Maharashtra

?️ आपत्ती व्यवस्थापन.. कायदा,प्रतिकार,सावधानी, कर्तव्य..

शालेय शिक्षणातून आपत्ती व्यवस्थापन

डॉ विलास काळे

” Prevention is better than care”
कोणताही अपघात घडण्या आधी तो घडू नये म्हणून घेतली गेलेली खबरदारी. सावधानता ही कधीही हितावह असते. महापूर, भूकंप, कोरडा दुष्काळ ,अवर्षण, त्सूनामी ,चक्रीवादळ ,दहशतवाद हल्ले, जैविक आपत्ती, वाळवंटीकरण, अतिवृष्टी, भूस्कलन ,दरड कोसळणे ,बर्फ वितळणे गारपीट, धरणफुटी ,ढगफुटी, आण्विक आपत्ती, उल्कापात ,ज्वालामुखी, वनवा ,अग्नि प्रलय ,अपहरण, रासायनिक आपत्ती अश्या वेगवेगळ्या अपत्ती या न सांगता येतात .आपत्ती या ओढवणारच. त्या ओढवू नये यासाठी प्रत्येकानेच सावधगिरी घ्यायला हवी.

जर अशा आपत्ती ओढवल्या तर त्याचा प्रतिकार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपत्ती कधीही येऊ शकतात. त्या नियोजित नसतात. परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते.
केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा अधिनियम संसदेत 23 डिसेंबर 2005 साली पारित केलेला आहे .आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरतूद या कायद्यात आहे कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय , राज्य, जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात .राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान , राज्य पातळीवर मुख्यमंत्री , जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हे निर्णय घेतात .राज्य सरकारनेही 2006 मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल , राज्यस्तरावर तत्सम दल हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात

*आपत्ती म्हणजे काय*
ज्या संकटामुळे राष्ट्राची ,समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित ,आर्थिक हानी होते तसेच त्याचे पुरोगामी परिणाम होतात अशा संकटाला आपत्ती म्हणतात

?? जागतिक आरोग्य संघटनेने आपत्ती ची केलेली व्याख्या
Any occurrence that causes damage ecological disruption loss of human life deterioration of health and health services on a scale sufficient to warrant the extra ordinary response from outside the affected community or area”

अशी घटना की ज्यामुळे हानी होते. नैसर्गिक विपत्ती ,मानवी जीवांची हाणी, खालवणारे आरोग्यमान आणि आरोग्य सेवा हे सर्व इतक्या प्रमाणावर होते की जेणेकरून त्या जागे बाहेरील जगताकडून संकटग्रस्तांकडे मदतीचा ओघ सुरू होतो.

आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवित हानी व अन्य प्रकारची हानी संभवते थोडक्यात आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित मोठी समस्या की ज्यामुळे आरोग्यावर ,मानवावर ,भौतिक साधनसंपत्तीवर ,प्राण्यावर परिणाम किंवा बाधा उत्पन्न होते .

आपत्ती ही मानवी जीवनात संघर्षात्मक परिस्थिती निर्माण करते ज्यामुळे मानव आणि वित्तहानी होते ह्या आपत्ती काही वेळा नैसर्गिक असतात , काही वेळा मानवनिर्मित. या आपत्तीपासून बचाव करण्यासाठी तसेच कमीत कमी हानी होण्याच्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाची गरज भासते

*आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय*

आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करताना प्रथमतः विचार करावा लागतो तो आपत्तीचा. या आपत्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानवी जीवनावर परिणाम करीत असतात जेव्हा आपत्तीचे व्यापक स्वरूप धारण केले जाते तेव्हा मानवाला आपत्ती व्यवस्थापनाची गरज वाटू लागते .आपत्ती व्यवस्थापनात द्वारे आपण आपत्तीचे स्वरूप कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्तीची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने
सुनियोजित संघटनात्मक कृती व समन्वय या द्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्म अशी क्रिया होय. शास्त्रशुद्ध पायावर होणारे प्रयत्न नेतृत्वाकडून अवलंबली जाणारी व्युहरचना आणि व्यवस्थापनातील प्रशासनातील तंत्राचा वापर याद्वारे आपत्ती निवारणाचे कार्य चांगल्या प्रकारे होऊन ते अधिक लाभदायक ठरते आपत्ती व्यवस्थापन योजनाबद्ध पद्धतीने अंमलात आणता येते एक ) आपत्ती यायच्या आधीच योग्य ती सावधगिरी बाळगणे, दोन ) आपत्तीचा प्रतिकार करणे , तीन) आपत्तीपासून लोकांना वाचविणे, चार) आपत्तीची झळ कमी करणे अशा पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो .

आपत्ती निवारण ही कोणा एकाची जबाबदारी नसते. सरकार ,प्रशासन शासन यंत्रणेतील सर्व घटक, विविध व्यावसायिक ,उद्योगपती यांचे समूह, सामाजिक संस्था ,शैक्षणिक संस्था ,कुटुंबे आणि त्यातील प्रत्येक व्यक्ती अशा सर्वांनीच आपत्ती निवारणाच्या व्यवस्थापनात सहभागी होणे गरजेचे असते .

आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात आपत्ती पूर्वीची अवस्था , आपत्ती दरम्यान ची कार्यपद्धतीची अवस्था , आपत्तीनंतर ची अवस्था या प्रत्येक अवस्थेसाठी स्वतंत्र धोरण ठरवून त्यानुसार कार्यक्रम तयार करून ते प्रभावीरीत्या अमलात आणावे लागते

?? *आपत्तीचे प्रकार*
आपत्तीच्या स्वरूपावरून दोन प्रकारात विभागणी करता येईल

१. मानवनिर्मित आपत्ती – जंगलातील वणवे ,
अपघात, स्फोट, दुर्घटना, आग, वायु गळती, इमारत कोसळणे , युद्धे , माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संकटे

२. निसर्गनिर्मित आपत्ती- —-भूकंप, ज्वालामुखी, महापूर, अतिवृष्टी , भूस्खलन (दरड कोसळणे) उल्कापात ,स्तुनामी लाटा ,, वादळे, हिमपात, अवर्षण, कोरडा दुष्काळ, हिमवादळे, जैविक आपत्ती , महामारी, साथीचे रोग, नैसर्गिक रोगराई,
खालील प्रकारे ही विभागणी करता येईल (१) भौगोलिक आपत्ती (२) पर्यावरणीय आपत्ती (३) निष्काळजीपणामुळे उद्भवलेली आपत्ती
(४) कलहामुळे घडलेली आपत्ती

?? *आपत्ती व्यवस्थापन*
१) आपत्तीपूर्व व्यवस्थापन — आपत्ती विविध प्रकारच्या असतात .त्यांचे व्यवस्थापन करताना या आपत्तींना प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना करणे, आपत्तीचे स्वरूप व्यापक होऊ नये,हानी टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करणे महत्त्वाचे असते.

२) आपत्ती झाल्या बरोबर लगेच करायचे व्यवस्थापन——- आपत्ती उद्भवल्यास त्या संदर्भातील लगेच करावयाच्या उपाययोजना. कमीत कमी कालावधीत राबविणे. स्वयंसेवक ,पोलीस यंत्रणा , अग्निशामक दल , यांना योग्य ती कार्यवाही करण्यास पाठविणे अपाद ग्रस्तांना मानसिक आधार देणे तसेच वैद्यकीय सोयी पुरविणे, मनुष्यहानी कमी व्हावी बचावकार्य द्वारे आपत्तीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, स्वयंसेवी संघटना ,एनडीआरएफ ,एनसीसी, एनएसएस यांना मदतीचे आवाहन करणे

३) आपत्तीनंतर दीर्घकालीन व्यवस्थापन——– या प्रकारच्या व्यवस्थापनात तात्पुरत्या स्वरूपाचा विचार केला जात नाही तर दूरगामी परिस्थितीचा विचार करून भविष्यकाळात आपत्ती उद्भवू नये यासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन केले जाते

४) मानव निर्मित आपत्ती साठी व्यवस्थापन——- शासन , प्रशासन स्वयंसेवी संस्था , गृह विभाग , आरोग्य विभाग कृषी पाटबंधारे विभाग शिक्षण विभाग, तज्ञ , लोकप्रतिनिधी ,व्यक्ती यांचे मार्गदर्शन ,व्यक्तिंचे प्रशिक्षण व समुपदेशन यांचे कार्यातून व्यवस्थापन करता येऊ शकते

५) आपत्तींना तोंड देण्यासाठी च्या प्रशिक्षणा नुसार व्यवस्थापन—– आपत्ती या मानवी जीवनात त्रासदायक ठरत असतात .परंतु काही आपत्ती आपण थांबवू शकत नाही. अशा आपत्तींना तोंड देण्यास सक्षम बनण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण आवश्यक आहे. कौशल्यपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षण ,अर्धकुशल व्यवस्थापन प्रशिक्षण, सामान्य जनतेसाठी चे प्रशिक्षण ही प्रशिक्षणे सैन्य ,पोलीस दल, अग्निशामक दल ,एनडीआरएफ जवान, कमांडो, शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक, मुख्याध्यापक ,कर्मचारी ,प्रशासनातील अधिकारी ,कर्मचारी ,एन एस एस व एन सी सी विद्यार्थी ,नागरिक इत्यादींना प्रशिक्षण देऊन सक्षम बनवता येऊ शकते

*शालेय आपत्ती व्यवस्थापन*

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार आपत्ती व्यवस्थापन शिक्षक मुख्याध्यापक यांना आवश्यक केले आहे. कामकाज करणे सक्तीचे केलेले आहे
कोणतीही आपत्ती ही बेसावध असताना अचानक येते. पूर्व सूचने शिवाय कोसळलेल्या आपत्तींना तोंड देण्यासाठी तेथे असलेले नागरिकच सर्वात प्रथम धावून जातात. सरकार ,शासन-प्रशासन ही मदतीला धावतेच . कुंभकोणम शहरातील शाळेत झालेल्या दुर्घटनेनंतर शिक्षण संस्था ,शाळा ,विद्यार्थी व इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करण्याची गरज निर्माण झाली.

