Nashik

आपत्ती ग्रस्तांचे अहवाल चोवीस तासांत द्यावे. एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये येवल्यात रात्री उशीरापर्यंत केली पूरग्रस्त भागात पाहणी मंञी छगन भुजबळ.

आपत्ती ग्रस्तांचे अहवाल चोवीस तासांत द्यावे.
एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये येवल्यात रात्री उशीरापर्यंत केली पूरग्रस्त भागात पाहणी मंञी छगन भुजबळ.

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक : नैसर्गिक आपत्तीला कुठलाही चेहरा नसतो, त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करताना शासन कुठलाही भेद न करता शेतकरी, व्यापारी अन् घरकुलापासून वंचित झालेल्या आपत्ती ग्रस्तांचे अहवाल २४ तासात करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटीबद्ध असून
कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणावे तसेच एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज रात्री उशीरापर्यंत पूरग्रस्त भागांच्या पाहणी दरम्यान केल्या आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गुलाबी चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला व निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरात व येवला शहर व परिसरात पाहणी करून झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर,महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वंसत पवार, साहेबराव मढवई, पांडुरंग राऊत, नगरसेवक प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उमेश पाटील, सहायक अभियंता सागर चौधरी, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, संदीप कराड, अभियंता विजय पाटील, सुनील पैठणकर, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. शेतीचे पंचनामे तातडीने करून सोबत व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील तात्काळ शासनास पाठवावा. ज्याठिकाणी घरांची पडझड त्या ठिकाणी पंचनामे करून घरकुलांचे नुकसान झालेले असेल त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात आरोग्य विभागाने स्वच्छता व औषध फवारणी करावी. ज्या भागात पाणी आहे त्याठिकाचे पाणी पंपाद्वारे काढण्यात यावे.

उद्या संध्याकाळ पर्यंत पूरग्रस्त भागाची साफसफाई करण्यात यावी, असेही पालकमंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.

*दोन दिवसात रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी*

रस्त्यावर पडलेले खड्डे लवकर बुजविण्यात यावेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देताना निधीची कमतरता असल्यास त्याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावेत. कोपरगाव मनमाड टोल रस्त्यावरील ड्रेनेज आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी अतिवृष्टी मुळे बंधारे फुटले आहे त्यांचेही तातडीने प्रस्ताव सादर करून दुरुस्ती करण्यात यावी. चार ते पाच दिवसात पुन्हा पाहणी दौरा करण्यात येईल तोपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

*कोरोनाचा घेतला आढावा*

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. धार्मिक व इतर सोहळ्यातून रुग्ण संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असून नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. परवानगी न घेता कार्यक्रम घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे निर्देश यावेळी कोरोना विषयक आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

*येवला शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी*

रात्री उशिरा येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील लक्कड कोट वस्ती, शॉपिंग सेंटर, बाजार पेठेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत झालेल्या नुकसानीबाबत मदत देण्याचे आश्वासन दिले, पालमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

*रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आमदार निधीतून नगरसुल ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button