करतात. त्यांना सरकारने अद्याप बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले नाहीत. त्यांना केवळ आकाशवाणीच्या बातम्या पुन:प्रसारित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आकाशवाणीच्या एफएम रेन्बो व गोल्ड या माध्यमातून प्रसारण केले जाते.

आकाशवाणीचा वृत्तविभाग हा बातम्यांच्या क्षेत्रातला अग्रेसर विभाग समजण्यात येतो. बातम्यांची सत्यता हे त्यांचे शक्तिस्थळ बनून राहिले आहे. आकाशवाणीच्या मनोरंजनाचा भर हा अधिक प्रमाणात केवळ गाण्यांवर असतो. तरीही श्रुतिका, नभोनाटय, विविध चर्चा, क्रीडा विषयक कार्यक्रम, धावते समालोचन याद्वारेही श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते. फोन इन सारख्या कार्यक्रमांमुळे आता श्रोत्यांचा सहभागही वाढला आहे.
खाजगी वाहिन्याही गीता बरोबरच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही शहरातल्या ट्रॅफिकची माहिती देणे, काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्या विषयीची माहिती देणे अशा माध्यमातून ते आपला व्यवसाय जपत असलेले दिसतात.

महाराष्ट्रात मुंबई नि पुण्या बरोबरच इतर ठिकाणी खाजगी वाहिन्या चांगलीच लोकप्रियता मिळवत आहेत. स्थानिक कार्यक्रम व त्या त्या भागात वापरण्यात येणाऱ्या विविध उत्पादना साठीच्या जाहिराती, शेती विषयक उत्पादनांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. आज ही रेडिओ हे प्रभावी माध्यम समजले जाते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button