Nashik

शेतकरी नवरा नको ग बाई..! व्यथा तरुणाईची…!

ग्रामीण भागातील मुली ही म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई!

नकार : नोकरदारांचे पॅकेज आर्थिक स्थैर्याला प्राधान्य

नाशिक : सगळीकडे लग्न सराईचे दिवस असल्याने आता मुला मुलींच्या पालकांची धावपळ सुरू असली तरी बदलत्या गरजा आणि आर्थिक स्थिती यामुळे मुलींच्या अपेक्षाही बदलल्या आहेत.
शेतीतील एकंदर संकटामुळे शेतकरी नवरा नकोच आहे असा कल दिसून येत आहे तर दुसरीकडे शेतकरी कुटुंब असेल तर मुलाकडील एकूण शेती किती आहे याची विचारणा केली जात आहे, याशिवाय नोकदारांना प्राधान्य असेल तरी त्यांची सांपत्तिक स्थिती आणि आर्थिक पॅकेज बरोबर अन्य जबाबदाऱ्या देखील तपासून घेतल्या जात आहे.

शेती व्यवसाय अनिश्चित झाला असल्याने शेतकरी मुलाला फार मागणी नसते असे नाशिकमधील कोकणी- कोकणा आदिवासी समाज सेवा संघ वधू वर सूचक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले, शेतकरी कुटुंबातील मुलगी असेल तर मुलगा शेतकरी असल्यास हरकत नाही परंतु त्याच्या वाटेला येणारी एकूण जमिन आणि शेती बागायती आहे की नाही अशी माहिती घेतली जाते. या बरोबरच अन्य मुलींच्या अपेक्षाही बदलत चालल्या आहेत. कोरोना संकट काळात पगार कमी होणे किंवा रोजगार कमी होणे याचा विचार करून आता मुलाची एकंदर सांपत्तिक स्थिती देखिल विचारत घेतली जाते. शासकीय सेवेत मुलगा असेल तर मुलीकडील प्राधान्य देतात पण खाजगी ठिकाणी नोकरीला असेल तर त्याचे पॅकेज देखील बघितले जाते, असे सांगण्यात आले.

सर्वाधिक मागणी नोकरदारांना…

● शेतीच्या तुलनेत स्थायी नोकरी हा मुलीच्या दृष्टीने अधिक सुरक्षीतेचा भाग असल्याने नोकरदार मुलांना प्राधान्य असते. ,डॉक्टर, वकील, इंजिनिअर, किंवा तत्सम मुलांपेक्षा शासकीय नोकरी करणाऱ्यांना प्राधान्य असते.
● नोकरी करतानाही आयटी क्षेत्रातील असेल तर अधिक चांगले, मुलगी आयटी क्षेत्रातील असेल मुलगाही त्याच क्षेत्रातील असावा ही प्रमुख अट असते.
● नोकरी जर अस्थायी असेल किंवा फार खात्रीशीर नसेल तर नोकरदार मुलाची सांपत्तिक स्थिती देखील बघितली जाते.

या अटी मान्य असेल तर बोला…

मुला मुलींचा कल बदलत चालला आहे मुलींकडून आर्थिक दृष्ट्या स्थिती हा महत्त्वाचा मुद्दा असून त्यामुळे शेती करणाऱ्यांना दुय्यय स्थान मिळते. मुलीचे वडील शेतकरी असेल तरी ते आप्तेष्टांपैकी शेतकरी मुलाला प्राधान्य देत नाही. शेती जास्त असेल आणि ती बागायती असेल तर बोला असेही सांगितले जाते. नोकरदार मुलगा असेल तर पॅकेज पन्नास ते साठ हजार हवेत. नोकरीसाठी वेळेची मर्यादा हवी अशी अपेक्षा असते. मुलावर अतिरिक्त जबाबदाऱ्या नको स्वतःच्या मालकीचे घर हवेत अशीही अपेक्षा आहेत.

कोरोना काळातील रोजगाराचे संकट लक्षात घेता सध्या मुलांच्या सांपत्तीक स्थितीला महत्त्व आले आहे. म्हणजे मुलाची नोकरी संकटात आलीच तर पर्यायी व्यवस्था काय हे देखील बघितले जाते. म्हणजे आर्थिक स्थैर्याला महत्त्व आले आहे. शेतकरी मुलांना मुलीच मिळत नाही इतके टोकाचे अनुभव मात्र नाही.

– सौ. रंजना खैरनार
रेशमबंध विवाह डॉट कॉम

शेतकरी घरातील मुली शिकलेल्या असल्याने त्या जोडीदाराविषयी सजग आहेत. शेती असेल तरी सर्व बाबीचा विचार केला जातो. त्याची माहिती घेतली जाते. वराकडील कुटूंबाने शेती वाडीची जी माहिती दिली. ती लग्नानंतर खरी नसल्याने आढळल्यास घटस्फोटाचे प्रकारही घडत असतात.

– संजय लोळग,
अनुपम शादी डॉट कॉम

शेतकरी मुलांना स्थळे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुली देखील शेती करणाऱ्यांना प्राधान्य दिले जात नाही. नोकदार मुले असेल तरी क्लास वन- क्लास टु शासकीय अधिकारी असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. मुलांना आई वडील असेल तर मुले दिल्ली, मुंबई, पुण्यात असावी अशी अपेक्षा असते.

– नामदेव बागुल,
कोकणी / कोकणा आदिवासी समाज सेवा संघ

शेतकरी हा खरे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र शेतकरी मुलांना मुली मिळत नाही हे तितकेच खरे आहे. अनेकदा मुली लग्नास तयार असतात मात्र शेतीत काम करणारा नाही. असे सांगतात, असेच सुरु राहिले तर शेतकरी मुलांनी कुठे जावे हा सामाजिक प्रश्न आहे.

– मधुकर कुवर, वरपिता

शेती बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे मुलींना आर्थिक स्थितीविषयी चिंता वाटते. त्यामुळेच शेतकरी मुलापेक्षा आर्थिक स्थैर्य असलेल्या नोकदार किंवा तशा स्वरूपाच्या मुलांना प्राधान्य दिले जाते.

– साहेबराव पवार, वधुपिता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button