?? *शालेय आपत्ती*
१) नैसर्गिक आपत्ती—– भूकंप, महापूर, वादळे ,वीज कोसळणे, वनवा लागणे ,आग , भूस्कलन , दरड कोसळणे, वृक्ष कोलमडणे , सुनामी लाटा , प्राण्यांचा हल्ला होणे, सर्पदंश, मधमाशी चावणे, कुत्रा चावणे ,हिंस्र प्राणी हल्ला करणे, थंडीची लाट ,उष्माघात ,उष्णतेची लाट, अतिवृष्टी, ढग फुटी ,आजार ,अवर्षण, दुष्काळ पडणे, महामारी ,साथीचे रोग

२) मानव निर्मित आपत्ती* —-आग लागणे ,अपघात, विजेचा धक्का लागणे, इमारत कोसळणे ,शाळेच्या छतावरील पत्रे वादळाने उडून जाणे , छत कोसळणे , स्फोट होणे, विषारी वायुगळती होणे, गर्दीमुळे चेंगराचेंगरी होणे ,विद्यार्थी अपहरण , अचानक उद्भवणारे आजार जसे फिट, चक्कर येणे, दम लागणे

?? *आपत्ती व्यवस्थापनात शिक्षक मुख्याध्यापकांची इतर व्यक्तींची भूमिका*—–

शिक्षक ,मुख्याध्यापक, कर्मचारी व शिक्षण संस्थेच्या संबंधित व्यक्ती यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती सावधगिरी बाळगावी विविध आपत्तींना तोंड कसे द्यावे याचे ज्ञान व माहिती असणे आवश्यक आहे

?? *शालेय आपत्ती व्यवस्थापन उपाय योजना*
1) मुख्याध्यापकांसाठी आपल्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची शाळास्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी

2) या आपत्ती व्यवस्थापन समितीला योग्य प्रशिक्षण , ज्ञान, माहिती द्यावी .आपत्ती बाबत दक्षता , आपत्ती प्रसंगी करावयाची कामे ,पुनर्वसन या बाबत संपूर्ण शिक्षण द्यावे

3) इमारतीला 2 किवा 3 मोठे दरवाजे ठेवणे

4) शाळेत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत अग्निशमन टाकी, पाण्याचे हौद बनवून घेणे ,प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात

5) आपत्ती व्यवस्थापनाचे योग्य प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना देण्याची व्यवस्था करावी.

6)शिक्षकांची आपत्ती व्यवस्थापनातील भूमिका महत्त्वाची आहे व्यवस्थापक ,निर्देशक , मार्गदर्शक ,मदतनीस, आदर्श नागरिक, उद्बोधक, सुलभक म्हणून भूमिका पार पाडावी

7) शाळा तसेच समाजामध्ये कार्यशाळा घेणे .समाजाला व विद्यार्थ्यांना उद्बोधक करून राहणे

8) आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी जाऊन आपादग्रस्तांना मदत करणे प्रथमोपचार करणे मानसिक आधार देणे प्राथमिक गरजा पूर्ण करणे बाबत प्रयत्न करणे

9)समाजाचा जबाबदार घटक म्हणून कर्तव्य पार पाडावे आपत्तीच्या दृष्टीने सतर्क राहिले पाहिजे

10)विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करणे

11 )आपत्ती व्यवस्थापनावर आधारित माहितीपट दाखवणे

12)तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे

13) शाळेत स्काऊट गाईड कब बुलबुल एनसीसी स्थापन करून विशेष प्रशिक्षण देणे

14)शाळेचा आराखडा आखून ठेवणे

15) विद्युत यंत्रणा , प्रथमोपचार यंत्रणा,
अग्निशमन यंत्रणा ,वाळू पाणी यंत्रणा सुसज्ज ठेवणे

16) धोकादायक बाबीची विशेष काळजी घेणे

17) शालेय परिसरातील इमारत, खोल्या, पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, किचन शेड यांची दुरुस्ती करणे

18) ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना देणे

19). परिवहन समिती गठीत करणे

20) पोषण आहार सुरक्षित ठेवणे

22) पालकांचा , तज्ञ, व्यक्तींचां, वैद्यकीय सेवा डॉक्टरांचा, वाहनधारकांचा, शासन, प्रशासन, अधिकारी, कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक दर्शनी
भागात लिहून ठेवणे आपतकालीन यंत्रणा संपर्क नंबर लिहून दर्शन भागात लावणे

?? *समारोप*
आपत्ती विविध प्रकारच्या अहोत. त्या कोणालाही सांगून येत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणामुळे समर्थ होऊ शकते. प्रशिक्षणामुळे आपत्ती कार्य व्यवस्थित करता येते .
*डॉ. विलास उमराश काळे*
*केंद्रप्रमुख केंद्र अरण*
*ता. माढा जि. सोलापूर*
*९६८९१८८२८३* *vilaskale1973@gmaim. com*

?️ आपत्ती व्यवस्थापन.. कायदा,प्रतिकार,सावधानी, कर्तव्य..

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button