Nashik

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झाल्यास असंतोष राजकीयदृष्ट्या घातक असेल संदीप वासलेकर यांचा इशारा

ग्रामीण भारताला वगळून होणार विकास पोकळ असेल संदाप वासलेकर

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झाल्यास असंतोष राजकीयदृष्ट्या घातक असेल
संदीप वासलेकर यांचा इशारा

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नाशिक – “यापुढील काळात ग्रामीण भारतातच देशाचे भविष्य घडणार असून ग्रामीण भागाचा आणि अर्थात शेतीचा आगामी काळात विकास कसा होतो त्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा विकास मागे ठेवून शहरकेंद्रीत मॉडर्न इकॉनॉमीचा विस्तार कितीही झाला तरी ती सगळा प्रगती पोकळ असेल. सह्याद्री फार्म्ससारखी मॉडेल्स देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात उभी करणे हा त्यावरचा उपाय आहे”, असे परखड मत स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या जागतिक थिंक टँक असलेल्या संस्थेचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी येथे मांडले. ‘ग्रामीण भाग दुर्लक्षित झाला तर असंतोष निर्माण होऊन ते राजकीय दृष्टिकोनातून घातक ठरेल’, असा इशाराही त्यांनी दिला.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आयोजित सह्याद्री संवाद या व्याख्यानात श्री. वासलेकर बोलत होते. स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपच्या कार्यकारी संचालक श्रीमती इल्मास फतेहअली, सिनीअर प्रोग्राम लीडर श्री. सचिन ईटकर, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष श्री. विलास शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

‘सह्याद्री फार्म्सची रचना व काम पाहून मला भारताचे भवितव्य खूप आशादायी वाटते. पुढील दोन दशकांत सह्याद्रीचा विस्तार केवळ भारतात नव्हे तर जगभर होईल असा माझा विश्वास आहे’, असे गौरवोद्गार काढताना श्री. वासलेकर म्हणाले, “वीस वर्षांपूर्वी (२००२) आमच्या संस्थेची स्थापना झाली. तत्कालीन भारत सरकारसाठी आम्ही भारताच्या भवितव्याचा पुनर्विचार हा अहवाल तयार केला होता. त्यात भारताचे भवितव्य जोखताना ग्रामीण भागाचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भारताची भरभराट, सर्व देशात कमीतकमी एक हजार कृषिकेंद्रीत ‘रुरल ग्रोथ क्लस्टर्स’ तयार करणे आणि किमान ५०० जिल्ह्यांत त्याचा विस्तार करणे या प्रमुख बाबी होत्या. आमच्या कागदावरील संकल्पनेला सह्याद्री फार्म्स अर्थात विलास शिंदे व त्यांच्या सहकारी शेतकरी बांधवांनी मूर्त स्वरुप दिले आहे. याहून माझ्यासाठी कोणतीही आनंदाची बाब नाही. पुढील १० वर्षांच्या काळात अशी रुरल ग्रोथ क्लस्टर निर्माण झाली नाही तर देशाचा विकास परिपूर्ण नसेल. तो एकांगी असेल. त्यातून विषमता निर्माण होईल आणि तो राजकीयदृष्ट्या घातक ठरेल.”

शेती आणि पाणी
जगातील काही देशांमधील पाणीतंटे सोडविण्याचे काम स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप केले आहे. त्याचा संदर्भ देऊन श्री. वासलेकर म्हणाले की, “जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी सरासरी ८० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. उद्योग, पिण्यासाठी, वीजनिर्मीती व वापरासाठी उरलेले २० टक्के पाणी वापरले जाते. अमेरिका, युरोपासारख्या प्रगत देशांनी शेतीच्या पाण्याचा वापर ६० ते ७० टक्क्यांवर आणला आहे. भारतात मात्र ते प्रमाण ८० टक्के आहे. जगाच्या ७०० कोटींपैकी १०० कोटी लोकांना पिण्याचे धड पाणी मिळत नाही. २०० कोटी लोकांना सॅनिटेशनसाठी (संडास) पाणी नाही. शेतीसाठी जगभर केवळ ३ टक्के क्षेत्रावर ठिबक किंवा सूक्ष्म सिंचनाचा वापर आहे.”

श्री. विलास शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमोद राजेभोसले यांनी वासलेकर यांचा परिचय करुन दिला. सुरेश नखाते यांनी सूत्रसंचालन व श्री. आबासाहेब काळे यांनी आभार मानले.

वासलेकर म्हणतात…

• आज भारताची लोकसंख्या सुमारे १४० कोटी आहे. भारतात येत्या १० ते १५ वर्षांच्या काळात निम्मी लोकसंख्या शहरी असेल. ५० टक्के लोक ग्रामीण भागात असतील. ह संख्या ८० कोटींच्या आसपास असेल. जगभर हेच चित्र असेल.
• १२० कोटींच्या संपूर्ण आफ्रिकेत ग्रामीण भागच महत्वाचा आहे. आशिया खंडात मध्य, पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका सर्वत्र ग्रामीण अर्थव्यवस्था कळीची असणार आहे.
• भारताप्रमाणेच जगातही विकासासाठी रुरल ग्रोथ सेंटर्स आवश्यक आहेत. ग्रामीण भागाच्या विकासावर सामाजिक वाटचाल, विस्थापन, राजकीय स्थिरता अवलंबून असतील यात संशय नाही.
• सगळं जग करोना संकट हेच मोठं संकट समजून चाललं आहे. मात्र आगामी काळात भारतासह संपूर्ण जगापुढे हवामानातील बदल व त्याचे दुष्परिणाम हा भयंकर धोका असणार आहे. त्याचा शेतीला सर्वाधिक फटका बसेल. त्यावर तंत्रज्ञानामुळे कशी मात करता येईल, यावर विचार करायला हवा.
• मागच्या १०-२० वर्षात ज्याची कल्पना करू शकणार नाही, असे बदल तंत्रज्ञानाने घडवले. त्याची अनेक उदाहरणे आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) जशी उपकारक आहे तशी ती जगापुढचे संकटही ठरू शकते. त्यातून संहारही घडू शकतो जो मानवी कंट्रोलबाहेरचा असेल. जगाच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यामुळे निर्माण होऊ शकतो.
• भारत हा जगातील सर्वांत तरुणांचा देश आहे. त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत तरुणांना सहभागी करुन घेतले पाहिजे. ते आपल्या देशाचे भवितव्य बदलू शकतात.
• संकटांसोबत संधीही अमर्याद असणार आहेत. या संधी साधल्या पाहिजेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button