Amalner

तालुक्यात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती…पावसाअभावी कपाशीचे उभे पिक  वखरले.. दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तालुक्यात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती…पावसाअभावी कपाशीचे उभे पिक वखरले.. दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमळनेर यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकरी बांधवांवर येऊन ठेपली आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने व उत्पन्न येणारच नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील विविध ठिकाणचे शेतकरी कपाशीच्या उभ्या पिकांची वखरणी करत आहेत. त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा, तात्काळ दुष्काळी उपाययोजना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यातील पातोंडा येथील शेतकरी राजेंद्र धुमाळ यांनी आपल्या शेतातील पेरलेले तीन बिघे क्षेत्रातील कपाशीचे उभे पीक वखरणी करून काढून टाकले आहे. संपूर्ण पावसाळ्यात जून/जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा विना पावसाचा निघून गेला आहे. ऑगस्ट महिना संपायला येऊनही तालुक्यात चांगला व अपेक्षित पाऊसच झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. करोनाच्या संकटातून बाहेर पडून मोठ्या उमेदीने आर्थिक भार उचलून शेतकर्‍यांनी शेती मशागत करून रब्बी व खरीप पिकांची लागवड केली. यावर्षी पाऊस चांगला पडेल व उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतकर्‍यांनी कापूस, मूग, उडीद, मका, सोयाबीन अशा मुख्य पिकांची लागवड केली. महागडी बियाणे व कृषी निविष्ठा खरेदी करून शेतीची मेहनतीने मशागत केली.

जून महिन्यात पाऊसच न झाल्याने पहिली केलेली लागवड वाया गेली व आर्थिक संकटाचा भार पुन्हा घेऊन दुबार पेरणीही केली. मात्र जून, जुलै महिन्यात एक दोन पाऊस वगळता चांगला पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिन्यात एक दोन समाधानकारक पाऊस पडला त्यात शेतकर्‍यांना काहीसा दिलासा आला. मात्र नंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवून हुलकावणी दिली.
शेतकर्‍यांनी पिकांना जीवदान म्हणून महागडी खते व फवारणी देखील केली. मजूर लावून निंदणीची मशागत देखील करून घेतली. पाऊस नसल्याने व मे महिन्यासारखे कडक उन्हाळ्याचे ऊन पडत असल्याने कपाशीचे पिके ही उन्हाने कोरडी व जळत जाऊ लागलीत. त्या पिकांची खुंटलेली वाढ होणार नाही व उत्पन्न येणार नसल्याचे लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी लागवड केलेलं कपाशीचे उभे पीक वखरणी करून काढून टाकले आहे. पातोंडा परिसरातील सावखेडा, दापोरी, नांद्री, दहिवद, खेडी, खवशी, मठगव्हाण, रुंधाटी, मुंगसे, नालखेडा, गंगापूरी, खापरखेडा अशा अनेक शेतशिवारातील शेतकर्‍यांनी पडत नसलेल्या पावसामुळे आपल्या शेतातील उभे पीक काढून टाकले.

रब्बी पिकामध्ये मूग उडीदाचे पिकेही शेतकर्‍यांनी वखरून टाकून पडीक ठेवून दिले आहेत. काही शेतकर्‍यांनी भागीदारी व उक्ते पध्दतीने शेती केली. त्यात त्यांना डबल आर्थिक फटका बसला आहे. पावसाच्या दीड ते दोन महिन्यांच्या मोठ्या दडीमुळे खरीप व रब्बी पिकांची मोठी हानी होऊन संपूर्ण हंगामच वाया गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक गोची निर्माण झाली आहे. परिणामी कुटुंबाचा गाडा कसा हाकलावा असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने परिस्थितीची गंभीरता ओळखून व शेतकर्‍यांची झालेली दैना बघून सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून सोबत काढलेल्या पीक विमेची संपूर्ण भरपाई रक्कम तात्काळ शेतकर्‍यांना देऊन त्यांच्या ह्या आर्थिक संकटात निःपक्षपातीपणे मदत करावी अशी मागणी व आर्त हाक शेतकर्‍यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button